ज्यांची देशावर निष्ठा नाही असे दिसेल, त्यांचा शिरच्छेद करा. शत्रुराष्ट्रातील धरण बॉम्बने उडवून लाखो लोकांना बुडवून मारा, अशी अतिरेकी मते असलेल्या व्यक्तीच्या उजव्या मेंदूमध्ये नक्कीच काहीतरी बिघाड असतो असे म्हणावे, तर हल्ली अशी माणसे एक तर सर्रास समाजमाध्यमांतून दिसतात किंवा लोकप्रतिनिधीगृहांत. तिकडे अमेरिकेत अशी व्यक्ती देशाच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पाहताना दिसत आहे. महाबिल्डर डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे नाव. इस्रायलचे नूतन संरक्षणमंत्री अॅविग्दॉर लिबरमन हे या ट्रम्प यांचे बंधू नक्कीच शोभतील. उपरोक्त प्रकारची अनेक अतिरेकी वक्तव्ये या लिबरमन यांच्या नावावर जमा आहेत. मानवी जीवनाबद्दल एवढे हार्दकि प्रेम असलेली ही व्यक्ती आज इस्रायलच्या संरक्षणमंत्रीपदी आहे, ही केवळ तेथील शांतताप्रिय जनतेच्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाच्याही चिंतेची बाब आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे मंत्रिमंडळ आधीच उजवीकडे झुकले होते. लिबरमन यांच्या समावेशामुळे ते आता कट्टर उजव्या शक्तींनी ताब्यातच घेतल्यासारखे दिसत आहे. त्याला अर्थात नेतान्याहू यांचाही नाइलाज होतो. अवघ्या एका मताच्या ‘बहु’मतावर तरलेले आपले सरकार टिकविण्यासाठी नेतान्याहूंना बाहेरून टेकू घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी डाव्यांना खाणाखुणा केल्या. ते बधले नाहीत. तेव्हा आपले एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि आताचे कट्टर विरोधक अॅविग्दॉर लिबरमन यांच्या पक्षाशी त्यांनी चुंबाचुंबी सुरू केली. गेल्या निवडणुकीच्या निकालानंतरच लिबरमन लिकुड आघाडीत येतील अशा अटकळी बांधल्या जात होत्या. त्या वेळी ते बाणेदारपणे उत्तरले होते, की या संधिसाधू आघाडीत केवळ मंत्रिपदाच्या तुकडय़ांसाठी सामील होणे आमच्या तत्त्वात बसत नाही. मधल्या काळात बहुधा नेतान्याहू यांचे मंत्रिमंडळ सुधारले असावे. त्यामुळेच या वेळी त्यांनी आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी त्यांनी अट घातली ती संरक्षण मंत्रिपदाची. ती मान्य करायची तर विद्यमान संरक्षणमंत्री मोशे यालोन यांचे काय करायचे? नेतान्याहू यांनी सरकार वाचविण्यासाठी यालोन यांचा बळी दिला. त्यांना नारळ दिला आणि लिबरमन यांना त्यांची खुर्ची दिली. लिबरमन हे तसे अनुभवी नेते. ते उपपंतप्रधान होते. दोनदा परराष्ट्रमंत्री होते. ते मूळचे सोव्हिएत रशियाचे. तेथे त्यांच्या कुटुंबाला स्टालिनच्या छळछावणीत सात वष्रे काढावी लागली होती. पण त्या अनुभवातून ते काहीच शिकले नसावेत. कम्युनिस्टांच्या हुकूमशाहीला फॅसिस्टांची हुकूमशाही हे प्रत्युत्तर असू शकत नाही. लिबरमन यांना ते मान्य नसावे. जे आमच्याबरोबर आहेत त्यांना सगळे मिळेल, पण जे विरोधात आहेत त्यांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवावीच लागतील, हे त्यांचे मत. याला ते राष्ट्रवाद म्हणतात. असा राष्ट्रवादी जेव्हा इस्रायलचा संरक्षणमंत्री होतो, तेव्हा पुढे काय घडेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पॅलेस्टिनचा पेटता प्रश्न यापुढे भडकण्याची अधिक शक्यता आहे. पॅलेस्टिनमित्रांनाच नव्हे, तर इस्रायल-मित्र अमेरिकेलाही आता हीच काळजी आहे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे ५१ टक्के इस्रायली नागरिकांनाही लिबरमन यांच्याहून यालोन बरे असे वाटते आहे. अर्थ साधा आहे. बहुसंख्य इस्रायलींना शांतता हवी आहे. नेतान्याहू यांनी त्याची हमी दिली आहे. पण एक विसरता येणार नाही. लिबरमन हे महाविद्यालयात असताना नाइटक्लबमध्ये बाऊन्सर होते. तेव्हा कमावलेल्या थंड आक्रमतेपुढे दुबळे नेतान्याहू किती टिकाव धरणार, हा प्रश्नच आहे. एकंदर आज इस्रायल एका अवघड वळणावर येऊन उभे आहे. तेथे कोणती चिन्हे दिसत आहेत हे माजी पंतप्रधान एहुद बराक यांनी आताच सांगून ठेवले आहे. ती चिन्हे आहेत फॅसिझमची.
इस्रायलमधील बाऊन्सर
ज्यांची देशावर निष्ठा नाही असे दिसेल, त्यांचा शिरच्छेद करा.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-05-2016 at 03:33 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump