जगभरातील विविध मित्रराष्ट्रांच्या नौदलांनी एकत्र यावे, संचलन करावे, सामर्थ्यांचे, क्षमतांचे प्रदर्शन करावे असा उत्सवी मामला म्हणजे आंतरराष्ट्रीय नौदलताफा संचलन. हे अर्थातच वरवरचे चित्र झाले. अशा संचलनाचा एक महत्वाचा हेतू एकमेकांबरोबरचे सहकार्य (नेटवìकग) आणि एकत्रित कारवाया करण्याची क्षमता (इंटरऑपरेबिलिटी) तपासून पाहणे हा असतो. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील विशाखापट्टणम येथे बंगालच्या उपसागरात सध्या सुरू असलेल्या नौदलताफा संचलनातून ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली याचा अभ्यास यथावकाश होईलच. मात्र या संचलनाच्या निमित्ताने भारताने खासकरून आशियायी राजकारणाच्या दृष्टीने ज्या काही विशेष गोष्टी घडवून आणल्या आहेत त्या पाहणे आवश्यक आहे. मोदी सरकारच्याच नव्हे, तर भारताच्या दृष्टीने अभिमानाने सांगावी अशी एक बाब म्हणजे या संचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रांची संख्या. याआधी २००१ मध्ये मुंबईजवळ अरबी समुद्रात झालेल्या संचलनात २९ देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला होता. यावेळी ती संख्या ५० वर गेली आहे आणि त्यात एकीकडे अमेरिका आणि रशिया, चीन आणि जपान अशा एकमेकांच्या विरोधकांचाच नव्हे, तर इराण आणि इस्रायल अशा परस्पर शत्रूराष्ट्रांचाही समावेश आहे. अशा देशांची मोट एकत्र बांधणे हे खचितच केंद्र सरकारचे यश मानावे लागेल. गेल्या सुमारे वर्षभर राजनतिक पातळीवर त्यासंबंधीची तयारी सुरू होती. त्या मुत्सद्देगिरीचाच हा विजय होय. यंदाच्या कार्यक्रमास परदेशी नौदलांकडून मिळालेला प्रतिसाद हा भारतीय नौदलाच्या आशिया-प्रशांत क्षेत्रातील वाढत्या महत्त्वाचे आणि सामर्थ्यांचेच द्योतक असल्याचे पाहुण्या नौदल अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. ही बाब केवळ पाहुण्यांच्या चांगुलपणाची मानता कामा नये. नव्यानेच प्राप्त केलेल्या आणि आशियातील सर्वात मोठय़ा म्हणून नावाजलेल्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेसह या संचलनात एकटय़ा भारताच्या एकूण ७५ युद्धनौका सहभागी झाल्या. हे सर्व काही भारताचे सामथ्र्य दर्शविणारे होते आणि हे शक्तिप्रदर्शन जेथे झाले, ती बंगालच्या उपसागरातील जागा भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाला धरून होती. हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. चीन हा भारताचा प्रतिस्पर्धी देश या संचलनात सहभागी झाला होता, याचा अर्थ एवढाच असतो की त्या राष्ट्राबरोबर अजून आपले शत्रुत्वाचे संबंध नाहीत. तो देश दक्षिण चिनी समुद्रात ज्या पद्धतीने अरेरावी करीत आहे ते पाहता त्याच्या डोळ्यास डोळा देणे आवश्यक होतेच. गतवर्षी जपानने अशा संचलनाचे आयोजन केले होते. यंदा भारतानेही या संचलनातून चीनला संदेश देण्याचे काम नक्कीच केले आहे. अमेरिकेने या क्षेत्रात सुरू केलेल्या मोच्रेबांधणीत भारतीय नौदलाने महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशी अनेक आग्नेय आशियाई देशांसह पाश्चिमात्त्य देशांचीही इच्छा असली, तरी त्यासाठी भारताची चीनच्या तुलनेत कितपत तयारी आहे हा एक अवघड सवाल आहे. इराण आणि एडनचे आखात यापासून मलाक्काची सामुद्रधुनी या पारंपरिक प्रभावक्षेत्राबाहेर व्यापक क्षेत्रात विस्तारित भूमिका निभावण्यासाठी भारतीय नौदलाला आपले सामथ्र्य आणखी वाढवणे गरजेचे आहे. भूदल आणि वायुदलाच्या तुलनेत नौदलाचा स्वदेशीकरणाचा आणि आधुनिकीकरणाचा वेग चांगला आहे. पण विमानवाहू नौकांची संख्या सध्याच्या दोनवरून तीनवर नेणे, पाणबुडय़ाची संख्या १३ वरून २४ वर नेणे आणि अन्य युद्धनौकांची संख्या दीडशेच्या वर नेणे हे नजीकच्या काळातील आव्हान आहे. तरच सागरी व्यापाराच्या ८० टक्के वाटा असलेल्या िहदी महासागरासह आसपासच्या महासागरांत आपले हितसंबंध जपण्यास आणि व्यापक भूमिका बजावण्यास भारत पात्र ठरेल. त्यातून आपल्या शिडात किती वारे आहे हे जगाला खऱ्या अर्थाने दिसेल.

Story img Loader