कितीही कटू, अप्रिय असले तरी ते बोलावेच लागते आणि वास्तवाला असे थेट भिडण्याचा जणू आपल्याकडे मक्ताच आहे, हे गेले तीस महिने रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी अनेकवार दाखवून दिले आहे. किंबहुना त्याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ असतानाही जागतिक व भारतीय अर्थव्यवस्थेबाबत स्पष्ट आणि स्वच्छ विचारांसाठी ते प्रसिद्ध राहिले आहेत. २००८ सालच्या वित्तीय अरिष्टाबाबत त्यांच्या अचूक भाकिताचा इतिहास तसा ताजाच आहे. त्यामुळे ‘जागतिक पटलावर भारताची सध्याची स्थिती बरी असली तरी ती आंधळ्याच्या दुनियेत, काणा राजा या धर्तीचीच, तीबद्दल आपण खरेच समाधान मानावे काय,’ असे त्यांनी केलेले विधान आश्चर्यकारक ठरत नाही. गेल्या आठवडय़ात लागोपाठच्या आलेल्या आकडेवारीने अर्थव्यवस्थेत जान फुंकली होती. सलगचा दुष्काळ यंदा सरेल आणि चांगल्या पाऊसपाण्याचे भाकीत स्कायमेट या खासगी आणि सरकारच्या हवामान खात्यानेही वर्तविले आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सहा महिन्यांच्या तळाला ४.८३ टक्क्यांवर घरंगळला आहे, तर त्याहून सकारात्मक गोष्ट म्हणजे उद्योगक्षेत्राच्या गंज चढलेल्या चाकांना गती मिळत असल्याचे फेब्रुवारीत दोन टक्क्यांवर राहिलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातून स्पष्ट झाले. अर्थव्यवस्थेला आस असलेले अच्छे दिन अखेर क्षितिजावर दिसू लागल्याच्या या खुणा बरोबर घेऊनच, देशाचे अर्थ सल्लागार अरिवद सुब्रह्मण्यन, अर्थमंत्री अरुण जेटली वॉिशग्टनच्या दौऱ्यावर गेले. दोहोंकडून मग भारतीय अर्थव्यवस्थेच्या दोन अंकी दराने विकासाबद्दल विश्वास व्यक्त केला जाणे ओघानेच आले. तोच वॉिशग्टनमध्ये दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी दोहोंकडून फुगविल्या गेलेल्या फुग्याला टाचणी लावण्याचे काम केले. भारताच्या आíथक सशक्ततेबद्दल आणि संभाव्य सामर्थ्यांबद्दल देशांतर्गतच नव्हे तर सबंध जगभरातूनच आज जितक्या भरवशाने बोलले जात आहे, तसे यापूर्वी कधी दिसलेले नाही. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अव्वल तीन अर्थव्यवस्थांपकी आज ती एक आहे. हे जरी खरे असले तरी त्याच वेळी लोकसंख्येत गरिबांचा सर्वाधिक वाटा असलेलीही ती एक अर्थव्यवस्था आहे. आजच्या घडीला जागतिक उत्पादनांत अव्वल ४० देशांचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक आहे, या चाळीशांत सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेला देश म्हणून भारत शेवटच्या स्थानी आहे. चीनची बरोबरी करणे ही तर मग खूप दूरची गोष्ट ठरते. निम्म्याहून अधिक लोकसंख्येची उपजीविका असलेल्या शेतीची दयनीय परवड सुरू आहे. पाऊस चांगला झाला तरी शेतीला संकटमुक्त केले जाईल अशी काही धोरणे, उपाययोजना नाहीत. उद्योगक्षेत्रातून ना नवीन गुंतवणूक ना नव्या विस्ताराची उमेद आहे. अर्थव्यवस्थेला उभारी येत असल्याचे प्रतििबब शेअर बाजाराच्या निर्देशांकापेक्षा, कंपन्यांच्या तिमाही आíथक कामगिरीतून दिसायला हवे. राजन यांच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेबाबत समाधान मानावे अशी ही ठिकाणे आहेत, त्यांच्या मते ती नजरेआड होता कामा नये. म्हणूनच उद्याची आíथक महासत्ता म्हणून भारताबद्दल तुताऱ्या फुंकण्याचे उद्योग आपल्याकडून तरी शक्य नाही, हेच ते वेगळ्या अंगाने म्हणून गेले. राजन निराशावादी नक्कीच नाहीत, तर डोळे दिपवणारे भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘तेज’ हे आपल्या अंगभूत आणि विपुलतेने उपलब्ध संसाधनांतून साध्य होईल, असा त्यांचा कायम आशावाद राहिला आहे. बाजारात क्षण दोन क्षणांच्या फिरस्तीसाठी येणाऱ्या डॉलर-पौंडातून दिसणारी ‘तेजी’ ही अल्पजीवी, म्हणूनच कानाडोळा करण्याजोगीच असते.

 

Story img Loader