तमिळनाडूच्या राजकारणाचा बाजच काही वेगळा आहे. १९६७ नंतर या राज्यात कोणत्याही राष्ट्रीय पक्षांना कधीच सत्ता मिळालेली नाही. एव्हाना तमिळनाडूचे मतदार प्रादेशिक पक्षांनाच सातत्याने कौल देत आले आहेत. भाजप आणि काँग्रेस हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय पक्ष, पण तमिळनाडूमध्ये या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे अस्तित्व नगण्यच ठरते. अण्णा द्रमुक किंवा द्रमुक या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय राष्ट्रीय पक्षांना यश मिळत नाही. परिणामी राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांपुढे नाक घासत जावे लागते. त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतात. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भाजप आणि काँग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी केली आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपमध्ये जागावाटप झाल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी द्रमुक आणि काँग्रेसमध्ये तह झाला. प्रादेशिक पक्षांना आपापल्या राज्यांची सत्ता महत्त्वाची असते. प्रादेशिक पक्षांना केंद्रातही दबावगट तयार करायचा असतो. यातूनच आपले जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजेत यावर कटाक्ष असतो. गेल्या वेळी तमिळनाडूतील ३९ पैकी ३७ खासदार अण्णा द्रमुकचे निवडून आले होते. जयललिता यांनी कधी काँग्रेस तर कधी भाजपशी हातमिळवणी केली होती. पण ती करताना त्यांनी कदापिही एक पाऊल मागे घेतले नव्हते. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुक पक्ष कमकुवत झाला. यामुळेच बहुधा सध्याच्या अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाने भाजप व पीएमके या पक्षांबरोबर जागावाटपाचा समझोता करताना सपशेल माघार घेतली. अण्णा द्रमुकचे ३७ तर भाजप आणि पीएमकेचा प्रत्येकी एक खासदार आहे. तरीही जागावाटपात भाजपला सात तर पीएमकेला सात जागा सोडण्यात आल्या. डीएमडीके पक्षाबरोबर अजून चर्चा सुरू आहे. अण्णा द्रमुकने आताच आपल्या ताब्यातील दहा खासदारांच्या जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. अन्य पक्ष बरोबर आल्यास आणखी काही जागांवर पाणी सोडावे लागेल. याचाच अर्थ मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी जागावाटपात अण्णा द्रमुकला कमीपणा घेतला आहे. एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्या नेतृत्वाच्या काळात कधीच अण्णा द्रमुकने एवढी तडजोड केली नव्हती. तमिळनाडूची सत्ता कायम राखणे हे अण्णा द्रमुकपुढे मोठे आव्हान आहे. आधीच काठावरचे बहुमत असताना बंडखोर नेत्या शशिकला यांचे भाचे दिनकरन यांना पाठिंबा देणारे १८ आमदार पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरले. या १८ मतदारसंघांमध्ये लवकरच पोटनिवडणुका अपेक्षित आहेत. कोणत्याही परिस्थितीत सर्व जागाजिंकणे अण्णा द्रमुकसाठी महत्त्वाचे आहे. कारण या जागा गमाविल्यास अण्णा द्रमुकचे सरकार गडगडू शकते. हे लक्षात घेऊनच अण्णा द्रमुकच्या विद्यमान नेतृत्वाने या १८ मतदारसंघांमध्ये भाजप, पीएमके किंवा अन्य पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचे आश्वासन घेऊन लोकसभेच्या जागांवर पाणी सोडले. दक्षिण भारतात अजूनही भाजपला बाळसे धरता आलेले नाही. कर्नाटकचा अपवाद वगळता भाजपची पाटी कोरीच आहे. तमिळनाडूतही पाच जागांवर भाजपने समाधान मानले. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत कन्याकुमारीची एकच जागा मिळाली होती. भाजपच्या तुलनेत द्रमुकबरोबरील आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला थोडय़ा जास्त म्हणजे नऊ जागा आल्या आहेत. काँग्रेसला द्रमुकवर पूर्णपणे विसंबून राहावे लागत आहे. जागावाटप जाहीर झाल्यावर द्रमुक नेते स्टॅलिन यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करावी, अशी मागणी केली. एकूणच निवडणुकीच्या राजकारणात तमिळनाडूत सारेच पक्ष तडजोडी करीत आहेत.
तमिळनाडूतील तडजोडी
अण्णा द्रमुक किंवा द्रमुक या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय राष्ट्रीय पक्षांना यश मिळत नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-02-2019 at 02:41 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress to announce alliance with dmk in tamil nadu