जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय पारंपरिक औषधोपचार केंद्राचे उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डब्ल्यूएचओचे अध्यक्ष डॉ. ट्रेडोस घेब्रेसस यांच्या उपस्थितीत झाले. या केंद्राची घोषणा डॉ. घेब्रेसस यांनी ३ नोव्हेंबर २०२० रोजी केली होती. अ‍ॅलोपथीच्या परिघाबाहेरील उपचारपद्धतींसाठीचे डब्ल्यूएचओचे हे जगातील पहिलेच केंद्र ठरते. गुजरातमधील जामनगर येथे ते कार्यान्वित होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेला करोना निर्मूलनाच्या व्यापातून या केंद्राच्या घोषणेसाठी आणि भूमिपूजनासाठी उसंत मिळाली हे थोडे आश्चर्यकारकच. खुद्द करोना हाताळणीच्या परीक्षेत या संघटनेला अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी गुण मिळाले. करोनाचा मूळ विषाणू चीनच्या वुहान शहरातून पहिल्यांदा निसटला, त्या वेळी ती चूक चीनची नव्हे असे प्रमाणपत्र देणाऱ्यांमध्ये डॉ. घेब्रेसस महाशय आघाडीवर होते. तेव्हा यांच्या कार्यक्षमतेविषयी फार काही लिहावे अशी परिस्थिती नाही. राहिला विषय तो या पारपंरिक औषधोपचार केंद्राचा. भारतासह आशियात आणि आफ्रिकेमध्ये पारंपरिक मुळौषधी, पारंपरिक उपचारपद्धती यांचा वापर खूप अधिक होतो हे मान्यच. पण त्यांच्यासाठी एखादे जागतिक दर्जाचे केंद्र उभारण्याआधी जागतिक दर्जाचे संशोधन, तपासण्या- फेरतपासण्या, चाचण्या- फेरचाचण्या किती प्रमाणात घेतल्या जातात याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते. शास्त्रीय आधार आणि शास्त्रोक्त चिकित्सा या दोन निकषांवर आधुनिक मानके पूर्ण करणारी अ‍ॅलोपथी हीच एकमेव उपचारपद्धती  ठरते. अत्याधुनिक शस्त्रक्रिया, दुर्धर रोगांवर खात्रीशीर इलाज, हृदयविकारांसारख्या गंभीर समस्येवर तातडीचे उपचार याच पद्धतीमध्ये शक्य होतात. इतर उपचार पद्धतींचा भर प्रतिबंध आणि कूर्म व दीर्घकालीन उपचारांवर असतो. परंतु एकदा का उपचारपद्धतींमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद शोधण्याची सवय जडली, की चिकित्सकतेचा संकोच होणे हे ओघानेच आले. भारताच्या बाबतीत आणि विशेषत: विद्यमान सरकारच्या अमदानीत आयुर्वेदाविषयी निष्कारण असुरक्षितता आणि संवेदनशीलता वाढवली जात आहे. पारंपरिक उपचारपद्धतींशी आधारित स्वतंत्र मंत्रालयच या सरकारने सुरू केले, ते बहुधा याच भूमिकेतून. वैद्यकीय उपचारपद्धती ही प्रतिबंधात्मक (प्रिव्हेंटिव्ह) आणि उपचारात्मक (रेमेडियल) असणे अपेक्षित असते. आयुर्वेदामध्ये प्रतिबंधात्मकतेवर आणि सत्त्वपूर्ण व निरोगी राहणीमानावर भर दिला जातो. पण कोलेस्टेरॉल किती वाढले, रक्तातली शर्करापातळी किती आहे, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे या व अशा अनेक चाचण्या घेतल्या जात नाहीत किंवा त्यांविषयीचे निकष प्रमाणबद्ध नाहीत. बहुतेक सारा भर हा लक्षणांवर असतो. प्रमाणीकरण आणि सातत्याने चिकित्सा व दुरुस्त्या हे अ‍ॅलोपथीच्या यशाचे गमक आहे. आयुर्वेद किंवा इतर बहुतेक उपचारपद्धतींमध्ये सारे काही प्राचीन, पारंपरिक व त्यामुळे पवित्र वगैरे असल्यामुळे प्रश्न विचारण्याचीच सोय राहात नाही. प्राचीनतेकडून आधुनिक काळात झालेल्या बदलांशी सुसंगत असे काही पारपंरिक उपचारपद्धतींमध्ये आढळून येत नाही. तरीही अशा केंद्रासाठी केंद्र सरकार आणि डब्ल्यूएचओ यांनी पुढाकार घेतला आहे. चाचणी पुरावे, विदा पृथक्करणाचा आधार घेऊन या उपचारांना आधुनिक साज चढवण्याचा केंद्र सरकार आणि डब्ल्यूएचओचा मानस आहे. पण तसे करताना अ‍ॅलोपथीप्रमाणेच अपयश कबूल करून त्यात सुधारणा करून पुढे जाण्याची सवयही या पद्धतींच्या पुरस्कर्त्यांना अंगी बाणवावी लागेल.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता