हवशे, नवशे, गवशे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, गल्लीतील गुंडपुंड यांना नेहमीच सत्ताधारी पक्षाचे आकर्षण असते.. मग तो कोणताही पक्ष असो. शासकीय यंत्रणा आणि पोलिसांचा वरदहस्त असावा एवढीच यांची अपेक्षा असते. निवडणुका जिंकण्याकरिता याच शक्ती उपयोगी पडत असल्याने सत्ताधाऱ्यांना हेच जवळचे वाटतात. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात भाजपने १९९०च्या दशकात किती आवाज उठविला होता. काँग्रेस म्हणजे गुन्हेगारांचा आश्रयदाता पक्ष, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. सत्तेत आल्यावर भाजपने हेच सारे केले. उल्हासनगरमध्ये कुख्यात पप्पू कलानीचा मुलगा आणि सुनेला भाजपने आपलेसे केले. दोनच दिवसांपूर्वी धुळ्यात पक्षाच्या व्यासपीठावर कुख्यात गुंडाला स्थान देण्यात आले व या गुंडाच्या उपस्थितीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी समर्थन केले. दानवे यांचे तरी काय चुकले? कारण महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपने साऱ्याच शहरांतील गुंडापुंडांना पक्षाची द्वारे खुली केली होती. त्यांचे पक्षात यथायोग्य स्वागतच करण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने विविध पक्षांतील निवडून येऊ शकतील अशा नेत्यांना पक्षात स्थान दिले. ‘वाल्याचे वाल्मीकी होतील’ म्हणत समर्थनही केले; पण जरा दिवस फिरले की या मंडळींना उपरती होते. अन्य पक्षांमधून आलेल्या नाना पटोले आणि आशीष देशमुख या खासदार-आमदाराने आतापर्यंत राजीनामा दिला. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी १९ तारखेला आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गोटे यांनी घोषणा केल्याप्रमाणेच खरोखरीच कृती केल्यास राजीनामा देणारे बाहेरून भाजपमध्ये आलेले ते तिसरे लोकप्रतिनिधी ठरतील. गोटे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास तेव्हा स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. मुद्रांक घोटाळ्यात तेलगीचा सहकारी असल्याने गोटे यांना ‘मोक्का’न्वये चार वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली. अशा गोटे यांना भाजपमध्ये पावन करून घेण्यात आले. पक्षाने त्यांचा वापर करून घेतला. मात्र धुळे महानगरपालिका निवडणुकीत गोटे यांच्या कलाने घेण्यास पक्षाने विरोध केला. त्यातून गणित बिघडले. मंत्रिपद नाकारून भाजपने आपल्यावर अन्याय केल्याची माजी खासदार नाना पटोले यांची भावना झाली होती. मग त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेम साधला. काटोलचे आमदार आशीष देशमुख यांच्या मनातही भाजपविरोधी भावना तयार झाली. पटोले, गोटे किंवा देशमुख यांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी काहीही देणेघेणे नव्हते. स्वत:चा स्वार्थ साधला जात नाही हे लक्षात येताच त्यांनी वेगळी भूमिका घेतली. भाजपच्या आमदारांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीमधून आलेल्यांची संख्या कमी नाही. ही मंडळी काय करू शकतात याची चुणूक पटोले किंवा देशमुख यांनी दाखविली आहे. भाजपला सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षातील असंतुष्टांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. राजस्थानमध्ये उमेदवारी नाकारल्याने एका मंत्र्यानेच बंडाचे निशाण फडकविले. आणखी काही आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. मध्य प्रदेशातही उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आंध्र प्रदेशात पक्ष सोडण्याची धमकी देणाऱ्या व माजी काँग्रेसी नेत्याला भाजपने प्रदेशाध्यक्षपदाची बक्षिसी दिली. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे खच्चीकरण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी केले. पण वसुंधरा राजे निघाल्या खमक्या. त्यांच्यापुढे मोदी-शहा जोडगोळीला नमते घ्यावे लागले हे प्रदेशाध्यक्षांची निवड आणि उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट झाले. गुजरातमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी खातेवाटपावरून शहा यांनाच आव्हान दिले होते. एकूणच अन्य पक्षांमधून आलेल्या उपऱ्यांबरोबरच जुनेजाणते नेतेही पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा