ब्राझीलच्या अध्यक्षपदी जाइर बोल्सोनारो यांची निवड लोकशाही मार्गाने झालेली असली, तरी ते स्वत: लोकशाही कितपत टिकवतील याविषयी तेथील विश्लेषक, भाष्यकार आणि विरोधकांच्या मनात भीतीयुक्त शंका आहे, कारण यापूर्वी सात वेळा ब्राझीलच्या संसदेवर निवडून गेले असले, तरी हुकूमशाही आणि बंदूकराजला ते आदर्श मानतात. संशयित गुन्हेगारांना ठार मारावे, असे पोलिसांना सुचवत असतात. महिला, कृष्णवर्णीय आणि समलिंगींची जाहीर निंदानालस्ती करतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती अमेरिकी अध्यक्षपदावर कशी काय निवडून येऊ शकते, असा प्रश्न अमेरिका आणि अमेरिकेबाहेरही कित्येकांना आजही पडतो. तीच बाब बोल्सोनारो यांना लागू होते. सहसा अशा व्यक्ती त्यांच्या स्वत:च्या लोकप्रियतेपेक्षा किंवा धोरणांपेक्षा नकारात्मक मतदानातून निवडून येतात. ब्राझीलमध्ये असेच काहीसे घडलेले आहे. गेली १३ वर्षे या देशात लेफ्टिस्ट वर्कर्स पार्टी (पीटी) या डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे सरकार होते. या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक नवप्रगत ‘ब्रिक्स’ देश म्हणून ब्राझील नावारूपाला आला. विश्वचषक फुटबॉल २०१४ आणि रिओ ऑलिम्पिक २०१६ सारख्या मोठय़ा आणि महागडय़ा स्पर्धा ब्राझीलने पाठोपाठ आणि यशस्वीरीत्या भरवून दाखवल्या; पण या मोठय़ा अर्थव्यवस्थेचा पाया भ्रष्टाचाराने पोखरू लागला होता. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराला उत्तेजन देणे आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे सत्कर्म सत्ताधीशांकडूनच सर्वाधिक घडले! २०१६ मध्ये तत्कालीन अध्यक्षा डेल्मा रूसेफ यांना वित्तीय तुटीची खरी आकडेवारी दडवल्याबद्दल महाभियोग चालवून पदच्युत केले गेले. त्यांच्यानंतर अध्यक्ष बनलेले मिकेल टेमेर यांच्याविषयी ब्राझिलियन जनतेमध्ये प्रचंड नाराजी होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोल्सोनारो यांच्या सोशल लिबरल पार्टीला (पीएसएल) ५५.२ टक्के मते मिळाली, तर ‘पीटी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार फर्नाडो हदाद यांना ४४.८ टक्के मते मिळाली. ६३ वर्षीय बोल्सोनारो हे माजी लष्करी अधिकारी आहेत. बाजारानुनयी धोरणे आणि अनेक सामाजिक मुद्दय़ांवर (उदा. गर्भपात) प्रतिगामी भूमिका घेणाऱ्या या गृहस्थांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या धोरण आणि आकलनसाधम्र्यामुळे ‘ट्रम्प ऑफ द ट्रॉपिक्स’ असेही संबोधले जाते. एरवी अमेरिकाविरोधातून डाव्या विचारसरणीच्या सरकारांना पसंती देणाऱ्या लॅटिन अमेरिका खंडात ब्राझीलच्या निमित्ताने प्रथमच उजव्या विचारसरणीचे सरकार सत्ताग्रहण करत आहे. ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि प्रभाव पाहता याची झळ बाहेरच्या जगाला बसणार हे उघड आहे. ब्राझीलमध्ये गुन्ह्य़ांचा दर अभूतपूर्व वाढलेला आहे. गुन्ह्य़ांशी संबंधित ६४ हजार नागरिकांना गेल्या वर्षी प्राण गमवावे लागले. त्यावर बोल्सोनारो यांच्याकडे उतारा तयार होता. ‘पोलिसांना अर्निबध अधिकार देणे आणि प्रत्येक नागरिकाला पिस्तूल किंवा बंदूक बाळगण्याची परवानगी देणे’ हा तो उतारा! अ‍ॅमेझॉन खोऱ्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील वर्षांवनात बोल्सोनारोंना ‘विकास’ करायचा आहे. त्यासाठी आधी वातावरणबदलाविषयीच्या पॅरिस परिषदेतून बाहेर पडावयाचे आहे! पण हे सगळे पाहात राहण्याशिवाय ब्राझीलसमोर दुसरा पर्याय नाही. गेली तेरा वर्षे डाव्या सत्ताधीशांनी शुचितेच्या केवळ गप्पा मारल्या, पण शुचिता आचरणात आणली नाही. परिणामी लुइझ इनॅसियो लुला डा सिल्वासारख्या माजी अध्यक्षाला तुरुंगात जावे लागले. आणखी डझनभर राजकारणी तुरुंगात गेले. भ्रष्टाचाराची वाळवी ब्राझीलमधील जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाला लागलेली जनता पाहात होती. या भ्रष्टाचाराबद्दल संतप्त बनली होती. काही वर्षांपूर्वी विक्रमी आर्थिक विकास साधूनही त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत झिरपले नाहीत, हेही स्पष्ट झाले. भ्रष्टाचारमुक्त ब्राझीलचा नारा बोल्सोनारो यांनी दिला. त्या वचनावर या फुटबॉलप्रेमी देशातील बहुसंख्य मतदार स्वार झाले. गोल केल्याचे समाधान जनतेला मिळाले.. भविष्यात तो स्वयंगोल ठरला तरी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा