निवडणुकींना सामोरे जाताना कोणताही राजकीय पक्ष आपल्याला एकहाती सत्ता मिळावी, असे आवाहन मतदारांना करतो. बहुमत मिळावे, अशी कोणत्याही राजकीय पक्षाची अपेक्षा असते. निवडणुकीत कितपत यश मिळेल याचा राजकीय नेत्यांना अंदाज येत असतो. तरीही आम्हालाच बहुमत मिळणार, असा दावा केला जातो. देशात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाला पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याचे वेध लागले आहेत. गेल्याच आठवडय़ात अविश्वास ठरावावरील चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरणनिर्मिती काँग्रेसने सुरू केली आहे. नव्या व जुन्या नेत्यांचा मेळ साधत काँग्रेस कार्यकारी समितीची रचना करण्यात आली. कार्यकारी समितीच्या पहिल्याच बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. १९९८ मध्ये मध्य प्रदेशातील पंचमढीमध्ये झालेल्या अधिवेशनात काँग्रेसने आघाडी करण्याच्या विरोधात राजकीय ठराव केला होता. पण पुढे काँग्रेसला परिस्थितीची जाणीव झाली आणि २००४च्या लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सत्ता काबीज केली. पुढे हाच कल कायम राहिला आणि २०१९च्या निवडणुकीतही आघाडीशिवाय काँग्रेसला पर्याय नाही. सध्या काँग्रेसची राजकीय अवस्था बिकटच आहे; त्यातूनच समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या तर मात्र राहुल गांधी हाच पंतप्रधानपदाचा चेहरा असेल हे पक्षाने अधोरेखित केले. याचाच अर्थ मित्र पक्षांनी बाजी मारल्यास राहुल गांधी यांना पदाचे स्वप्न विसरावे लागेल. काँग्रेस पक्षाने २००च्या आसपास जागा जिंकल्यास सत्ता संपादनाची संधी असल्याचा सूर कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. २००४ मध्ये १४५ जागाजिंकलेल्या काँग्रेसला सत्ता मिळाली होती. यंदा काँग्रेसने २०० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. १९८४ मध्ये सहानुभूतीच्या लाटेत ४०० पेक्षा जास्त जिंकणाऱ्या काँग्रेसला आता २०० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करावे लागते यावरून काँग्रेसच्या धुरिणांना वास्तवाची जाणीव झाली हेच स्पष्ट होते. सध्या ४८ जागा असलेल्या काँग्रेसला २०० जागांचा पल्ला गाठणे म्हणजे मोठे आव्हान आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या लोकसभेच्या सुमारे २०० जागा असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत आहे. याचा अर्थ उर्वरित ३४३ मतदारसंघांत पक्षाला चांगली कामगिरी करावी लागेल. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील यश-अपयशावर केंद्रातील सत्तेची गणिते ठरतात. उत्तर प्रदेशात गोरखपूर, फुलपूर आणि कैराना पोटनिवडणुकांच्या यशानंतर समाजवादी पार्टी-बहुजन समाज पक्ष-काँग्रेस-राष्ट्रीय लोकदल अशी समविचारी पक्षांची आघाडी करण्याचे घाटत आहे. या आघाडीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांसह आणखी चार-पाच मतदारसंघच काँग्रेसच्या वाटय़ाला येऊ शकतात. म्हणजे उत्तर प्रदेशातून चांगले संख्याबळ मिळण्याची शक्यता नाही. मोठय़ा राज्यांमधील घटलेला जनाधार लक्षात घेता अन्य राज्यांमध्ये यश मिळवावे लागेल. पण तशीही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी, अल्पसंख्याक आदी वर्गामध्ये नाराजीची भावना असली तरी ती मतांमध्ये किती परिवर्तित होते हे महत्त्वाचे आहे. २७२चा जादूई आकडा स्वबळावर गाठणे शक्य नसल्याची कबुलीच काँग्रेस पक्षाने दिली आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत किती जागा जिंकू शकतात याचा वर्तविण्यात आलेला अंदाज लक्षात घेता एकेकाळी सत्तेची मस्ती असलेले काँग्रेस नेते जमिनीवर आले हेच स्पष्ट होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा