शरद जोशी यांचे मृत्युपत्र ही त्यांच्या जगण्याएवढीच पारदर्शक आणि समाजसन्मुख बाब आहे, हे त्यांच्या टीकाकारांनीही मान्य करायला हरकत नाही. आयुष्यात जे कमवायचे, ते केवळ अर्थरूपाने नाही, याचे भान सतत ठेवल्याने त्यांच्या निधनानंतर हळहळणाऱ्या लाखो भारतीय शेतकऱ्यांना या मृत्युपत्राने त्यांची आणखी नव्याने ओळख झाली. राजकारणात अवैध मार्गाने अतिप्रचंड पैसा गोळा करणाऱ्यांना ‘कुठे घेऊन जायचा आहे एवढा पैसा?’ असा जो प्रश्न विचारला जातो, तोच शरद जोशी यांनी स्वत:ला विचारला आणि त्यांच्यातील आतल्या आवाजाने त्यांना जी साद दिली, त्याचे आविष्करण या मृत्युपत्रातून झाले. आयुष्यभर जे काही मिळवायचे, ते पुढीलांच्या कल्याणासाठी, असा एक समज करून घेतलेला असतो. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची वाताहात होऊ नये आणि पुढील दहा पिढय़ांचे जगणे संपन्न व्हावे, यासाठीच आयुष्यभर फक्त कमाई करत राहायचे, असे या समजाचे स्वरूप. शरद जोशी यांनी स्वकष्टार्जित संपत्ती केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठीच उपयोगात आणण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे भारतीय समाजात अनुकरण होणे जवळजवळ अशक्य कोटीतले आहे. म्हणूनच या निर्णयाचे अप्रूपही अधिक. आयुष्यभर ज्या सहकाऱ्यांनी आपल्याला मनापासून साथ दिली, त्यांची आठवण मृत्यूनंतरही ठेवून आपल्या संपत्तीतील किंचित वाटा, त्यांच्याही नावाने करण्यासाठी मन फार मोठे असावे लागते. शरद जोशी यांच्यापाशी ते होते, म्हणूनच तर त्यांनी आपली तिजोरी मोठी करण्याचाही विचार कधी केला नाही. शेतमालाचे भाव ठरवताना शेतकऱ्याचे कष्ट हा एक महत्त्वाचा घटक असतो, हे सूत्र दलालांच्या जाळ्यात सापडलेल्या बाजारपेठेच्या गळी उतरवण्यासाठीच तर त्यांनी संघटन केले आणि आंदोलनेही उभारली. सोयाबीन तेलाच्या कारखान्याची मालकी शेतकऱ्यांकडेच असावी, या हट्टापायी त्यांना अखेरच्या काळात मोठी काळजी वाटणे स्वाभाविक होते, कारण हा कारखाना बंद पडला आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसेही परत मिळू शकले नाहीत. जोशी यांनी आपल्या संपत्तीतून २५ लाख रुपये त्या घेणेकरी असलेल्या शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला. आपल्या मालकीची जमीन शेतकरी संघटनेच्या उपक्रमासाठीच वापरली जावी, या उद्देशाने त्यांनी काही योजनाही मांडल्या. आपल्या मुलाबाळांसाठी सगळे काही राखून ठेवण्याची भारतीय परंपरा त्यांनी मोडीत काढली आणि ‘इदं न मम’ या उक्तीची आठवण काढीत सगळी संपत्ती विविध कारणांसाठी दान करण्याची हिंमत ठेवली. खरे तर हे सारे शरद जोशी यांच्या स्वभावाशी अतिशय सुसंगत म्हटले पाहिजे. आपले जगणे आणि आपली प्रत्येक कृती सार्वजनिक जीवनातील आपले अस्तित्व सिद्ध करणारी असते, याचे भान त्यांना होते. एखादी बलाढय़ संघटना निर्माण करणे आणि एका विचाराच्या दिशेने त्या संघटनेचा उपयोग करणे या दोन वेगवेगळ्या स्तरांवरील गोष्टी त्यांना सहजसाध्य झाल्या, याचे कारण त्यांच्या आचारविचारात असलेली पारदर्शकता. सध्याच्या जमान्यात जाऊ तेथे खाऊ अशी प्रवृत्ती बळावत असताना, आपले सारे धन आणि जमीनजुमला सार्वजनिक हितासाठी उपयोगात आणण्याचा जोशी यांचा मनोदय इतरांना खूप काही शिकवून जाणारा आहे!

Story img Loader