चाकावरचे शहर असलेल्या मुंबईतील बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा खरे तर राजकीय विषय असूच शकत नाही. त्याच कारणासाठी गेले काही दिवस हाल भोगावे लागणाऱ्या मुंबईकरांच्या या प्रश्नाकडे राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका या दोघांनाही लक्ष द्यावेसे न वाटणे हे केवळ दुर्दैवीच नव्हे तर संतापजनक आहे. राज्यातील सगळ्याच शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आणण्याचा जो उद्योग गेल्या काही दशकांत सुरू आहे, त्याबद्दल कुणालाही ना खंत, ना खेद. महाराष्ट्रासारख्या राज्यातील नागरीकरण ज्या वेगाने होते आहे, ते पाहता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सर्वच ठिकाणी ऐरणीवर येणे स्वाभाविक आहे. परंतु त्याकडे हेतूपूर्वक डोळेझाक करून तेथे नाइलाजास्तव राहणाऱ्या नागरिकांना वेठीला धरणे मात्र सुरूच राहिलेले आहे. शहरांतर्गत दळणवळण अधिक सोयीचे असणे ही विकासाची पहिली पायरी असते, हेच लक्षात न घेता आजवर सगळ्याच राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एकीकडे मेट्रो, मोनोरेल यासारखी अत्यावश्यक असणारी नवी व्यवस्था उभी करत असताना मूळची व्यवस्था मोडकळीस आणणे हा मूर्खपणा असतो. मुंबईसारख्या शहरातील बेस्ट ही बस सेवा एके काळी देशातील सर्वोत्तम व्यवस्था मानली जात होती. उपनगरी लोकल गाडय़ांच्या बरोबरीने मुंबईकरांना दळणवळणाचा कार्यक्षम पर्याय बेस्टने उपलब्ध करून दिला. पण ही व्यवस्था अकार्यक्षमतेच्या मार्गाने जाऊ लागली, तरीही त्याबाबत कुणालाच जाग आली नाही. मुंबई महापालिकेने तर ही व्यवस्था मोडून खाण्याचेच उद्योग सुरू केले, परिणामी बेस्टचे कंबरडेच मोडू लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा