नेहमीपेक्षा यंदाचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम वेगळा ठरला असून, त्यास दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे या वर्षी संयुक्त महाराष्ट्राचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा गेली काही वष्रे धूळ खात पडलेला झेंडा जोरजोराने हलवण्यास सुरुवात केली आहे. नागपुरातील विष्णुजी की रसोई येथे त्यांनी रविवारी स्वतंत्र विदर्भाचा झेंडाही फडकवला. विदर्भातील बहुसंख्यांना महाराष्ट्रातून वेगळे होण्याची इच्छा असेल, तर त्यात काही गर नाही. स्वातंत्र्याच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर यांची सहानुभूती असेल तर त्यातही काही चुकीचे नाही. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर यावा म्हणून अणे यांनी मराठवाडय़ालाही स्वातंत्र्य मागण्याची फूस दिली. अर्थात महाराष्ट्राचे तुकडे करणे हे वाढदिवसाचा केक कापण्याएवढे सोपे नाही. कारण हा प्रश्न असा आहे की त्यात तर्कबुद्धीपेक्षा भावनांचा कल्लोळ अधिक आहे. तो संयुक्तवादी आणि स्वातंत्र्यवादी अशा दोन्ही बाजूंनी आहे आणि त्यामुळेच यंदाचा महाराष्ट्र दिन वेगळा ठरला. तो तसा ठरण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सत्ताधारी युतीतील बेबनाव. तो या सोहळ्याच्या निमित्तानेही दिसला. आघाडीच्या राजकारणात मित्रपक्षांमध्ये मतभेद असणे वेगळे. बेबनाव असेल तर मात्र तो राज्यास घातक ठरतो. दुर्दैवाने याचे भान ना शिवसेनेच्या नेत्यांना आहे ना भाजपच्या कारभाऱ्यांना. सहार विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या साक्षीने महाराष्ट्र दिन साजरा करण्यावरून भाजप-शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण होण्याची आवश्यकता नव्हती. हे राज्य शिवछत्रपतींचे आहे आणि आम्हाला शिवप्रभूंबद्दल अपार प्रेम आहे. म्हणून आम्ही विमानतळावरील शिवपुतळ्यासमोरच महाराष्ट्र दिन साजरा करणार असा या पक्षाच्या नेत्यांचा हट्टाग्रह होता आणि म्हणून त्यांच्यात वाद झाला, अशातलाही भाग नाही. या मागचे कारण मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीत दडलेले आहे. खरेतर महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा करायचाच असेल तर त्याकरिता हुतात्मा चौकाशिवाय सुयोग्य स्थान अन्य नाही. विशाल महाराष्ट्र ही छत्रपतींची निर्मिती, पण संयुक्त महाराष्ट्रासाठी या छत्रपतींच्याच मावळ्यांनी प्राणांची आहुती दिलेली आहे. मुंबईच्या हुतात्मा चौकात ज्या शेतकरी आणि कामगाराचा पुतळा आहे त्यांनी या महाराष्ट्रासाठी रक्त आणि घामाचे िशपण केलेले आहे. तेव्हा ते खरे आदरांजलीचे अधिकारी आहेत. त्या पावन स्थळी महाराष्ट्र दिनाचा सोहळा होणे हे अधिक शोभून दिसेल. परंतु तेथे होतो काय, तर तद्दन शासकीय पद्धतीचा अभिवादनाचा कार्यक्रम. या राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि कंत्राटग्रस्त कामगार यांच्या वाटय़ाला जी उपेक्षा येत आहे, या राज्यात इतिहासाबद्दलची जी अनास्था आहे त्याचेच प्रतीक म्हणावे असा तो रूक्ष सोहळा. किमान त्यासाठी तरी दरवर्षी स्मारकाभोवती देखणी सजावट केली जाते. यंदा तर तेही करण्यात आले नाही. महाराष्ट्र दिन मुंबईत तर काळा दिन म्हणून साजरा होत नसताना हे का घडले? तेथे अत्यंत गांभीर्याने परंतु शानदारपणे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आयोजित करणे शक्य आहे. संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करायचे की नाही हा वेगळा मुद्दा झाला. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांप्रति कृतज्ञता बाळगण्याआड ते मतभेद यावेत एवढे का ते मोठे आहेत, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. तो जसा महाराष्ट्रदिनी काळे फुगे सोडणाऱ्यांनी करायचा आहे, तसाच या दिवशी आपल्या पक्षीय अस्मितांपायी या सोहळ्याचेही राजकारण करणाऱ्यांनी करायचा आहे. तो होत नाही, हे त्या १०६ हुतात्म्यांचे, ११ कोटींच्या संयुक्त महाराष्ट्राचे दुर्भाग्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा