बॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहावे सुवर्णपदक नवी दिल्लीत ज्या संकुलात जिंकले, त्याचे नाव खाशाबा जाधव हॉल! हॉकी आणि क्रिकेटेतर खेळांमध्ये भारताचे नाव जगाच्या नकाशावर खाशाबांनीच पहिल्यांदा झळकावले. १९५२मध्ये हेलसिंकीच्या थंडीत खाशाबांना कांस्यपदकाची कुस्ती खेळावी लागणार याची कल्पनाही कोणी दिली नव्हती. त्यामुळे खाशाबा बाहेर फिरत होते आणि अगदी वेळेवर सामनास्थळी दाखल झाले. तरीही त्यांनी कुस्ती मारली आणि स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून दिले. अपेक्षा, पाठबळ आणि प्रसिद्धी वलय यांचा पूर्णपणे अभाव असताना खाशाबांनी अत्यंत अवघड कामगिरी करून दाखवली होती. मेरी कोमवर आज कौतुकवर्षांव होत असला तरी तिची सुरुवातीची वाटचालही खाशाबांपेक्षा वेगळी नव्हती. अपेक्षा, पाठबळ यांचा अभाव होता आणि वलयाची अपेक्षा नव्हती. पण खेळावर निष्ठा होती आणि आत्मविश्वासाची उणीव नव्हती. नवी दिल्लीत शनिवारी मेरी कोम खेळली त्यावेळी तिला बघायला प्रेक्षकांची साथ २००२मध्ये तिने पहिल्यांदा जगज्जेतेपद पटकावले तेव्हा किंवा ती प्रतिकूल परिस्थितीत या खडतर वाटेवर मार्गस्थ झाली तेव्हा मिळाली नव्हती. खाशाबा आणि मेरी कोम या भारतीय क्रीडाक्षेत्रातल्या खऱ्या संघर्षगाथा आहेत. खाशाबांच्या गाथेचा शेवट तितकासा आनंदमयी नव्हता, मेरी कोम सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत तुलनेने सुदैवी ठरली. २००६मध्ये याच दिल्ली नगरीत मेरी कोमने दुसऱ्यांदा जागतिक स्पर्धा जिंकली, त्यावेळी प्रशिक्षक मंडळींपेक्षा फारच तुरळक प्रेक्षक तिला प्रोत्साहन देण्यासाठी होते. मणिपूरमध्ये कोम वंशसमूहात मेरी जन्माला आली. कोमवंशीयांची संख्या जेमतेम ४० हजार आहे. अशा अल्पसंख्य समूहात जन्माला येऊन, प्रथम मणिपूरमध्ये, मग देशात आणि अखेरीस जगात चमकण्यासाठी काय त्याग करावा लागला याची कल्पना मेरीखेरीज फार थोडय़ांना असेल. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स अशा खेळांमध्येच ज्या काळात महिलांना समाजमान्यता होती, त्या काळात बॉक्सिंगसारख्या खेळात मणिपूरच्या या जिगरबाज मुलीने कारकीर्द घडवण्याचे धाडस केले. तिच्या किडकिडीत शरीरयष्टीकडे पाहून अनेकांनी तिला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांकडे मेरीने दुर्लक्ष केले हे या देशाचे भाग्यच! शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या मेरीला शाळेत असल्यापासूनच खेळांमध्ये आणि विशेषत अॅथलेटिक्समध्ये रस होता. १९९८ च्या बँकॉक एशियाडमध्ये मणिपूरच्या डिंको सिंगने सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे मणिपूरमध्ये डिंको सिंगचा भव्य सत्कार झाला. त्यावेळी मणिपूरमध्ये अनेक तरुणांमध्ये बॉक्सिंगविषयी आकर्षण निर्माण झाले. मेरी कोम त्यांतीलच एक. तिचे वडील उत्तम कुस्ती खेळायचे. पण मेरीने बॉक्सिंग खेळू नये असे त्यांना वाटायचे. बॉक्सिंग खेळून चेहरा विद्रूप झाला, तर हिचे लग्न कसे होणार ही त्यांना चिंता! घरच्यांना अंधारात ठेवून मेरीने स्वतच बॉक्सिंगची वाट धरली. जागतिक स्पर्धेत विक्रमी सहावे सुवर्णपदक जिंकूनही ती संपलेली नाही. टोक्यो २०२० ऑलिंपिकचे तिला सुवर्णपदक खुणावत आहे.
सुवर्णगाथेमागील संघर्ष
बॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहावे सुवर्णपदक नवी दिल्लीत ज्या संकुलात जिंकले, त्याचे नाव खाशाबा जाधव हॉल!
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2018 at 00:26 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian boxer mary kom