बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात जराही दिसू नये, हे आश्चर्यकारक वाटले तरीही, त्यामागे जगभरातील अनिवासी भारतीयांच्या व्यवस्थापनाचे तंत्रकौशल्य दडलेले आहे, हे विसरता कामा नये. जगभरातील आपल्या सततच्या दौऱ्यांमध्ये मोदी यांनी तेथील भारतीय मनोवृत्तीला नेहमीच साद घातली. जगभरात भारत हा एक उभरता ‘ब्रँड’ आहे, हे अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने गळी उतरवण्यात ते यशस्वी होत आहेत, असेच अनिवासी भारतीयांना वाटत आलेले आहे. जी-२० च्या शिखर बैठकीला जाण्यापूर्वी ब्रिटनच्या दौऱ्यात मोदी यांनी त्याचा पुन:प्रत्यय दिला. ज्या देशाने त्यांचा व्हिसा नाकारला होता, त्याच देशातील भारतीय उद्योगपतींना भारत त्यांच्या गुंतवणुकीसाठी कसा उत्सुक आहे, याचे अतिशय नेटके विवेचन त्यांनी केले. वेम्बले येथील भारतीय उद्योगपतींच्या मेळाव्यात त्यांनी जगात भारताची मान कशी उंचावली आहे, याचे अनेक दाखले दिले. विकासाच्या आघाडीवर घडलेल्या आणि घडत असलेला प्रत्येक बारीकसारीक तपशील द्यायला ते विसरले नाहीत. एका अर्थाने तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना भारताचा हाच खरा प्रतिनिधी आहे, असे वाटण्याएवढे त्यांचे भाषण प्रभावी झाले. याचे खरे कारण त्या अनिवासी भारतीयांच्या मनात आपला देश कसा असावा, याची काही स्वप्ने तयार झाली होती. अस्वच्छ, मागासलेला आणि अशिक्षित असे या देशाचे वर्णन ऐकायला त्यांचे कान तयार नसतात. औद्योगिक विकासात भारताने कधीच फार मोठी आघाडी घेतली नाही, अशी त्यांची खात्रीच. या सगळ्या मानसिकतेला मोदी छेद देतात आणि एका नव्या स्वप्नांच्या जगात त्यांना तरंगायला लावतात. भारत हे सौरऊर्जा राष्ट्र करण्याचा मनोदय हे त्याचेच एक प्रतीक. स्वच्छ भारत हाही त्याच स्वप्नांचा आविष्कार. जगभरातील त्यांचे दौरे म्हणजे भारताची कथा सांगण्याचे कार्यक्रमच असतात. मग ते येथील राजकारणाला केवळ जाता जाता स्पर्श करतात आणि त्याहीपलीकडे जाऊन राष्ट्र या संकल्पनेला गिरकी मारून उपस्थितांच्या मनाला उभारी देतात. ब्रिटनचा त्यांचा दौरा हाही याच मालिकेतला. ब्रिटनला जाण्यापूर्वीच १५ क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीस मान्यता देणारा निर्णय केंद्राने जाहीर केला होता. त्याचा पुरेपूर उपयोग या दौऱ्यात त्यांना करता आला. परिणामी, सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या व्यावसायिक करारांवर या दौऱ्यात शिक्कामोर्तब झाले. वीजनिर्मितीपासून ते मेणपुतळ्यांच्या तुसा संग्रहालयापर्यंत अनेक क्षेत्रांत भारतात ब्रिटिशांनी येण्यास मान्यता दिली आणि त्यामुळे देशांतर्गत उठलेले वादळ क्षणभर का होईना विसरणे भाग पडावे, असे वातावरण तरी तयार झाले. बोलघेवडे म्हणून भारतात लौकिक मिळवलेल्या नरेंद्र मोदी यांना परदेशातून मिळणारा हा प्रतिसाद कितीही सकारात्मक असला, तरीही तेथील नागरिक हे त्यांचे मतदार नाहीत. ज्यांनी त्यांना सत्तेच्या सोपानावर चढवले, त्यांच्याही मनात अशीच सकारात्मक भावना निर्माण करण्यात यश प्राप्त करणे हे त्यांचे ध्येय असायला हवे. बिहार आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ते घडले नाही. स्वच्छता अभियान हे स्वयंसेवी संस्थांच्या हातून अलगदपणे सरकारी टेबलांकडे गेल्याने त्याच्या यशाबद्दलही शंकेचेच वातावरण आहे. अशा स्थितीत परदेशात ‘हिरो’ ठरणाऱ्या मोदी यांना स्वदेशीयांनीही त्याच नजरेतून पाहण्यासाठी अजून खूप काही त्वरेने करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा