अवकाशात जाणारा पहिला अवकाशवीर युरी गागारिन, नंतर रशियानेच व्हॅलेंतिना तेरेश्कोवा या पहिल्या महिलेला अवकाशात पाठवले. अमेरिकेने तर माणसाला चंद्रावर पाठवले. अलीकडे, २००३ पासून चीननेही अंतराळवीर पाठवले. भारताने चांद्रयान-१, मंगळयान या मोहिमा यशस्वी केल्या असल्या तरी माणसाला अवकाशात पाठवण्याची ‘गगनयान’ मोहीम आव्हानात्मक आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा हजार कोटींच्या एकूण खर्चाला मान्यता दिली, हे स्वागतार्ह ठरते. २०२२ मध्ये इस्रोने तीन अवकाशवीरांना (व्योमवीर) पृथ्वीनजीकच्या कक्षेत पाठवणे यात अपेक्षित आहे. माणूस आधीच अवकाशात गेला आहे, भारताचे राकेश शर्मा हे रशियाच्या सोयूझ यानातून यापूर्वीच अवकाशवारी करून आले आहेत, मग भारताने पुन्हा अंतराळवारीची तयारी का करावी, यासारखा प्रश्न केवळ चिंतातुर जंतूच विचारू जाणोत! मानवाला अवकाशात पाठवण्यामुळे भारताची तंत्रकुशलता तर वाढणार आहेच, शिवाय तो अमेरिका, रशिया, चीन यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. कुठल्याही देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आवाज हा जसा त्याच्या आर्थिक ताकदीवर असतो तसाच तो विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतिशीलतेवर असतो. भारताने अणुचाचण्या केल्या असता अमेरिकेने घातलेल्या र्निबधानंतर भारतीय वैज्ञानिकांनी दशकभर खपून क्रायोजेनिक तंत्रज्ञान स्वदेशी पातळीवर विकसित केले. आता ज्या जीएसएलव्ही मार्क-थ्री या भूसंकालिक प्रक्षेपकाच्या मदतीने तीन भारतीय अवकाशात जातील त्यात याच तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा असणार आहे. या मोहिमेमुळे इस्रो, शैक्षणिक संस्था, उद्योग यांच्यातील सहकार्य वाढेल, विद्यार्थी व संशोधक यांना अनेक संधी उपलब्ध होतील आणि भारतीयांचे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थान उंचावेल.. या अपेक्षा आज स्वप्नवत् आहेत, पण पं. जवाहरलाल नेहरूंनी विक्रम साराभाई यांच्यावर विश्वास ठेवून सुरू केलेले प्रयत्न, पुढे १९६९ साली झालेली ‘इस्रो’ची स्थापना आणि या संस्थेने १९७५ मध्ये पहिला भारतीय उपग्रह सोडण्यासाठी केलेला अट्टहास हे सारे एकेकाळी असेच स्वप्नवत् होते. कुठलीही अवकाश मोहीम राबवली जाते तेव्हा त्यात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे लागते. त्याच संलग्न तंत्रज्ञानाचा वापर नेहमीच्या जीवनात आपण करीत असतो हे माहिती नसल्यानेच, ‘अशा मोहिमांवर खर्च करण्यातून माझ्या दैनंदिन जीवनात काय फरक पडणार?’ असा अज्ञानमूलक प्रश्न आपल्याला पडतो. इस्रोने मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मोहिमेची तयारी २००८ मध्ये सुरू केली होती, पण आर्थिक तरतुदीचा अभाव व काही प्रमाणात प्रक्षेपकाचे अपयश, यांमुळे ती पुढे जात नव्हती. आताच्या योजनेत काही प्राथमिक तंत्रज्ञान चाचण्या आधीच झालेल्या आहेत, तीन अवकाशवीर पाठवायचे असले तरी एकूण तीस संभाव्य अवकाशवीरांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे, प्रत्येक यंत्रणेचे दोन संच बाळगणे, दोन मानवरहित व एक मानवासह मोहीम अशा एकूण तीन मोहिमा करणे यासाठी खूप मोठा खर्च अपेक्षित आहे. मुळातच आधी या मोहिमेसाठी १२५०० कोटींचा खर्च अपेक्षित होता, पण नंतर तो कमी करण्यात आला. खर्चाच्या भीतीपोटी त्यात त्रुटी राहता कामा नयेत, कारण मानवी अंतराळ मोहिमेत ९९ टक्के अचूकता अपेक्षित असते. आपल्याकडे जर पुतळ्यांवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यास हयगय होत नसेल तर देशाच्या अवकाश इतिहासातील मोठा टप्पा ठरणाऱ्या या मोहिमेत खर्च करण्यात हात आखडता घेण्यात काहीच हशील नाही. या तीन अवकाशवीरांत किमान एका तरी भारतीय महिलेला स्थान मिळाले तर या मोहिमेला आणखी वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा