यवतमाळमधील पांढरकवडा भागातील टिपेश्वर अभयारण्याच्या जंगलात एका कथित नरभक्षक वाघिणीच्या जीवितासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली दयेची याचिका हा चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहे. न्या. मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास, म्हणजेच संबंधित वाघिणीस दया दाखवण्यास नकार दिलेला आहे. टी-१ नामक या वाघिणीचा तिच्या दोन बछडय़ांसह या जंगलात संचार असतो. या भागात गेल्या दोन वर्षांत १३ जण मारले गेले असून, त्यांतील नऊ जणांची शिकार टी-१ आणि तिच्या बछडय़ांनी केली, असा वन खात्याचा दावा आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी झाल्यामुळे साहजिकच परिसरातील जनमत प्रक्षुब्ध असून वन खाते धास्तावले आहे. टी-१च्या विरोधातील सगळे पुरावे थेट नसून परिस्थितीजन्य आहेत. टी-२ नामक आणखी एका वाघाचे क्षेत्र जवळपास सात किलोमीटर दूर असल्यामुळे मनुष्यमृत्यू संशयाच्या केंद्रस्थानी अर्थातच ही वाघीण आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी वाघिणीच्या बाजूने मांडलेले काही मुद्दे विचारात पाडणारे आहेत. त्यांच्या मते ही वाघीण नरभक्षक नाही.  या जंगलात ठार झालेल्यांपैकी बहुतेक गुराखी होते आणि ते गुरे चारण्यासाठी जंगलात येत. या जंगलात मुक्त वावराचा वाघिणीचा परवाना बिनशर्त आहे आणि याउलट गुरे चारण्याचा गुराख्यांचा परवाना सशर्त आहे! या वाघिणीने आसपासच्या गावांमध्ये घुसून माणसांचा संहार केलेला नाही. सोबत बछडे घेऊन जंगलात वावरणारी कोणतीही वाघीण ही नेहमीच संशयी, सावध आणि आक्रमकही असते. शिवाय मनुष्यप्राणी हे वाघाचे नैसर्गिक भक्ष्य नाही. जंगलात राजरोसपणे येणाऱ्या मनुष्यालाही सहसा टाळण्याचा वाघाचा किंवा वाघिणीचा प्रयत्न असतो. तरीही एखाद्या वेळी वाघ, बिबटय़ा, अस्वल, हत्ती अशांकडून बचावासाठी किंवा चिडून जाऊन मनुष्यावर हल्ले होण्याचे प्रकार होतात. अशा प्रसंगी बहुतेकदा मनुष्याचा मृत्यू अटळ असतो. पांढरकवडा वाघिणीच्या बाबतीत मनुष्यमृत्यू मोठय़ा संख्येने झाल्यामुळे तिच्याविरोधात जनमत प्रक्षुब्ध होणे हे समजण्यासारखे आहे. मात्र वन खाते, सरकार, प्रशासन, न्यायपालिका यांच्याकडून विवेकाधीन भूमिका अपेक्षित आहे. या वाघिणीला प्रथम बेशुद्ध करून पकडावे आणि अपवादात्मक परिस्थितीतच बंदुकीचा वापर व्हावा, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. वन खात्याने तरीही हैदराबादेतून एका खासगी, भाडोत्री शिकाऱ्याला पाचारण केले आहे. तेही, वाघाच्या संचाराची वर्दी क्षणोक्षणी देऊ शकणारे अवघे सहा जीएसएम कॅमेरे या जंगलात लावून त्यांचा पुरेसा वापरही झाला नसताना. हे टाळायला हवे. शिवाय पकडून त्या वाघिणीचे काय करणार? किंवा तिला मारल्यावर तिच्यावर संगोपनासाठी आणि अन्नासाठी पूर्णतया अवलंबून असलेल्या बछडय़ांचे काय होणार? एखाद्या वाघासाठी एक जंगल राखीव ठेवण्यात आले आहे. तेथे सर्वसामान्यांना संचारास मनाई आहे.  अशा क्षेत्रात मनुष्य-वाघ संघर्ष झाल्यास, मनुष्यबळी गेल्यास संबंधित वाघाला नरभक्षक ठरवून त्याला इतरत्र पाठवायचे किंवा त्याचा जीव घ्यायचा असे दोनच पर्याय वाघावर अन्याय करणारे आहेत. ती वाघीण आणि तिच्यापाठोपाठ तिचे बछडे जंगलाबाहेर घालवून दिल्यावर आपण एका परिस्थितिकी शृंखलेमध्ये (इकोसिस्टम) हस्तक्षेप करतो, या जाणिवेचाच येथे अभाव दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा