ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडच्या संघालाही भारताने एकदिवसीय मालिकेत धूळ चारली असून, तीन महिन्यांवर आलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ पुरेसा सज्ज झाल्याचे दाखवून दिले आहे. आता विश्वचषकाआधी भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी मालिका असून, तयारीसाठी ती शेवटची संधी आहे. २०१८-२०१९ या वर्षांत भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात ५-१, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात २-१ आणि परवा न्यूझीलंडला त्यांच्याच देशात ४-१ असे हरवले. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा चार सामन्यांमध्ये विजय आणि दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका विजय ही कामगिरी विलक्षण समाधानकारक मानावी लागेल. यंदा विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आहे आणि गेल्या वर्षी त्या देशात आपण एकदिवसीय मालिका १-२ अशी गमावली होती. त्या वेळी संघात दिसून आलेल्या त्रुटींवर समाधानकारक तोडगा निघाल्याचे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील मालिकांनी दाखवून दिले आहे. फलंदाजी हे भारताचे पारंपरिक बलस्थान नेहमीच असते. यंदा विशेषत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील मालिकांमध्ये मात्र भारतीय गोलंदाजांनी अधिक सामने जिंकून दिले. हा बदल निर्णायक ठरू शकतो. आज भारतीय गोलंदाजी ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगात सर्वोत्तम मानली जाते, कारण मध्यम- जलद आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांचा योग्य समतोल आपल्याकडे दिसून येतो. प्रतिस्पर्धी संघाचे सर्व फलंदाज बाद करण्याची किंवा त्यांना रोखण्यासाठीची क्षमता भारतीय गोलंदाजीमध्ये दिसून येते. भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमरा याला ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धही विश्रांती देण्यात आली होती. तरीही त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनीभेदक गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विनसारखा प्रमुख फिरकी गोलंदाज प्रदीर्घ काळ संघाबाहेर आहे, तरीही युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या युवा फिरकी गोलंदाजांनी धावा रोखणे आणि बळी मिळवून प्रतिस्पध्र्याला दडपणाखाली आणणे या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या. त्यांना रवींद्र जडेजा आणि आता केदार जाधव यांच्या फिरकीकडून सुयोग्य साथ मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. तरीही विशेषत न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ४ बाद १८ अशा स्थितीतून अंबाती रायडू, केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पंडय़ा यांनी डाव सावरला. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे उत्तम सलामीवीर आहेत. मधल्या फळीत विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा अनुभव; अंबाती रायडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा यांची ऊर्जा भारताला भक्कम फलंदाजी पुरवणारी ठरते. भारताकडे भरपूर वैविध्य असल्यामुळे प्रसंगी पाच गोलंदाज, पाच फलंदाज आणि एक यष्टिरक्षक अशी आक्रमक व्यूहरचनाही भारताला उतरवता येऊ शकते. लवचीकता हा भारतीय संघाचा मोठा गुण ठरतो. महत्त्वाच्या क्रिकेटपटूंची अनुपस्थिती हा भारतासाठी फार मोठा अडथळा ठरत नाही. एखादा खेळाडू जायबंदी झाला किंवा त्याला विश्रांती द्यायची झाल्यास तितक्याच तोडीचा बदली खेळाडू उपलब्ध असणे, हे बलाढय़ संघाचे लक्षण असते. भारताकडे असे खेळाडू उपलब्ध आहेत. विश्वचषकासाठी १५ खेळाडूच प्रत्येक संघात बाळगता येतील. त्यामुळे कदाचित ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे अशा गुणी खेळाडूंना संघाबाहेर बसावे लागू शकते. कारण विद्यमान भारतीय संघात स्थान मिळवणे आणि ते टिकवून ठेवणे खरोखरीच अवघड आहे. अर्थात कोणत्याही संघ व्यवस्थापनासाठी किंवा निवड समितीसाठी ‘कोणाला वगळावे’ ही समस्या ‘कोणाला खेळवावे’ या समस्येपेक्षा निश्चितच स्वागतार्ह असते.

 

Story img Loader