राजकारणात चढउतार येतच असतात. कधी यश तर कधी अपयश हेही नित्याचेच. त्याला सामोरे जाताना संयम व सभ्यतेचे दर्शन घडवतो तो खरा राजकारणी. राज्याच्या राजकारणातून तो वेगाने हद्दपार होतोय की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे. अभद्र भाषेचा वापर हे त्यामागचे एक कारण. अलीकडच्या काही दिवसांत एकमेकांवर टीका करताना राजकीय नेत्यांकडून जे शब्द वापरले जात आहेत ते बघून हे आरोप-प्रत्यारोप की गरळ ओकण्याचा प्रकार असा प्रश्न कुणालाही पडावा. राजकीय वैर निभावण्याच्या नादात आपण सुसंस्कृतपण हरवत चाललो याचेही भान या नेत्यांना नसणे हे आणखीच खेदजनक आहे. भाजप आमदार गिरीश महाजन यांनी एकेकाळचे भाजपचे आणि आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मनोरुग्णालयात नेण्याचा सल्ला देणे व त्याला प्रत्युत्तर म्हणून खडसेंनी बुधवार पेठेचा उल्लेख करणे हे सभ्यतेचे धिंडवडे उडवणारे. एकीकडे संत परंपरेचा दाखला देत लोकांना बोधामृत पाजायचे व दुसरीकडे मनातल्या बदल्याच्या भावनेला वाट मोकळी करून देताना अशा अश्लाघ्य भाषेचा वापर करायचा हा दुटप्पीपणा सामान्यांच्या लक्षात येत नसेल असे या नेत्यांना वाटते का? मध्यंतरी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण व अमृता फडणवीस यांच्यात रंगलेला वाद आता अब्रुनुकसानीच्या दाव्यापर्यंत गेला. हा अधिकार प्रत्येकाला आहे पण या वादातही असभ्य भाषेचा सर्रास वापर झाला. टीकेने गाठलेला हा सवंग स्तर एकूणच राजकारणाला खालच्या पातळीवर नेणारा आहे याचेही भान या नेत्यांना उरलेले दिसत नाही. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशीच वाईट टिप्पणी केली होती. राजकारणातले वैर किती व्यक्तिगत पातळीवर जाऊन पोहोचले याचेच हे निदर्शक. शस्त्रासारखे असलेले शब्द जपून वापरावे या शिकवणीपासून हे नेते दूर गेल्याचे हे द्योतक. सभ्य भाषेत केलेली टीकासुद्धा टोकदार असू शकते यावर जणू विश्वासच नसल्यासारखे या नेत्यांचे वर्तन राज्याला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच खासदार शरद पवार यांनी उत्तर प्रदेशवर भाष्य केल्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची खिल्ली उडवली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘कुठे सह्याद्री तर कुठे टेकाड’ असे शब्द वापरले. टीका असो वा खिल्ली त्याला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे या नादात आपण सभ्यतेलाच खुंटीवर टांगतो आहोत याचेही भान या नेत्यांना राहिलेले नाही. एकमेकांवर थेट चिखलफेक करणारे हे नेते नंतर अब्रुनुकसानीचे दावे ठोकण्यातसुद्धा आघाडीवर. अलीकडे राज्यात अशाच दाव्यांची संख्या कमालीची वाढलेली. असले कोर्टकज्जे करण्यापेक्षा आपली भाषा दुरुस्त करू असे यापैकी कुणालाही वाटत नाही हे दुर्दैव. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणावरून असेच वादग्रस्त विधान केले. प्रचंड टीका झाल्यावर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन उपोषण करत प्रायश्चित्त घेतले. आता तर खेद, माफी दूरचीच गोष्ट राहिली असा पश्चात्ताप व्यक्त करावा असेसुद्धा कुणाला वाटत नाही. यावरून राजकारणाची वाटचाल अपरिपक्वतेकडे किती वेगाने सुरू झाली याचीच प्रचीती येते.

Story img Loader