इस्लामिक स्टेट किंवा आयसिस ही संघटना इराक आणि सीरियातून बहुतांश नेस्तनाबूत झालेली असली, तरी पूर्ण संपलेली नाही. संघटनेचे अनेक दहशतवादी आयसिस-के (इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान) या नावाखाली अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेतच. या संघटनेचा सध्याचा म्होरक्या अबू इब्राहिम अल हाशिमी अल कुरेशी सीरियात मारला गेल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच जाहीर केले. अमेरिकेच्या विशेष कमांडोंनी घेरल्यावर त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवले. यात त्याच्या आसपासचे अनेक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अल कायदा आणि आयसिसच्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार करणे अमेरिकेने सोडलेले नाही आणि किमान या एका मुद्दय़ावर तेथे राजकीय मतैक्य आहे. तीन वर्षांपूर्वी आयसिसचा त्या वेळचा म्होरक्या अबू अल बकर मारला गेला. २०११मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतरही अल कायदाच्या कारवाया सुरूच होत्या, कारण आयमान अल झवाहरी आता त्यांचा क्रमांक दोनचा म्होरक्या जिवंत होता. आयसिसने तर इस्लामिक खिलाफतचा विडा उचलला होता आणि गतदशकाच्या मध्यावर सीरिया आणि इराकचा मोठा भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. या काळात मुस्लीमधर्मीय असूनही याझिदी वांशिकांच्या कत्तली इराकच्या भूभागात मोठय़ा प्रमाणावर झाल्या. या कत्तलींचा सूत्रधार अल कुरेशी होता. २०१८मध्ये आयसिसचे अस्तित्व समूळ नष्ट केल्याचे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यानंतर २०१९मध्ये अल बगदादी मारला गेला. म्हणजे ट्रम्प यांच्या बढाईत तथ्य नसल्याचेच आढळून आले. अजूनही सीरिया, इराक, अफगाणिस्तानमध्ये संघटित स्वरूपात आणि अनेक देशांमध्ये घातपाती एकांडे (लोन वूल्फ) हल्ले करण्याची आयसिसची क्षमता शाबूत आहे. गेल्या महिन्यात सीरियाच्या हासाके प्रांतातील एका तुरुंगावर आयसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या तुरुंगात डांबून ठेवलेले आयसिसचेच ४०० ते ५०० हस्तक मुक्त झाल्याचे प्राथमिक वृत्त होते. तुरुंगावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी कुर्दिश बंडखोर, सीरियाचे अमेरिकेने पािठबा दिलेले सैनिक यांना कारवाई करावी लागली होती. हा हल्ला यशस्वी झाला नाही, तरी २०१२ आणि २०१३मध्ये अशाच प्रकारचे हल्ले तुरुंगांवर करून आयसिसने हातपाय पसरायला सुरुवात केली होती हे विसरून चालणार नाही. अनेक सुरक्षा विश्लेषकांच्या मते मार्च २०१९नंतरचा हा आयसिसचा सर्वाधिक विध्वंसक हल्ला होता. आयसिसचे १०० दहशतवादी त्या हल्ल्यात सहभागी होते आणि त्यांनी कारबॉम्बचा वापर मोठय़ा प्रमाणात केला. याचा अर्थ स्फोटके आणि शस्त्रे या संघटनेकडे अजूनही आहेत याकडे हे विश्लेषक लक्ष वेधतात. अल कुरेशी मारला गेला असला, तरी त्याची जागा घेण्यासाठी आयसिसने कुणाला तरी आधीच सिद्ध केले असल्याची पक्की खबर अमेरिकी सैन्यदलांच्या पश्चिम आशियास्थित सेंट्रल कमांडला मिळालेली आहे. पश्चिम आशियात इराण-अरब देश, इराण-इस्रायल आणि आता युरोपमध्ये रशिया विरुद्ध नाटो देश असे संघर्ष अलीकडे उद्भवत राहिल्यामुळे आयसिस, अल कायदा अशा संघटना पूर्णपणे नेस्तनाबूत होऊ शकलेल्या नाहीत. ते जोवर होत नाही तोवर एखाददुसरा म्होरक्या टिपून त्याबद्दल जाहीरपणे स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात काहीच मतलब नाही, हे सध्याच्या अधिक परिपक्व नेतृत्वाने तरी समजून घ्यायला हवे.

Story img Loader