पंजाबातील सुमारे पाव शतकाच्या शांततेला नख लावण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत. हे खुद्द प्रकाशसिंह बादल यांचे मत. ते राज्याचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे हे मत गांभीर्याने घ्यायला हवे. यात समस्या एवढीच आहे की, ते स्वत: त्याबाबत किती गंभीर आहेत याबद्दलच शंका आहे. अन्यथा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात ज्यांना पूर्णत: अपयश आले आहे अशा पोलीस प्रमुखांवर कारवाई करण्यात त्यांनी एवढा कालापव्यय केला नसता. तो झाला याचे कारण ज्यांना हटविण्याची आवश्यकता होती ते राज्याचे पोलीस महासंचालक सुमेशसिंग सनी हे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांचे लाडके होते. साडेतीन वर्षांपूर्वी सनी यांच्याकडे राज्याचे पोलीस प्रमुखपद देताना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करण्यात आला होता, की बादल कुटुंबाची मनोभावे सेवा करण्याचे फळ त्यांना देण्यात आले होते याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात सनी हे बादल यांच्या पशाची वाहतूक करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अमिरदरसिंग यांनी केला होता. तेव्हा निवडणूक आयोगाने सनी यांना पदावरून हटविले होते. ते आरोप राजकीय मानले, तरी सनींच्या नियुक्तीवरून बादल पिता-पुत्रांतच संघर्ष होता हे लपून राहिलेले नाही. गेल्या जूनमध्ये फरिदकोटमधील एका गुरुद्वारातून गुरुग्रंथसाहेबची चोरी झाली. ती घटना साधी नव्हती. पंजाबसारख्या संवेदनशील राज्यात अशी घटना म्हणजे दारूच्या कोठारावरील जळती काडी ठरू शकते, हे दहशतवादी कालखंडात तेथे काम केलेल्या सनी यांच्यासारख्यांना अन्य कोणी सांगण्याची आवश्यकता नव्हती; परंतु तेथील पोलीस यंत्रणा एवढी आळसावलेली की त्याचे गांभीर्यच त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी एकीकडे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून शेतकरी आंदोलनाने पंजाब पेटला असतानाच गुरुग्रंथसाहेबच्या विटंबनेचे प्रकरण समोर आले. त्याने राज्यभर आगडोंब उसळला. तशात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित रामरहिम यांना गुरुिनदेच्या आरोपावरून अकाल तख्तने माफी दिल्याचे प्रकरण घडले. त्यातून आणखी तणाव वाढला. या सगळ्या काळात राजकीयदृष्टय़ा भाजप-अकाली दल सरकार, तर कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सनी यांचे पोलीस दल अपयशी ठरले. ते झाकण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा अतिरिक्त वापर केला. अशा परिस्थितीत सनी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक होते; परंतु त्यांच्यात सुखबीरसिंग यांचा जीव गुंतलेला. अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी प्रकाशसिंह बादल यांची तुलना नेल्सन मंडेलांशी केली होती. ती धृतराष्ट्राशी केली असती तर अधिक सयुक्तिक ठरली असती; परंतु बहुधा तेथे भाजप त्या भूमिकेत असल्याने त्यांनी तसे म्हटले नसावे. पेटलेले राज्य, शेतकरी आंदोलनात राज्याचे झालेले १०० कोटींचे नुकसान, दोन नागरिकांचा गोळीबारात झालेला मृत्यू आणि बिघडलेले सौहार्द हे सर्व झाल्यानंतर अखेर त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी सनी यांना हटविले याचे गुण मात्र त्यांना द्यायला हवेत. सनी यांच्या जागी आलेले सुरेशकुमार अरोरा यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. त्यातील कायदा-कुव्यवस्थेचे आव्हान ते पेलतीलही. पंजाबवरील काळ्या बादलांचा मुकाबला ते कसा करतील याबद्दल मात्र सर्वानाच कुतूहल असेल.
पंजाबवरील काळे ढग
पंजाबातील सुमारे पाव शतकाच्या शांततेला नख लावण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.
Written by रत्नाकर पवार
First published on: 27-10-2015 at 02:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law and order situation in punjab