राजकारणविषयक चर्चांमध्ये खरे, कळीचे, गैरसोयीचे मुद्दे टाळणे आज ज्यांना जमते, तेच राजकारणात यशस्वी होताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायत निवडणुकांत मोठी मजल मारूनही हा पक्ष तोंडघशी पडत असल्याचे चित्र दिसले; याचे कारण राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वपक्षीय खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी. नथुराम गोडसेची भूमिका २०१७ सालात कोल्हे यांनी ज्या चित्रपटात साकारली होती, तो येत्या गांधीहत्यादिनी – ३० जानेवारीस प्रदर्शित होतो आहे, हे या नाराजीचे कारण. ‘‘त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे,’’ हे आव्हाड यांचे ट्वीट आणि पुढे ‘‘त्यांनी ही भूमिका नाकारायला हवी होती’’ असे आव्हाड यांचे म्हणणे, हे दोन्ही कोल्हे यांच्यावर रोख धरणारे आहे. त्यास कोल्हे यांच्याकडून जे उत्तर अपेक्षित होते, तेच मिळालेदेखील. या उत्तराच्या आशयाचे दोन भाग पाडता येतील. पैकी पहिला भाग खुलासेवजा आणि काहीशा नरमाईच्या सुरातला भासणारा. तो असा की, ही भूमिका आपण पक्षात नव्हतो तेव्हा स्वीकारली होती. दुसरा भाग हा सर्वच उदारमतवादींच्या अपेक्षेला १०० टक्के न्याय देणारा. तो असा की, भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्य यांत गल्लत करायची नसते आणि कलाकाराला कोणतीही भूमिका करण्याचे स्वातंत्र्य असते व असले पाहिजे. कोल्हे यांचे उत्तर याच आशयाचे आहे आणि त्याचे स्वागतही झाले आहे. दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी आयुष्यभर जपलेले समतावादी विचार व त्यानुसार परिवर्तनवादी चळवळीस वेळोवेळी लावलेला हातभार, यांच्याशी ‘‘बाई, वाड्यावर या’’ छापाच्या त्यांच्या भूमिकांची गल्लत कुणी कधी केली नाही. नायकनायिकांचा सत्शीलपणा अधिक उजळून काढण्यासाठीची नाट्यपूर्ण योजना म्हणजे खलनायक, असे समीकरण असलेल्या काळात सदाशिव अमरापूरकरांनीही, पडद्यावर खलभूमिका करून आयुष्यभर राज्यघटनेतील पुरोगामी तत्त्वांशी बांधिलकी जपली. हे दोघे राजकारणाच्या वाटेला न जाता समाजकारणात राहिले – आणि कोल्हे पक्षप्रवेशानंतर अल्पावधीत खासदार झाले- हा फरक तसा तपशिलाचाच म्हणायला हवा. म्हणजेच एवढ्यावर हा वाद संपायला हवा. तसे झालेले नाही, याचे कारण पूर्णत: निराळे. खरे प्रश्न या वादात विचारलेच गेले नाहीत, हे काहींनी ओळखल्यामुळे वाद सुरू राहिला. खुनाचे समर्थन होऊ शकते का ? ज्या महात्मा गांधींसाठी आजही भारत ओळखला जातो, त्यांच्या खुन्याने आपल्या कृत्याचे कितीही समर्थन केले, तरी त्यावर आधारलेले नाटक / चित्रपट हे कलात्मक अभिव्यक्ती ठरतात की निव्वळ एका हीन (म्हणजे जगभरात आजही हीनच ठरणाऱ्या) प्रवृत्तीचा प्रचार? नथुरामला खलनायक न मानता नायक ठरवू पाहणाऱ्या प्रचारयुक्त्या कोण करते आहे आणि कशासाठी ? कुठल्या प्रवृत्तींच्या प्रचारासाठी आपण काम करतो आहोत, याचे भान सर्वांना सर्वकाळ असायला हवे की नाही? – असे जुनेच, पण अत्यंत कळीचे प्रश्न या वादामागे आहेत. किरण माने यांच्याविषयीच्या ताज्या वादात, त्यांची शिवराळ भाषा असमर्थनीयच असल्याचे बहुतेकांनी नमूद केले; मग खुनाच्या कृत्याचे समर्थन कोण करते आहे ? तेव्हा कोल्हे यांच्या भूमिकेविषयीचा वाद मागे पडेलही; पण हत्यासमर्थनाच्या आजही दिसणाऱ्या प्रवृत्तीचा वाद कसा संपणार ?
भूमिका आणि प्रवृत्ती
दुसरा भाग हा सर्वच उदारमतवादींच्या अपेक्षेला १०० टक्के न्याय देणारा. तो असा की, भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्य यांत गल्लत करायची नसते आणि कलाकाराला कोणतीही भूमिका करण्याचे स्वातंत्र्य असते व असले पाहिजे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-01-2022 at 00:13 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political inconvenient issues ncp swapakshi mp and actor amol kolhe role of nathuram godse gandhi assassination day akp