हवामान बदलाची समस्या कुणा एका देशाला नाही तर कमीअधिक प्रमाणात सर्वच देशांना भेडसावत आहे. म्हणूनच यंदा ऑक्स्फर्डच्या शब्दकोशाने ‘क्लायमेट इमर्जन्सी’ हा शब्द ‘२०१९ मधील सर्वाधिक वापराचा शब्द’ असल्याचे जाहीर केले. यात आनंद मानावा असे काही नाही. हवामान बदलाचे अनेक दुष्परिणाम जगातील प्रत्येक व्यक्ती अनुभवत आहे आणि याला जबाबदारदेखील तोच आहे. गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाच्या दुष्परिणामांना आपण सारे सामोरे जात आहोत, पण जागतिकीकरणाच्या रेटय़ात हे दुष्परिणाम थोपवण्याचे प्रयत्न कुणी गंभीरपणे करताना दिसत नाही. विकासाची स्पर्धा आणि शहरीकरणाच्या चढाओढीत जगण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे भान मानवाला राहिले नाही. म्हणूनच दिल्लीसारख्या शहरात ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. ५० अंश सेल्सिअसच्या वर जाणारे तापमान, अवकाळी पूरस्थिती ओढवणारा पाऊस आणि गोठवणारी थंडी हे सर्व हवामान बदलाचेच दुष्परिणाम आहेत. औद्योगिकीकरणाच्या काळापासून कोळशाचा प्रचंड वापर सुरू झाला आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइड व मिथेनसारखा घटक आणि विषारी हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले. परिणामी तापमान, पर्जन्यमान आणि वारे वाहण्याची पद्धत यांत लक्षणीय आणि दीर्घकालीन बदल घडून आले आहेत. जगभरातील शासनकर्त्यांनी एकविसाव्या शतकाच्या अखेपर्यंत ही जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून त्यासंबंधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्धार केला. मात्र, आजपर्यंत तरी त्यादृष्टीने धोरणात्मक पावले उचलली गेली नाहीत. यासाठी शासनकर्त्यांनाच दोष देऊन चालणार नाही, तर मनुष्याची बेफिकिरी वृत्ती तेवढीच कारणीभूत आहे. शहरीकरणासाठी जंगलाचा बळी दिला जात आहे. जंगल नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऋतुचक्राचे व्यवस्थापन सांभाळणारी झाडे विकासाच्या नावावर कापली जात आहेत. त्याबदल्यात कोटय़वधी झाडे लावण्याचा गाजावाजा केला जातो. त्यात तथ्य नसल्याचे वारंवार दिसून येते. मुळात या कोटय़वधीतील जगणाऱ्या झाडांची संख्या किती? पर्यावरण समतोलासाठी वनीकरण केले जाते, पण एका झाडाच्या पूर्ण वाढीसाठी २० वर्षे लागतात आणि त्यानंतरच ते झाड माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन देऊ शकते. कितीही वनीकरण केले आणि ते १०० टक्के जगले तरी त्याचा उपयोग २० वर्षांनंतरच होतो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी लोकांचा सहभाग किती, हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा. कारण शासनकर्त्यांनी अशी काही मोहीम सुरू केली, की वृक्षारोपणासाठी त्यांचे हात समोर येतात आणि ते ‘सेल्फी’पुरते मर्यादित राहतात. झाड जगले की मेले, याच्याशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. या हवामानबदलाचा परिणाम शेतीवरही झाला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च या संस्थेच्या अहवालात हवामान बदलामुळे १५ टक्के उत्पादन घटल्याचे सांगितले आहे. हवामान बदलानुसार नव्याने बियाणे तयार करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. म्हणजेच आता शेतीही धोक्यात आली आहे. विसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली, पण हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होत जाणारा संरक्षक असा ओझोन थर याचे भीषण संकट ओढवले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम म्हणजे हवामानातील बदल आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशातही हवामानबदलाचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत. जागतिक हवामानातील बदलांची वेळीच दखल घेतली गेली नाही व त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत, तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर मोठे संकट उभे राहणार आहे. दिल्लीत ऑक्सिजन पार्कची उभारणी ही या विनाशाकडे नेणाऱ्या आणीबाणीची सुरुवात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2019 रोजी प्रकाशित
तापमानवाढीची आणीबाणी
शहरीकरणासाठी जंगलाचा बळी दिला जात आहे. जंगल नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-11-2019 at 03:11 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxford dictionary declared climate emergency most used word in 2019 zws