केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय महायुद्धाचे एक नवे बालकांड सध्या लिहिले जात आहे. भारतीय युद्धाच्या केंद्रस्थानी भगवान श्रीकृष्ण होते. केरळातील साम्यवादी आणि िहदुत्ववादी यांच्या वैचारिक संघर्षांच्या केंद्रस्थानीसुद्धा भगवान श्रीकृष्ण आहेत, ही यातील मौजेची गोष्ट. साम्यवादाचा पारंपरिक धर्माला कट्टर विरोध असतो. पारंपरिक हा शब्द येथे वापरण्याचे कारण म्हणजे धर्मविरोधी साम्यवाद हाही आता एक निरीश्वरवादी धर्मच बनला आहे. त्याच्याही पोथ्या आणि कर्मकांडे आहेत. त्या खोलात जाण्याचे येथे प्रयोजन नाही. मात्र अन्य धर्माप्रमाणेच साम्यवादी धर्माचाही प्रचार करण्यात येत असतो. केरळातील बालसंगमम् चळवळ हे त्याचेच एक उदाहरण. मुलांवर अजाणत्या वयातच साम्यवादी संस्कार व्हावेत या हेतूने केरळमध्ये १९३८ साली ही सांस्कृतिक चळवळ सुरू करण्यात आली. केरळचे साम्यवादी मुख्यमंत्री (दिवंगत) ई. के. नयनार हे तिचे पहिले अध्यक्ष. या चळवळीला शह देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ७०च्या दशकात केरळमध्ये बालगोकुलम् नामक चळवळ सुरू केली. मुलांवर श्रीकृष्णचरित्राच्या माध्यमातून धर्मसंस्कार करायचे हे तिचे ध्येय. ‘कॅच देम यंग’चे नारे आज ऐकू येतात. या दोन्ही चळवळींचे उद्दिष्ट तेच होते. केरळमध्ये गेल्या काही वर्षांत संघाने चांगलेच पाय रोवले आहेत. भाजपचा मतांचा टक्का वाढत चालला आहे. मध्यंतरी झालेल्या एका पोटनिवडणुकीत अरुविक्करा या िहदुबहुल भागातून भाजपला मोठय़ा प्रमाणावर मते मिळाली. संघाच्या कामाला आलेली ही फळे होती. बालगोकुलम् चळवळीचा त्या यशात किती वाटा आहे, हे मोजणे कठीण आहे. एक मात्र खरे की, साम्यवाद्यांच्या घरांतील मुलेही या चळवळीकडे आकर्षति होत असताना साम्यवादी नेत्यांना दिसत होते. धर्माचे, कृष्णासारख्या देवतेच्या गुरुत्वाकर्षणात हे भावी क्रांतिसूर्य अडकत असल्याचे वास्तव साम्यवाद्यांना अस्वस्थ करणारे होते. हे रोखायचे कसे हा त्यांच्यापुढील प्रश्न होता. यंदा त्यांना त्याचे उत्तर सापडले. धर्माचे तत्त्वज्ञान लोकमनात पाझरते ते धार्मिक सण आणि उत्सवाच्या माध्यमातून. तेव्हा बांधबंदिस्ती करायची ती स्रोताजवळच. हे लक्षात घेऊन यंदा माकपने ५ सप्टेंबर रोजी, ऐन श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी बालसंगमम्च्या मिरवणुका काढण्याचे ठरविले आहे. हा जयंत्युत्सव बालगोकुलम्तर्फे मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मिरवणुकाही काढल्या जातात. त्यात साम्यवादी घरांतील मुले सहभागी होऊ नयेत म्हणून त्यांना पर्याय देण्याचा माकपचा हा प्रयत्न आहे हे उघडच आहे. कुन्नूरमध्ये संघाचा प्रभाव वाढतो आहे. तेव्हा एकटय़ा त्या भागातूनच अशा १६२ मिरवणुका निघणार आहेत. यावर साम्यवाद्यांचे म्हणणे असे की, बालसंगमम्तर्फे आठवडाभर ओणम साजरा केला जातो. त्याचा समारोप नेमका कृष्णजयंतीला येत आहे. तेव्हा तो निव्वळ योगायोग समजावा. तो योगायोग मानला तरी यातून एक गोष्ट पुरेशी स्पष्ट होते, की जागतिकीकरणोत्तर नवभांडवलशाही वातावरणात जन्मलेल्या पिढीला कोरडय़ा साम्यवादाचे आकर्षण उरलेले नाही. तो आíथक उजवा तर होतच आहे, पण धार्मिक उजवेपणाही त्याला भावतो आहे. आíथक उजवेपणात त्याला प्रगतीची स्वप्ने दिसतात आणि धार्मिक उजवेपणात त्याला जगण्याचा गुरुत्वमध्य गवसल्यासारखा भासतो. साम्यवादाचा खरा संघर्ष आहे तो या वास्तवाशी. ते भान गमावल्याने ते पुन्हा एकदा रस्त्यावरच्याच लढाया करीत आहेत. अशा बालकांडांतून ऐतिहासिक चुकांशिवाय त्यांच्या हाती फार काही लागणार नाही.
केरळी बालकांड
केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय महायुद्धाचे एक नवे बालकांड सध्या लिहिले जात आहे. भारतीय युद्धाच्या केंद्रस्थानी भगवान श्रीकृष्ण होते.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 03-09-2015 at 01:49 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Communists and bjp clash in kerala