हैदराबाद येथील हत्येची घटना अनेक तपशिलांमुळे चर्चेत आली. नागराजू हा दलित समाजातील तरुण. त्याने आशरीन सुलताना या मुलीशी लग्न केले म्हणून तिच्या भावाने तिच्या देखत, भर बाजारात चाकूचे वार करून त्याला मारले. तेव्हा आशरीन एकटीच, तिच्या हिंसाधुंद भावाला रोखण्याचा प्रयत्न करत होती. हा प्रकार पाहात थांबलेल्या जमावातील माणसांना ती मदतीचे आवाहन करत होती, पण कोणीही मध्ये पडेना. अखेर रक्तबंबाळ नागराजू निश्चेष्ट पडल्यावरच हा हिंसाकल्लोळ थांबला. हे सारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले. नागराजू नुकताच पंचविशी गाठलेला, मोटारींच्या एका विक्रीदालनात नोकरीला होता. त्याच्यावर वार करणारा सय्यद मोबिन अहमद हा फळविक्रेता. बहिणीने परधर्मीयाशी, तेही तथाकथित खालच्या जातीच्या मुलाशी लग्न करणे पसंत नव्हते, या मोबिन अहमदला. म्हणून स्वत:च्या भवितव्याची पर्वा न करता त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मोबिन आणि त्याच्या साथीदाराला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले. मोबिन किंवा त्याचा साथीदार मसूद अहमद हे या आरोपांतून सुटण्याएवढे धनाढय़ नाहीत की त्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत. त्यामुळे ही ‘फाइल’ कदाचित विनाविलंब आणि सरळपणेच मिटेल आणि शिक्षा होईल वगैरे. राजकारणासाठी-देखील ही घटना कितपत उपयोगी पडेल कोण जाणे. ‘लव्ह जिहाद’ म्हणून जी ओरड सुरू असते त्यात आपल्या पोरीबाळींना भुलवून मुसलमान लोकसंख्या वाढवताहेत, हा प्रचार केला जातो. इथे मात्र प्रकरण वेगळेच. पण मुसलमान माणसाने हिंदू तरुणाला मारले म्हणून या मृत तरुणाचा कैवार घ्यावा तर मुळात त्याने मुसलमान मुलीशी लग्न केलेले. थोडक्यात, हिंदूंना राजकारणासाठी ही घटना फारशी उपयुक्त ठरणारी नाही. दोनच वर्षांपूर्वी नलगोंडा जिल्ह्यात अशीच हत्या- तीही  कॅमेऱ्यांसमोर- घडली होती पण त्या घटनेतील मृत तरुण, त्याची पत्नी आणि वार करणारा तिचा भाऊ हे सारे जण हिंदूच होते.  त्या वेळी तो जसा कौटुंबिक मामला मानला गेला, तसे आताही होईल. मात्र अनपेक्षितपणे, हैदराबादचे खासदार आणि  एमआयएम या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी नागराजूच्या हत्येचा निषेध करण्याची संधी सर्वाआधी घेतली. झाले ते चुकीचेच आहे, हा खूनच आहे आणि आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी, हे सांगताना ओवैसी यांनी मुस्लीम विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा यांचाच उल्लेख केला. वास्तविक धार्मिक प्रथांशी संबंध न ठेवता नोंदणी पद्धतीने विवाह करता येतो. पण याचा उल्लेख ओवैसींच्या भाषणात नव्हता, तसेच ‘कुराणातही खुनाचा गुन्हा अतिहीन मानला जातो’, यावर त्यांचा भर होता. हेही राजकारणच, हे निराळे सांगायला नको. या वेळी ती संधी ओवैसी यांनी साधली इतकेच. आजही  कुटुंबातील मुलीला, महिलांना वस्तूच नव्हे तर मालमत्ता समजले जाते, लोकसंख्यावाढीचे साधन मानले जाते आणि हे साधन दुसऱ्या धर्मासाठी, दुसऱ्या जातीसाठी वापरले जाणे हा कुटुंबाचा, जातीचा किंवा धर्माचाही अपमान मानला जातो. मग त्याची शिक्षा मुलीला, तिच्या नवऱ्याला किंवा दोघांना दिली जाते. याला पोलीस ‘कौटुंबिक वाद’ समजतात, तर धर्म पाहून हल्लीचे हिंदूत्ववादी ‘लव्ह जिहाद’  समजतात. असल्या घटनांतून सामाजिक वावटळी उठवण्यासाठी तपशीलच महत्त्वाचे ठरत असतात. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य- जे आता कायद्याने धर्म वा जातच नव्हे तर भिन्न लैंगिकतेची अटही ठेवत नाही, ते डावलले जात असताना समाज गप्पच राहातो.. नागराजूवर वार होत असताना बघे गप्प  राहिले, तसा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा