भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमन) यांनी राज्यात आगामी निवडणुका एकत्र लढण्याचे जाहीर केले. दलित आणि मुस्लीम यांना संघटित करण्याचा आंबेडकर आणि ओवेसी यांचा प्रयत्न आहे. रामदास आठवले हे भाजपच्या कळपात गेल्यापासून दलित चळवळीत आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रकाश आंबेडकर प्रयत्न करीत आहेत. भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर आंदोलन पुकारून नेतृत्व आपल्याकडेच राहील अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी पावले टाकली होती. काँग्रेस किंवा भाजपपासून समान अंतर ठेवण्याचा दावा आंबेडकर हे नेहमी करतात. पण त्यांच्या राजकीय खेळीबद्दल काँग्रेसकडून नेहमीच संशय व्यक्त केला जातो. आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न असताना त्यांनी वेगळा प्रयोग करण्याचे जाहीर केले आहे. त्यांना साथ देणारे असाउद्दिन ओवेसी यांच्याबाबतची नेहमी वेगळी चर्चा असते. पारंपरिकदृष्टय़ा मुस्लीम मतदार हा काँग्रेसबरोबर होता. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादानंतर मुस्लीम मतदार काँग्रेसपासून दूर गेला.गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा एमआयएमला चांगला पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये एमआयएमची ताकद वाढू लागली. ओवेसी हे भाजपला मदत होईल, अशा पद्धतीने राजकीय खेळी खेळत असल्याची टीका होऊ लागली. राज्यात एमआयएमचे दोन आमदार, औरंगाबाद, नांदेडसह काही पालिकांमध्ये लक्षणीय नगरसेवक निवडून आले. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांमुळे काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. एमआयएमकडून होणारे मतविभाजन शेवटी भाजपच्याच पथ्थ्यावर पडले. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या विश्वासार्हतेबद्दल यामुळेच शंका घेतली जाते. ही युती म्हणजे भाजपचे पिल्लू नाही ना, असा शंकेचा सूर उमटू लागला. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला अकोला-वाशीम वा विदर्भाचा काही भाग वगळता फार काही यश मिळालेले नाही. लातूर, परभणी या मराठावाडय़ातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमची डाळ शिजली नाही. भिवंडी वा मालेगावमध्येही मुस्लीम मतदारांनी एमआयएमला थारा दिला नाही उलट काँग्रेसला मते दिली. आंबेडकर आणि ओवेसी यांची ताकद मर्यादित असली तरी नवी राजकीय आघाडी काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन करू शकते. आंबेडकर आणि ओवेसी या दोघांवरही होणाऱ्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर नव्या आघाडीच्या पर्यायाबाबत लोकांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान असेल. राज्यात यापूर्वीही दलित व मुस्लीम समीकरण तयार करण्याचे झालेले प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. आंबेडकर-ओवेसी कितपत यशस्वी होतात यावर काँग्रेस वा भाजपचे भवितव्य अवलंबून असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा