‘सत्ता मिळवण्यासाठी पंजाबात घुसू पाहणाऱ्या उत्तर प्रदेशी, दिल्लीकर, बिहारींना पिटाळून लावण्याकरिता सर्व पंजाब्यांनी एकत्र यावे’ या पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या विधानाने पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारात नव्या वादाला तोंड फुटले. चन्नी यांनी भय्ये, असा उल्लेख केल्यानेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लगेच त्याची प्रतिक्रिया उमटली व भय्यांना पिटाळून लावावे, असे आवाहनच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याची ओरड सुरू झाली. यावर चन्नी यांनी दिलगिरीच्या सुरातील खुलासा केला असला तरी वाद वाढायचा तो वाढलाच. उत्तर प्रदेशात काँग्रेसची फार काही ताकदही नाही वा निवडणुकीच्या रिंगणात काही मतदारसंघांचा अपवाद वगळता पक्ष स्पर्धेतही नाही. अन्यथा या विधानाने उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पार घाम निघाला असता. तरीही भाजप, आम आदमी पार्टीने काँग्रेसवर टीकाटिप्पणी करीत मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. प्रचाराच्या काळात विविध मुद्दे मतदारांवर प्रभाव पाडू शकत नाहीत हे जेव्हा राजकीय नेत्यांच्या लक्षात येते तेव्हा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा भात्यातून बाहेर काढला जातो. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वच प्रादेशिक अस्मितेवर अवलंबून असते. पण राष्ट्रीय पक्षांनाही या मुद्द्याला हळुवारपणे कधी कधी स्पर्श करावा लागतो. पंजाबमध्ये काँग्रेसची मुख्यत्वे लढत ही आम आदमी पार्टीशी असल्याने मुख्यमंत्री चन्नी यांनी दिल्लीचा उल्लेख करीत पंजाबी व प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. आम आदमी पार्टी व या पक्षाचे नेते अरिवद केजरीवाल यांची पाळेमुळे दिल्लीतील. यामुळेच दिल्लीकरांचा उल्लेख चन्नी यांनी केला असणार हे निश्चित. कृषी क्षेत्रात सधन असलेल्या पंजाबमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील मजूर मोठय़ा प्रमाणावर कृषी उद्योगांत काम करतात. बाहेरच्या मजुरांमुळे आपल्या रोजगारावर परिणाम होतो, अशी भावना पंजाबमधील युवकांमध्ये आहे. सत्तेत आल्यास ७५ टक्के रोजगार हे स्थानिकांसाठी आरक्षित ठेवण्याचे आश्वासन भाजपने तसेच अकाली दलाने दिले आहे. यामुळे काँग्रेसलाही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा प्रचारात घ्यावा लागला असणार. प्रादेशिक अस्मितेवरून एखादे विधान निवडणुकीत प्रभावी ठरू शकते हे याआधी अनेकदा अनुभवास आले. १९८५च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने मराठीच्या मुद्दय़ावर प्रचारात भर दिला असतानाच, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मुंबईबद्दलच्या विधानाचा गैर अर्थ निघून सारे चित्र पालटले आणि शिवसेनेला त्याचा फायदा झाला होता. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेनेकडून मराठीचा मुद्दा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मांडला जातो. ‘माँ, माटी, मानुष’ ही पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा बंगाली मतदारांना भावली. १९८०च्या दशकात आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांचा ‘तेलुगू बिड्डा’चा प्रयोग यशस्वी झाला होता. १९७०च्या दशकात शिवसेनेने तर दहा वर्षांपूर्वी मनसेचे राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा मांडला असता त्यांच्यावर सारे राजकीय पक्ष तुटून पडले वा राज्यातील मतदारांनी त्यांना तेवढी साथही दिली नाही. ममता बॅनर्जी वा केजरीवाल हे मुख्यमंत्री बाहेरच्यांबद्दल केलेल्या विधानाने वादग्रस्त ठरले होते, पण त्यांच्या राज्यातील मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला. चन्नी यांचा हा प्रयोग यशस्वी होतो का हे आता बघायचे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा