मराठी चित्रपट लावणी आणि ग्रामीण बाजातून बाहेर पडत कात टाकत होता. नव्या सामाजिक विषयांना धरून पन्नासच्या दशकातील मध्यमवर्गाला या माध्यमाकडे आकृष्ट करण्यासाठी तेव्हाचा खरा आधार हा रमेश देव यांचा होता. चंद्रकांत-सूर्यकांत यांच्यासारखे रांगडे व्यक्तिमत्त्व तोवर चित्रपट रसिकांसाठी मोठे आकर्षण ठरले होते. रमेश देव यांच्या आगमनामुळे मराठी चित्रपटाने एका नव्या अध्यायाचीच सुरुवात केली. त्याला कारणीभूत ठरले, ते राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके. या तिघांनी मिळून मराठी चित्रपटाला उंचीवर नेऊन ठेवले. धांगडधिंगा, बटबटीतपणा, उथळपणा यांसारख्या त्या काळातील लोकप्रिय ठरलेल्या गुणांमधून या तिघांनी मराठी चित्रपटाला बाहेर काढले. संयत अभिनय काय असतो, शब्दांचे लावण्य संगीतातून किती सहजपणे झिरपू शकते, त्या काळातल्या पाश्चात्त्य चित्रपटांमधील नव्या कल्पना काय होत्या, याचा वस्तुपाठच त्या काळात निर्माण झाला. त्यामध्ये रमेश देव यांचा वाटा खूपच मोठा. त्यांनाही सुरुवातीला धोतर घालून हिरो व्हावे लागले खरे, परंतु नव्या पेहरावात अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या रमेश देव यांनी चित्रपटाच्या चाहत्यांना आकर्षित केले आणि मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदारही बनवले. घरात अभिनय कशाशी खातात, याची पुसटशीही कल्पना नाही आणि आपल्याला नेमके काय करायचे आहे, याचीही जाणीव नाही, अशी स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिल्या दशकातील बहुतेक चित्रपट कलावंतांची अवस्था. रमेश देव हे त्यांचेच प्रतिनिधी. त्यांनी काळानुसार आपल्यात जे बदल केले, त्यामुळे त्यांची कारकीर्द प्रदीर्घ ठरली. हिरो म्हणून पन्नाशीतही झळकण्याची हौस त्यांनी बाळगली नाही. खलनायक, सहअभिनेता अशा नाना रूपांत ते दिसत राहिले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कलागुणांनी इतकी वर्षे टिकून राहिलेले मराठी कलावंत संख्येने खूप कमी. त्याचे खरे कारण रमेश देव हे पूर्ण व्यावसायिक होते. त्यांना या व्यवसायाचे अर्थकारण समजत होते. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उगाच वेडेवाकडे चाळे करण्यात त्यांनी वेळ घालवला नाही. चित्रपटाच्या आजच्या जमान्यात वयाबरोबर आणि त्यापेक्षाही विवाहोत्तर भूमिका मिळण्यात अडचणी असतात. रमेश देव आणि सीमा ही मराठी चित्रपटसृष्टीतील अशी जोडी ठरली की प्रत्यक्ष जीवनात पतीपत्नी असणाऱ्या या दोघांमुळे निर्मात्यांना चित्रपटाच्या यशाची खात्री वाटत असे. या दोघांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एकत्रित आणि स्वतंत्रपणे आपापल्या भूमिका अतिशय चोख बजावल्या. या रुपेरी दुनियेत कोणत्याही अजब कारणासाठी बाहेर फेकले गेलेल्या कलावंतांची संख्या फारच मोठी असते. रमेश देव मात्र त्याला अपवाद ठरले. सुमारे २०० मराठी आणि सुमारे ३०० हिंदी चित्रपटांत भूमिका करून ते सतत प्रसन्न आणि टवटवीत राहिले. काळानुसार बदललेल्या नव्या माध्यमांशी आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेत रमेश देव शेवटपर्यंत कार्यरत राहिले. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी या माध्यमांत ते काम करत राहिले. मराठी चित्रपटांना पुन्हा चांगले दिवस यावेत, यासाठी रमेश देव यांनी नव्या दमाचे चित्रपटही तयार केले. या रंगीत दुनियेत इतकी वर्षे सतत झोतात राहण्याचे भाग्य लागलेल्या देव यांचे निधन ही त्यामुळे चटका लावणारी घटना आहे.
सुवर्णकाळाचे साक्षीदार
रमेश देव यांच्या आगमनामुळे मराठी चित्रपटाने एका नव्या अध्यायाचीच सुरुवात केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-02-2022 at 00:06 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie ramesh deo attract fans acting hindi filmmaking akp