भारतीयांच्या जिव्हा लालसेला चटपटीत चटक लावणाऱ्या ‘मॅगी’ या खाद्यपदार्थावर भारतात आणलेली बंदी साडेतीन महिन्यांनंतर उठवल्याने त्याबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. जून महिन्यात मॅगीवर बंदी घालण्यात आली, तेव्हा या नूडल्सबरोबर देण्यात येणाऱ्या मसाल्यांत मोनोसोडियम ग्लुटामेट व शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे कारण देण्यात आले होते. हे दोन्ही पदार्थ मानवी शरीरास घातक असून त्याच्या सेवनाने गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने ही बंदी न्यायालयानेही जाहीर केली. आता न्यायालयानेच ती बंदी उठवण्याचाही निर्णय घेतला. हा निर्णय ऑगस्ट महिन्यात घेण्यात आला आणि त्या वेळी मॅगीची तपासणी तीन प्रयोगशाळांमध्ये करण्याची सूचना करण्यात आली होती. या तीनही प्रयोगशाळांनी दिलेल्या अहवालानुसार आता मॅगी खाण्यायोग्य आणि सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलैपूर्वी या पदार्थाच्या भारतातील आणि विदेशातील अनेक प्रयोगशाळांमध्ये केलेल्या तपासण्या खऱ्या होत्या, की आता नव्याने केलेल्या तपासण्या खऱ्या, असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे बंदी ज्यासाठी घालण्यात आली, ते कारण खरे की खोटे, अशा चिंतेनेही अनेक जण गोंधळात पडण्याची शक्यता आहे. जागतिकीकरणानंतरच्या काळात ‘फास्ट फूड’ची रेलचेलच भारतीय बाजारपेठेत होऊ लागली. नेस्लेसारख्या जगातील बलाढय़ कंपनीने अतिरेकी जाहिराती करून बाजारात आणलेले मॅगी नूडल्स हे उत्पादन भारतीय चवींमध्ये मिळू लागल्याने येथे सहज सामावून गेले आणि मग ती अनेकांची गरज बनून गेली. भारतात या उत्पादनावर घातलेल्या बंदीमुळे अनेकांची झोप उडाली आणि अनेकांची अडचणही झाली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या बंदी सशर्त उठवण्याच्या निर्णयानंतर केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष योग्य आल्याने आता हे उत्पादन पुन्हा भारतीय बाजारपेठ काबीज करण्यास सज्ज झाले आहे. महाराष्ट्राने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे. मात्र, कर्नाटक आणि गुजरात या दोन राज्यांनी या उत्पादनावरील बंदी आपापल्या राज्यात उठवली आहे. भारतीयांची विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी मॅगीने आता जाहिरातींवर प्रचंड खर्च करायचे ठरवले आहे. एकच उत्पादन दोषयुक्त आणि काही काळानंतर दोषमुक्त होते, हा कशाचा परिणाम आहे? एखादा पदार्थ हानिकारक आहे, असे एखादी नव्हे अनेक प्रयोगशाळा सांगतात, तोच पदार्थ सुरक्षित असल्याचे अन्य प्रयोगशाळा कसे सांगतात? असा भाबडा प्रश्न आता भारतीयांच्या मनात येत आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास आणखी काही कालावधी लागेल, मात्र बंदीनंतरच्या काळात नेस्लेच्या भारतातील प्रमुखपदी एका भारतीय व्यक्तीची केलेली नियुक्तीही यास कारणीभूत असू शकते, असे अनुमान काढण्यास वाव आहे. खाद्यपदार्थाच्या विश्वात भारत ही एक प्रचंड बाजारपेठ आहे. देशाच्या प्रत्येक छोटय़ा भागात चववैविध्य जोपासणारे अक्षरश: लाखो पदार्थ शेकडो वर्षांच्या परंपरेने तयार होत असतात. त्यांचे वेगळेपण जपत जपत, तेथील संस्कृतींशी त्यांचे घट्ट नाते तयार होत असते. दक्षिणेकडील रस्सम आणि सांबार जसे देशभर गेले, तसेच पंजाबातील पराठे आणि गुजरातमधील खाकरेही देशाच्या सर्व भागांत आपलेसे झाले. आता मॅगी नूडल्सची चव किंवा विविध पेयांची चवही सगळ्यांनाच आवडू लागली आहे. एवढय़ा मोठय़ा बाजारपेठेवर पुन्हा कब्जा करत असताना नेस्ले कंपनीला भारतीयांच्या मनातील हे प्रयोगशाळांच्या परस्परविरोधी अहवालांचे गूढ दूर करण्याचेही आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Larvae found in oranges
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
Story img Loader