तसे पाहायला गेल्यास स्पेनचा राफेल नदाल ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू लागला अगदी २००५ पासून. त्या वर्षी फ्रेंच स्पर्धेचे अजिंक्यपद त्याने पटकावले. परंतु तोपर्यंत स्वित्र्झलडचा रॉजर फेडररही विम्बल्डनसारखी सर्वात लोकप्रिय टेनिस स्पर्धा सातत्याने जिंकत होता. मातीचे कोर्ट वगळता नदालला इतरत्र जिंकता येत नव्हते. तर फेडरर तेवढे एक कोर्ट सोडून इतरत्र जिंकत होता. बहुपैलुत्व, नजाकत, लोभस व्यक्तिमत्त्व लाभलेल्या फेडररची लोकप्रियता अर्थातच शिगेला पोहोचली. पण शरीराने पीळदार असलेला नदाल तेव्हा लोकप्रियतेत फेडररच्या आसपासही नव्हता. २००८ मध्ये विम्बल्डनच्या हिरवळीवर एका असामान्य अंतिम लढतीत नदालने फेडररला हरवले. त्या लढतीपासून प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत नदालला आणखी एका प्रतिकूल घटकाचा सामना पुढील काही वर्षे करावा लागला. तो घटक होता दुखावलेल्या फेडरर चाहत्यांचा! विशेषत: विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धामध्ये नदालला कधीही फेडररइतकी वाहवा आणि पाठिंबा लाभला नाही. अशा वेळी खरे तर एखाद्या निष्णात खेळाडूलाही प्रत्यक्ष कोर्टवर नैराश्याने ग्रासणे अगदीच स्वाभाविक. नदालवर याचा परिणाम झाला नाही याची कारणे दोन – स्वत: राफेल नदाल आणि खुद्द रॉजर फेडरर. नदालच्या मानसिक तटबंदीला उपेक्षेमुळे कधीही खिंडार पडले नाही. फेडररच्या नदालविषयीच्या आदरात त्याच्याकडून ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अनेकदा हरूनही खंड पडला नाही. दोघे कट्टर प्रतिस्पर्धी होते, परंतु एकमेकांविषयी तितकाच नितांत आदर बाळगणारेही होते. या दोघांच्या टेनिस कोर्टवरील कौशल्याविषयी आजवर भरपूर लिहून आले, परंतु त्या द्वंद्वाची उंचीच वेगळी होती. या द्वंद्वात स्पर्धा होती, पण असूया नव्हती. एकमेकांना मोकळेपणाने दाद देण्याची ओतप्रोत दानत होती. टेनिसरसिकांचा नदालविषयीचा आकस पुढे पूर्ण संपला नाही, तरी बहुतांश संपुष्टात आला. हा भावनिक बदल घडून आणण्यास कारणीभूत ठरला फेडररचा नदालविषयीचा निर्व्याज आदर. नदालने रविवारी मेलबर्नमध्ये विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावले, त्या वेळी फेडररचे ट्विटरोद्गार होते – ‘तुझ्या युगात तुझ्याबरोबर मी खेळलो हे माझ्यासाठी अभिमानास्पद!’ सुरुवातीला नदाल सतत फेडररची उंची गाठण्यासाठी धडपडत होता. आज त्याच फेडररने नदालचे या शब्दांत कौतुक करावे, हे दोन्ही टेनिसपटूंची महत्ता दर्शवणारेच. शिखरावर असूनही नम्रता, समतोल मन आणि खिलाडूवृत्ती या गुणत्रयीमुळे फेडरर व नदाल महान ठरतात. तर त्यांच्या अभावापायीच नोव्हाक जोकोव्हिचला या दोघांची उंची कधीही गाठता येऊ शकली नाही. २० अजिंक्यपदांपर्यंत फेडरर प्रथम पोहोचला. मग जोकोव्हिच आणि नदाल यांच्यात स्पर्धा होती. नदाल २० अजिंक्यपदांपर्यंत पोहोचलेला दुसरा टेनिसपटू, तर जोकोव्हिच तिसरा. फेडररची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. जोकोव्हिच अजूनही तरुण आहे. पण या दोघांना मागे टाकून अनपेक्षितरीत्या नदाल पुढे गेला आहे. फ्रेंच स्पर्धेत जोकोव्हिच खेळण्याची शक्यता कमी, तर त्या मातीच्या कोर्टवर नदालचे साम्राज्य. त्यामुळे तेथे २२व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदासाठी नदाल प्रयत्न करणार हे नक्की. वय, थकवा, दुखापती, मध्यंतरी कोविडची बाधा, बहुतेक प्रमुख प्रतिस्पर्धी पंचविशीच्या आतले असणे असली आव्हाने नदालसमोर फिकी ठरतात. फेडरर आणि जोकोव्हिचपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा काकणभर अधिक कणखर असल्याचे योग्य बक्षीस नदालला मिळाले आहे.
अन्वयार्थ : शिखरावरचा माणूस!
विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धामध्ये नदालला कधीही फेडररइतकी वाहवा आणि पाठिंबा लाभला नाही.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-02-2022 at 02:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal wins australian open 2022 title zws