ज्या मोजक्या देशांमध्ये करोनाचा ओमायक्रॉन हा उपप्रकार अजूनही हजारोंना बाधित करत आहे त्यांपैकी प्रमुख म्हणजे चीन. दक्षिण कोरिया, हाँगकाँग, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्येही बाधितांचे दैनंदिन आकडे वाढत आहेत. त्यांची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु चीनचे उदाहरण विशेष दखलपात्र ठरते, कारण या देशाने ‘शून्य कोविड रुग्ण’ हे अव्यवहार्य धोरण या साथीच्या उद्रेकापासून राबवले. कोविड आणि चीनचा संबंध सुपरिचित आणि घनिष्ठ. या नवीन प्रकारच्या करोनाचा उद्भवच त्या देशातील वुहान शहरातला. तो अपघाताने झाला किंवा कसा, याविषयी अजूनही खल सुरू आहे. चीनमध्ये करोनामुळे नेमके किती बाधित झाले किंवा मृत्युमुखी पडले याविषयी खात्रीलायक आकडेवारी कधीही जाहीर झाली नव्हती. आता इतर बहुतेक देशांमध्ये करोनाची तिसरी लाटही ओसरत असताना, चीनमध्ये अनेक शहरांमध्ये ओमायक्रॉनचा उद्रेक झालेला दिसून येतो. याचा अर्थ करोनावर नियंत्रण आणण्यासाठी चीनने योजलेले उपाय पुरेसे फलदायी ठरले नाहीत, असाच निघू शकतो. करोनाचा उद्रेक दोन वर्षांनंतरही ज्या शास्त्रीय कारणांमुळे होतो, त्यांतील प्रमुख म्हणजे अपुरे किंवा कुचकामी लसीकरण आणि बाधितांची संख्या पुरेशी नसणे. चीनमध्ये बनलेल्या दोन्ही लशी जगभर पुरवल्या गेल्या. परंतु त्यांची प्रतिबंधात्मक क्षमता अपेक्षित नसल्याची तक्रार विशेषत: काही आखाती देशांनी पूर्वीच केली होती. आज कुचकामी लशींमुळेच जवळपास तीन कोटी नागरिकांची पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ त्या देशावर आलेली आहे. जवळपास १३ मोठय़ा शहरांमध्ये कडकडीत टाळेबंदी आहे. ज्या देशाचा अध्यक्ष करोनाचा धसका घेऊन सीमोल्लंघन करू शकलेला नाही आणि ज्या देशाने जवळपास दोन वर्षे अघोषित विलगीकरणाचे धोरण अंगीकारले, त्या देशाला आज करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अंतिम टप्प्यात प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागत आहेत यावरून इतर देशांनीही बोध घेण्याची गरज आहे. चीनमधील बाधितांची ही संख्या पुन्हा एकदा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे. याचे कारण म्हणजे चीन आजही जगाचे प्रमुख औद्योगिक उत्पादनाचे केंद्र आहे. तेथील वाहतूक व्यवस्थेला टाळेबंदीमुळे बाधा आल्याने पुन्हा एकदा पुरवठा शृंखलेचा मुद्दा उग्र होऊ शकतो, असा इशारा या क्षेत्रातील विश्लेषक देतात. याशिवाय आणखी कळीची बाब म्हणजे, नव्याने करोना विषाणूची ‘निर्यात’ चीनकडून सुरू झाल्यास आणखी एका लाटेचा सामना करावा लागणार का? करोनाचा प्रतिकार आणि प्रतिबंध एकत्रितपणाने करण्याची नितांत गरज असल्याच्या काळात चीन इतर देशांशी फटकून वागत राहिला. लसनिर्मितीच्या बाबतीतही या देशाला आपल्या लशी इतर देशांपर्यंत किती वेगाने आणि अधिक प्रमाणात पोहोचतील याचीच घाई झाली होती. लसनिर्मिती हे घाईने करण्याचे काम नाही, हे विशेषत: पाश्चिमात्य देशांनी दाखवून दिले. त्या तुलनेत, सरसकट नसल्या तरी रशिया आणि चीन यांनी बनवलेल्या लशी कुचकामी ठरल्याचे दिसून आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे दोन्ही देश हे मानायला तयार नाहीत आणि त्यांची गुर्मीही कमी झालेली नाही. शास्त्रीय आधार आणि सर्वव्यापकता नसेल तर लसीकरण आणि करोना नियंत्रण या कार्यक्रमांना दीर्घ परिप्रेक्ष्यात अपयशच येते, हे चीनच्या करोनाविषयी चुकलेल्या गणिताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा