आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार आणि अर्थविकासाची अवरुद्ध अवस्था, खनिज तेलाच्या भडकत्या जागतिक किमती, आपल्याकडे डॉलरच्या तुलनेत गळपटलेला रुपया, अर्थव्यवस्थेपुढे चलनवाढ आणि दुहेरी तूट फुगणे इ. संकटे आ वासून उभी आहेत. बरोबरीनेच दररोज नव्याने उलगडा होत संकटरूप धारण करीत असलेले वित्तीय क्षेत्रातील गैरव्यवस्थापन आणि त्याचे प्रतिबिंब म्हणून लडबडलेला भांडवली बाजार निर्देशांक वगैरे उत्तरोत्तर अनिश्चिततेकडे लोटणारा धबडगा जगभरात सर्वत्र सुरू आहे. या साऱ्यात एक सुखद वार्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांची झालेली निवड. गोपीनाथ या भारतीय वंशांच्या असणे आणि नाणेनिधीच्या सहा-साडेसहा दशकांच्या इतिहासात तिचा संशोधन विभाग सांभाळू जात असलेल्या तिसऱ्या भारतीय अर्थवेत्त्या. त्यामुळे आपणा भारतीयांना त्यांच्या या निवडीचे ममत्व असणे स्वाभाविकच. सध्या सर्वोच्च पदांवर असणारया अर्थवेत्त्यांपैकी ४६ वर्षीय गीता या कमी वयात या पदावर पोहोचल्या. ३८२ वर्षांचा उमदा वारसा लाभलेल्या हार्वर्ड विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापकपदी २०१० साली रुजू झालेल्या त्या केवळ तिसऱ्या महिला प्राध्यापिका, तर नोबेल विजेत्या अमर्त्य सेन यांच्यानंतर असा बहुमान प्राप्त झालेल्या दुसऱ्या भारतीय. भारतात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि पदवी परीक्षेतील गुणवत्तेने राष्ट्रपती सुवर्णपदक आणि अभ्यासवृत्ती मिळवून विदेशात उच्च शिक्षणासाठी संधी मिळाल्याने गीता यांनी हे कर्तृत्व दाखविले आहे. केरळमध्ये जन्म, माध्यमिक शिक्षण कोलकात्यात आणि दिल्लीतून झालेले त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पाहता, त्यांची प्रारंभिक घडण कोणत्या सांस्कृतिक परिवेशात झाली याची कल्पना येईल. प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. करीत असताना, केनेथ रॉगॉफ, बेन बर्नान्के आणि पिएरे-ऑलिव्हिए गुरीन्चाज  प्रभृती मार्गदर्शक म्हणून असणे हेही भाग्याचेच. गीता यांची एकंदर प्रतिभा पाहता, त्या जगातील एक असामान्य अर्थवेत्त्या असल्याचे प्रतिपादन खुद्द नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टिन लगार्ड यांचे आहे. गीता आज जरी अमेरिकेच्या नागरिक असल्या, तरी त्या मूळ भारतीय आहेत, भारतातील केरळ राज्यातील, दिल्लीच्या श्रीराम कॉलेजच्या विद्यार्थी. त्यांच्याबद्दल भारतीयांच्या अभिमानपूर्वक आनंदाला अनेक कंगोरे आहेत. पण अगदी छोटय़ा-मोठय़ा गोष्टीत गर्व-अभिमान शोधून त्याबद्दल स्वागतपर ट्वीट्सची पंतप्रधानांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांमधील चढाओढ या वेळी गायब आहे. भारताच्या या सुपुत्रीच्या कर्तबगारीवर मौन कशाचे द्योतक आहे, हे शोधणे कठीणही नाही. निश्चलनीकरण घोषित झाले, तेव्हा गीता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. कोणाही प्रज्ञावान अर्थतज्ज्ञाप्रमाणे गीता यांनीही या नोटाबदली कार्यक्रमावर ‘स्वत:च्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड’ अशी उघड टीका केली होती.  रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांना मुदतवाढ न मिळणे दुर्दैवी आहे, अशी सुस्पष्ट नाराजी गीता यांनी व्यक्त केली होती, हेही येथे ध्यानात घ्यायला हवे. ‘हार्वर्डी बुद्धिवंतांची प्रज्ञा देशाच्या काही कामाची नाही,’ असे संघ-भाजपतील मंडळींचे म्हणणे आहेच. या बुद्धिवंतांच्या निष्ठा आणि ‘भारतीय’त्वावर संशय घेणाऱ्या टीकेतून आपण गेल्या तीन वर्षांत तीन बिनीचे अर्थतज्ज्ञ गमावले आहेत. रघुराम राजन, अरविंद सुब्रमणियन, अरविंद पानगडिया यांना आपण मुकलो, पण गीता मात्र पटाच्या दुसऱ्या बाजूला आहेत. वित्तविकास संस्था म्हणून नाणेनिधीवर भारताची मदार आहे आणि पंतप्रधान-अर्थमंत्र्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची सूत्रे उलट गीता यांच्या हाती असतील. त्यामुळे जरी संघ-भाजपला त्यांच्या बौद्धिकतेचे वावडे असले तरी हार्वर्डी गीतेकडून सूचित वचनांची पारायणे करणे सरकारमधील मंडळींसाठी क्रमप्राप्तच ठरेल. हे काम ते कसे निभावतात याचीच आता कसोटी!