कायम शोषित, पीडितांचा विचार करणारे, त्यासाठी लेखणी झिजवणारे, सरकारवर आसूड ओढण्यातच समाधान मानणारे विनोदी, उपरोधिक, व्यंगात्मक शैलीतले लिखाण कसे काय वाचू शकतात? नक्कीच यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा प्रश्न सरकारी यंत्रणांना पडू शकतो हे गौतम नवलखांना कळायला नको काय? म्हणे, पी.जी. वूडहाऊस वाचायचा! म्हणजे विनोदी शैलीतून क्रांतीची स्वप्ने पेरायची असेच ना. आजकाल क्रांती म्हटले की सरळ सरळ देशद्रोहच. एवढीच व्याख्या ठाऊक असलेल्या यंत्रणेने वूडहाऊसची पुस्तके नाकारली तर त्याचा एवढा गहजब करण्याचे कारण काय? असतील कैद्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी अनेक कायदे, आजकाल त्याला कोणी महत्त्व देत नाही. गुन्हा दाखल झाला म्हणजे ठरला गुन्हेगार. संशयित, आरोपी हे टप्पे ठाऊकच नाहीत या यंत्रणेला. आता हे नवलखासारख्या विद्वान माणसाला कळत नसेल तर त्याला यंत्रणा तरी काय करणार? राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर चालणे एवढेच या यंत्रणेला ठाऊक. शस्त्राएवढीच अशी पुस्तकेसुद्धा देशासाठी घातक या सरकारी समजुतीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या या यंत्रणेला उगीच न्यायालयात हेलपाटे घालायला लावून नवलखांनी वेळ दवडण्याचे काही कारणच नाही. मागे नाही का त्या उमर खलीदकडे खलील जिब्रानचे पुस्तक सापडले, वर्णन गोन्साल्वीसकडे ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ सापडले. केवढा गहजब झाला होता तेव्हा. नवलखा हे विसरले की काय? उद्या वूडहाऊस वाचून तुम्ही सरकारवर टीका करण्याची शैली बदलवली, नथीतून वाग्बाण मारणे सुरू केले व यातून सरकार घायाळ झाले तर कारागृहाच्या यंत्रणेवरच ठपका येईल ना! मग खबरदारीचा उपाय म्हणून, सुरक्षेचे कारण समोर करत त्यांनी पुस्तक नाकारले तर त्यांचे काय चुकले? हो, हे मान्यच की पीजीच्या कथानकाचा बाज उमरावी असतो. राज्यकर्त्यांना मारलेले त्यांचे टोमणेही श्रीमंती थाटाचेच. पुस्तकाच्या प्रभावात येऊन उद्या प्रत्येकच कैदी याच शैलीतून सरकारला धारेवर धरू लागला तर नवीन अडचण निर्माण होईल ना! मग त्यापेक्षा वाचूच द्यायचे नाही असे यंत्रणांनी ठरवले तर त्यात वावगे काय? शेवटी कैदीच ते. त्यांच्या मानवाधिकाराचा भंग झाला तरी चालेल पण सरकार अडचणीत यायला नको. आधी गरिबांची ढाल समोर केली, आता पुस्तकाचा आधार घेऊन श्रीमंतांची करता काय? ही चतुराई यंत्रणांनी ओळखली म्हणून त्यांचे कौतुक करायचे सोडून त्यांच्यावर टीका करायची? त्यांना हास्यास्पद ठरवायचे हे किमान आताच्या राजवटीत तरी अजिबात खपवून घेतले जाणार नाही. वूडहाऊस त्याच्या काळात चर्चिल एवढाच लोकप्रिय होता म्हणे! चर्चिलची वाणी व पीजीची लेखणी असा सामना तेव्हा रंगायचा. आताच्या राजवटीला असा सामना अजिबात नको. अशी पुस्तके वाचून सत्ताधीशांना विचारायचे प्रश्न सुचू लागतात. एखाद्या कैद्याने ते विचारावे यासारखी नामुष्कीची गोष्ट सरकारसाठी दुसरी कोणती असूच शकत नाही. हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून पुस्तक अडवले. त्याचा एवढा गवगवा नवलखांनी करण्याचे काही कारण नाही. तुरुंगात वेळ जात नाही म्हणून त्यांना पुस्तके वाचायचीच असतील तर त्यांनी उदात्त भारतीय परंपरा सांगणारे प्राचीन ग्रंथ वाचावे. यात त्यांनाही समाधान मिळेल व यंत्रणांनासुद्धा वारंवार न्यायव्यवस्थेसमोर खजील व्हावे लागणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा