अनेक वर्षांच्या अवकाशानंतर सन २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी निघाला होता. प्रस्थानापूर्वी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील त्या संघाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची दिल्लीत भेट घेतली. त्या वेळी सौरव आणि त्याच्या सहकाऱ्यांना क्रिकेटप्रेमी वाजपेयींनी मोलाचा सल्ला दिला – खेल ही नहीं दिल भी जीतिये. शुभकामनाएं! मुळात ही मालिका पूर्णत्वाला गेली याला वाजपेयींची उदारमतवादी भूमिका सर्वाधिक कारणीभूत ठरली. भारतीय संघाने त्या मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. पण वाजपेयींचा सल्ला शिरोधार्य मानत पाकिस्तानी हृदयेही जिंकली. एरवी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना राष्ट्रयुद्धाची, धर्मयुद्धाची उपमा दिली जाते. पण मालिका हरत असतानाही पाकिस्तानात भारतीयांना कुठेही कडवटपणा जाणवला नाही. याचे कारण राजकीय आणि सामरिक संबंध संघर्षमय असले, तरी सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा अशा माध्यमांतून भारत आणि पाकिस्तान संबंधांतील ओलावा टिकवून ठेवता येतो. नवज्योतसिंग सिद्धू याचे नवनिर्वाचित पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीस जाणे हे या सगळ्या पाश्र्वभूमीवर जोखावे लागेल. इम्रानच्या दोस्तीखातर आपण शपथविधीसाठी जात आहोत, असे सिद्धूने सांगितले होते. यात काहीच गैर नाही. आता हे दोघेही राजकारणी असले, तरी त्यांचा दोस्ताना हा राजकारणाच्या आधीपासून आहे. या शपथविधी समारंभात सिद्धू पाकव्याप्त काश्मीरचे ‘अध्यक्ष’ मसूद खान यांच्या शेजारी बसला होता. नंतर त्याने पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली आणि आलिंगनही दिले. त्याच्या या ‘राष्ट्रद्रोही’ कृत्याबद्दल आता भाजप आणि काही काँग्रेसेतर पक्षांनी आवाज उठवला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही आलिंगनाबाबत आक्षेप उपस्थित केला. एखाद्या समारंभात पाहुणा म्हणून गेल्यानंतर कुठे बसायचे याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार यजमानाचा असतो. सिद्धू प्रथम मागच्या रांगेत त्याला नेमून दिलेल्या स्थानावर बसला होता. नंतर त्याला पुढे जाऊन बसण्यास सांगण्यात आले. त्याच्या आजूबाजूला कोणी बसावे किंवा त्याने कुणाशेजारी बसावे हे सिद्धू नक्कीच ठरवू शकत नाही. आता राहिला पाकिस्तानी लष्करप्रमुखांना आलिंगन देण्याचा (आणि ते स्वीकारण्याचा) मुद्दा. याबाबत सिद्धूनेच रविवारी केलेल्या खुलाशानुसार, दोन्ही पंजाबदरम्यानची कर्तारपूर येथील सीमा पाकिस्तानकडून खुली करण्याचे आश्वासन जनरल बाजवा यांनी दिले. गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानात कर्तारपूर येथील दरबारा साहिब गुरुद्वारात शीख भाविकांना त्यामुळे जाता येऊ शकेल. नानकाना साहिब येथील गुरुद्वारासाठी यात्रामार्ग खुला करण्याबाबतदेखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आता हीच मागणी राजकीय किंवा मुत्सद्दी मार्गानी मंजूर होण्यासाठी किती वेळ लागला असता, याचाही विचार व्हावा. आलिंगनाबाबत आता तारसप्तकात आक्षेप घेणाऱ्यांना शरीफ-वाजपेयी किंवा शरीफ-मोदी यांची आलिंगने आठवत नाहीत का? की आलिंगनाचा मक्ता केवळ एकाच व्यक्तीचा असल्याचा यांचा समज आहे? सिद्धूच्या आलिंगन मुत्सद्देगिरीचे महत्त्व अशासाठी, कारण भारत आणि पाकिस्तानदरम्यान राजनैतिक आणि सरकारी चर्चा बहुतेकदा स्थगितच असतात. अशा वेळी चर्चेचे, मैत्रीचे इतर मार्गही खुले ठेवावे लागतात. ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ जिवंत ठेवावी लागते. त्यातूनच मुख्य प्रवाहातल्या मुत्सद्देगिरीचे मार्ग मिळत जातात. सांस्कृतिक संबंध दृढ झाल्यास उद्या कदाचित सामरिक संबंधही त्या मार्गाने जातील, ही आशा जिवंत ठेवावी लागते!
आलिंगन मुत्सद्देगिरी
अनेक वर्षांच्या अवकाशानंतर सन २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी निघाला होता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 20-08-2018 at 02:16 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu