अमेरिकेतील रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे पाहून कट्टर उजव्या रिपब्लिकनांनाही धक्का बसला असेल यात शंका नाही. त्याहून अधिक जोराचा धक्का हा खचितच अमेरिकेतील पुरोगाम्यांना बसला असेल. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले, तेव्हा त्यांना कोणीही फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. तेथील पक्षांच्या प्राथमिक निवडणुकांत असे अनेक इच्छुक आपले नशीब आजमावून पाहत असतात. त्यातीलच हा एक अब्जाधीश महाबिल्डर आणि वाचाळांचा मेरुमणी. विचाराने कडवा सनातनी. एवढा की क्लू क्लक्स क्लॅनसारख्या अतिरेकी वंशवादी संघटनेलाही आपला वाटावा असा. स्वत: ट्रम्प यांनाही या संघटनेचा आपणांस पाठिंबा असण्यात काही गैर आहे असे वाटत नव्हते. अशा उमेदवाराला रिपब्लिकन मतदारही दारात उभे करणार नाहीत, असा अनेकांचा होरा होता. पण एकेका संस्थानातील निवडणुकीने तो चुकीचा ठरवत नेला. त्यातही आशेचा एक किरण होता. तो म्हणजे टेड क्रूझ. एरवी एक अब्राहम लिंकन सोडले तर रिपब्लिकन पक्षाचे सगळेच नेते म्हणजे यास झाकून त्यास काढावे असेच. पण या वेळी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानेच क्रूझ यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र मंगळवारी अचानक क्रूझ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. टेड क्रूझ यांचे वडील रफाएल क्रूझ हे क्युबातून आलेले स्थलांतरित. त्यांचे आणि जॉन एफ. केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड याचे संबंध होते अशी बातमी एका टॅब्लॉइड दैनिकात प्रसिद्ध झाली होती. ट्रम्प यांनी त्याचे भांडवल केले नसते, तरच नवल. अशा प्रकारच्या बदनामी मोहिमेची ‘फलश्रुती’ क्रूझ यांच्या माघारीत झाली. ट्रम्प यांच्यासमोर अजूनही ओहायोचे गव्हर्नर जॉन कसिच शड्डू ठोकून उभे असले, तरी त्यांचे आव्हान अगदीच फुसके आहे. एकंदर आता ट्रम्प हे अध्यक्षपदाचे रिपब्लिकन उमेदवार म्हणून जाहीर होण्याची औपचारिकता तेवढी बाकी असून आता त्यांची लढाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्याशी होते, की बर्नी सँडर्स यांच्याशी हे स्पष्ट होणे तेवढे बाकी आहे. अशी लढाई होण्याची शक्यता निर्माण होणे ही बाबच आजच्या अमेरिकी समाजाच्या वैचारिकतेबद्दल शंका निर्माण करणारी आहे. ‘ओबामा यांच्या कालखंडात अमेरिकी अर्थव्यवस्थेचा चेहरा समाजवादाकडे झुकला आहे. त्यांची अफगाणिस्तान, पाकिस्तान, सीरिया, लिबिया यांबाबतची धोरणे धरसोडीची आहेत. रशियाचे पुतिन त्यांना भीक घालत नाहीत. चीन अमेरिकेपुढे स्पर्धक म्हणून उभा आहे. देशातील आघाडीवर स्थलांतरित, सरकारी अनुदानावर जगणारे वाढत चालले आहेत आणि त्यांचा भार सर्वसामान्य अमेरिकी करदात्यांना सोसावा लागत आहे. यामुळे अमेरिका दुबळी होत चालली आहे. तिला सावरायचे असेल, तर तेथे ट्रम्प यांच्यासारखाच नेता पाहिजे,’ अशा प्रचाराची भुरळ या उजव्या मतदारांवर पडली आहे. बुश यांनी अल कायदाचे भय दाखविले होते. ट्रम्प हे आयसिसची भीती दाखवत आहेत. बुश यांच्या काळात सनातनी धर्मवादाला बळ देण्यात आले होते. ट्रम्प यांनी तो विचार पुन्हा एकदा आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला आहे. यातून अमेरिकी समाजातील तालिबानी प्रवृत्ती चेकाळल्या असून, त्यांचा दबाव तुलनेने मवाळ असलेल्या रिपब्लिकनांवरही वाढत आहे. ट्रम्प यांची विजयाकडील वाटचाल सुकर झाली ती यामुळे. ट्रम्प यांनी स्वत:स कडवा राष्ट्रवादी नेता म्हणून लोकांसमोर आणले आहे. महिला, त्यांचा गर्भपाताचा अधिकार, समलिंगी येथपासून अल्पसंख्याक, स्थलांतरित, तिसऱ्या जगाचे नागरिक, गरीब, कातडीचा रंग काळा वा विटकरी असणारे अशा सगळ्यांच्या विरोधात हा राष्ट्रवाद आहे. त्याला यश मिळणे हा अमेरिकी स्वप्न नावाच्या संकल्पनेचा पराजय असेल. आज अमेरिका त्या दु:स्वप्नाच्या अगदी जवळ उभी आहे.