तुम्ही जोवर प्रयत्न करणे सोडत नाहीत, तोवर तुम्ही हरलेले नसता. दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने केलेले हे ट्वीट. तिची मनोभूमिका व्यक्त करणारे; पण त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत असे काय झाले की तिने प्रयत्न सोडले, हार मानली हा मोठा प्रश्नच आहे. प्रत्युषाने आत्महत्या केली की तिला त्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, असे प्रश्न सध्या माध्यमांतून चच्रेत आहेत. त्यात प्रेक्षकांना जोवर रस आहे तोवर ही चर्चा माध्यमांना टीआरपी मिळवून देईल. त्यानंतर ती विरून जाईल. वस्तुत: प्रत्युषासारख्या तरुण अभिनेत्रीला आपले जीवन का संपवावेसे वाटले हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. चर्चा व्हायला हवी ती यावर, कारण तो केवळ प्रत्युषापुरताच मर्यादित नाही. तिच्यासारख्या अनेक तरुणींच्या जीवन-मरणाशी त्याचा संबंध आहे. बालिका वधू मालिकेने प्रत्युषाला लोकप्रिय केले. दूरचित्रवाणी वाहिन्यांची ही मर्यादा आहे की त्यातून येणारी लोकप्रियता अशाश्वत असते. पडद्यावरून जाताच तुम्ही पडद्याआड जाता. आज वाहिन्यांची संख्या वाढलेली आहे. त्यावरील मालिकांची संख्या वाढलेली आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कलाकार लागतात. ही कलाकार मंडळी येतात ती छोटय़ा-मोठय़ा शहरांतून. एखाद्या भूमिकेने एखाद्याला लोकप्रियता दिली की, तो कलाकार पाहता पाहता तारा बनतो. ती जीवनशैली त्याला स्वीकारावीच लागते. निमशहरांतून आलेल्यांसाठी मानसिक बोजाच असतो तो. पुन्हा त्याची तारांकितता त्या मालिकेपुरतीच. मालिका संपते, तारा विझतो. हे तसे सर्वच क्षेत्रांत घडत असते. स्पर्धा एवढी मोठी आहे, धावायचे इतके वेगात आहे, की अनेकांची त्यात दमछाक होते, काही मागे फेकले जातात. त्यातून मग जिवाला निराशा, औदासीन्य, विषाद, न्यूनता व्यापून टाकते. या तरुण-तरुणींच्या आयुष्यातील प्रेमप्रकरणे हा इतरांसाठी तिखटमीठ लावून चघळण्याचा आंबटशौकी उद्योग असू शकतो. पण त्यांच्यासाठी ते प्रेम हेच वेदनाशामक असते. त्यात ते विसावा शोधतात, पण ते लंगडय़ाने पांगळ्याकडे आधार मागण्यासारखेच. सगळेच या ना त्या विकाराची शिकार. अभिनेत्री जिया खान हे याचेच उदाहरण. प्रेमभंग हे तिच्या आत्महत्येचे वरवरचे कारण होते. ती बळी होती नराश्याची. हा एक सर्वसाधारण मानसिक विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आज जगभरातील सुमारे ३५ कोटी लोक या विकाराने ग्रासलेले आहेत. त्यात सर्वच वयोगटांतील व्यक्तींचा समावेश आहे आणि त्यातही महिलांचे प्रमाण अधिक आहे. पण हा आजार लपवण्याकडेच अनेकांचा कल असतो. मध्यंतरी दीपिका पदुकोन हिने आपणही ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात नराश्यग्रस्त होतो असे जाहीर केले होते. हे सांगण्यासाठीही मोठे धाडस हवे. ते तिने दाखविले. या आजारावर तिने तज्ज्ञांचा सल्ला आणि औषधोपचार यांद्वारे मात केली. त्यात तिच्या कुटुंबाने तिला साथ दिली. हे सर्वात महत्त्वाचे. तिला ही साथ मिळाली नसती तर कदाचित तीही नराश्याची बळी ठरली असती. प्रत्युषा ही मुंबईत कुटुंबाविना राहत होती, ही बाब पाहिली की लक्षात येते कुटुंबाची साथ किती मोलाची असते. नराश्य, औदासीन्य, विषाद हा आजार आहे. तो बरा होऊ शकतो, हे कुटुंबातील अन्य सदस्यांनीही समजून घेतले नाही तर मात्र मुले मृत्यूला कवटाळतात. कोणी परीक्षेच्या भयाने, तर कोणी कामाच्या अभावामुळे, कोणी पशाच्या तंगीमुळे, तर कोणी प्रेमभंगामुळे आपले आयुष्य संपवते. ते वाचू शकते, वाचते. प्रत्युषाच्या काळजाला हुरहुर लावणाऱ्या मृत्यूच्या निमित्ताने दीपिकाने दिलेला हा धडा सर्वानीच ध्यानी घेणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा