स्थूलमानाने अतिरेकी आणि दहशतवादी यांत फरक असतो. दहशतवादी हिंसक कृत्यांच्या माध्यमातून दहशत पसरवत असतो. अतिरेकी टोकाचा विचार करून त्या दहशतवाद्यास पूरक काम करीत असतो. दहशतवाद्यांचा सामना करणे तुलनेने सोपे. दंडयंत्रणा त्यांचा नि:पात करू शकते. अतिरेक्यांचे तसे नाही. अनेकदा ते कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करीत असतात. अनेकदा यंत्रणेच्या आधारे आपले कट्टर विचार पसरवीत असतात. स्वत: शारीरिक हिंसा करीत नसतात. हिंसेला वैचारिक आधार मात्र हमखास देत असतात. राष्ट्राच्या घटनेच्या आधारे ते राज्य ताब्यात घेत असतात. अनेकदा तर हे विचार अशा प्रकारे सामाजिक मानसाचा ताबा घेत असतात की त्यात काही चुकीचे आहे हेही त्यास जाणवत नाही. संपूर्ण समाजच्या समाज त्याच्या मागे जातो आणि अखेरीस खड्डय़ात पडतो. जसे दुसऱ्या महायुद्धापूर्वी ते इटलीमध्ये झाले, जर्मनीत झाले. हे विचार रोखायचे कसे, हा खरा नागरी समाजापुढचा प्रश्न असतो. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासमोर आज तोच प्रश्न आ वासून उभा आहे. असे कट्टरतावादी गरळ ओकणाऱ्यांना पाचारण करायचे आणि विष ओकू नका असे सांगायचे की संपले इतके सोपे त्याचे उत्तर नसते. बोलणारी तोंडे गप्प करता येतील, परंतु रुजलेल्या विचाराचे काय? मात्र या समस्येवर एकच एक उत्तर नाही, असे समजून गप्प बसणे हेही शहाणपणाचे नसते. कारण ते गप्प राहणे सर्वानाच गत्रेत घेऊन जाणारे असते. तेव्हा त्याची सुरुवात कोठून तरी झालीच पाहिजे. कॅमेरून सरकारने ती केली आहे. देशातून कट्टरतावादाचे विष निपटून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने खास रणनीती आखली आहे. त्याकरिता सुमारे ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी अतिरेकी विचारसरणीच्या विरोधातील ‘राष्ट्रीय आघाडी’ची स्थापना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. कट्टरतावादाच्या विरोधातील स्थानिक पातळीवरील कार्यक्रम, मोहिमा, संस्था यांना त्यातून साह्य़ केले जाणार आहे. रविवारी त्याची घोषणा करताना कॅमेरून यांनी एक साधाच पण महत्त्वाचा विचार मांडला. ते म्हणाले, की लोकांच्या मनात या विषवृक्षाचे बीज पडण्यापूर्वीच ते रोखणे आवश्यक आहे. त्याच्या वाढीला वातावरणातून मिळणारा प्राणवायू रोखणे गरजेचे आहे. याची सुरुवात शाळांपासून इंटरनेटपर्यंत विविध पातळ्यांवरून करावी लागणार आहे. आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ब्रिटनमधून सुमारे ७०० जण सीरिया आणि इराकला गेले. त्यांच्या मनात ते विष ओतण्यात आले ते इंटरनेटमधूनच. इंटरनेट, दूरचित्रवाणी, रेडिओ या प्रसारमाध्यमांतून होणारा कट्टरतावादाचा- केवळ जिहादीच नव्हे, तर नवनाझीही- प्रचार हे आता कॅमेरून सरकारचे लक्ष्य असणार आहे. वर म्हटल्याप्रमाणे ही केवळ मुस्लीम कट्टरतावादाविरोधातील मोहीम नाही. परंतु मुस्लिमांतील अनेकांना तसे वाटू लागले असून त्यांनी त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देणे आरंभले आहे. शीतयुद्ध चरमसीमेवर असताना अमेरिकेत साम्यवादाविरुद्ध मॅकार्थीनी चालविलेल्या मोहिमेचे प्रतिबिंब त्यांना यात दिसू लागले आहे. काहींना त्यातून मुस्लीम समाजात तुटलेपणाची भावना येईल असे भयही वाटत आहे. परंतु कट्टरतावादावरील उतारा गोडच असावा असा आग्रह कसा धरता येईल? कॅमेरून यांनी राजधर्माची जाणीव ठेवून तो देण्याचे धाडस दाखविले याचे कौतुक केलेच पाहिजे.

Story img Loader