रुबल या रशियाच्या चलनामध्ये नैसर्गिक वायू खरेदीची देयके अदा करण्यास नकार दिल्यामुळे पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा वायूपुरवठा बंद केला गेला. हा पुरवठा गाझप्रॉम या रशियाच्या सरकारी वायूनिर्मिती व वहन कंपनीकडून होत असे. २६ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्या देशाशी लष्करी मार्गाने भिडण्याची शक्यता नव्हती, तेव्हा निर्बंधांचा मार्ग अनुसरला गेला. निर्बंध लादणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर होती अर्थातच अमेरिका. त्याच वेळी रशियन आक्रमणाची झळ आणि संभाव्य धोका पोहोचू शकेल असे युरोपातील अनेक देश मात्र सरसकट निर्बंध लादावेत की नाही, या संभ्रमात होते. याचे कारण रशियन नैसर्गिक वायूवर अवलंबून असलेल्या युरोपिय देशांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळेच आपण त्या देशाकडून थोडे खनिज तेल घेण्याच्या निर्णयावर टीका झाली, त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऊर्जागरज भागवण्यासाठी युरोपिय देश आजही रशियाकडून घेत असलेल्या तेल-वायूचा मुद्दा उपस्थित केला होता. या बहुतेक देशांची पंचाईत अशी, की ऊर्जेच्या बाबतीत रशियाशी आणि व्यापाराच्या बाबतीत चीनशी सौदे करताना त्यांना या देशांतील मानवी हक्कांची गळचेपी किंवा दमनप्रेमी शासक दिसत नाहीत. रशियाकडून आजही नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या देशांमध्ये प्रमुख आहेत जर्मनी आणि इटली. पोलंड आणि बल्गेरिया या ‘नाटो’ सदस्य असलेल्या देशांचा पुरवठा रशियाने बंद केलेला असला, तरी त्याचा या देशांना फार तोटा होणार नाही. डॉलर किंवा युरोमध्ये रशियाला व्यवहार करणे निर्बंधांमुळे जवळपास अशक्य असल्यामुळे वायू व तेलखरेदीचे व्यवहार रुबलमधून होतात. गाझप्रॉमबॅंक या बँकेत रुबल खाते आणि युरो खाते अशी दोन खाती उघडून हा व्यवहार होतो. तो निर्बंधांमुळे करता येणार नाही, असे युरोपिय समुदायाने म्हटले असले, तरी गुरुवारपर्यंत जवळपास दहा युरोपिय कंपन्यांनी गाझप्रॉमबँकेत खाती उघडून, रुबलमध्ये देयके सादर करून निर्बंधांना बगल दिलेली आहे. कधीतरी हा खेळही थांबवावा लागेल. सध्या उन्हाळा असल्यामुळे युरोपची वायू मागणी निम्नस्तरावर आहे. त्यामुळे नैसर्गिक वायूच्या बाबतीत ते तितके अगतिक नाहीत. रशियाविषयी असे म्हणता येत नाही. दोन महिने उलटले तरी त्यांना काही प्रमाणात मारियुपोलचा अपवाद वगळता एकही निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. युक्रेनचे नुकसान जबर होत असले, तरी त्यावर विजयाचा – किमान आग्नेय युक्रेन आपल्या आधिपत्याखाली आणण्याचा मुद्दा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. या प्रतिष्ठेची मोठी किंमत रशियालाही चुकती करावी लागत आहे. करोनामुळे तेल व वायूची मागणी घटल्यामुळे याआधीच रशियन अर्थव्यवस्था जर्जर झाली होती. त्यात हा युद्धाचा जीवघेणा खेळ सुरू केल्यामुळे आणि त्यांतून निर्बंध लादले गेल्यामुळे रशियाला रोजचा खर्च भागवण्यासाठी सवलतींमध्ये तेल विकणे, स्वतःच्या चलनात नुकसान सोसून वायू विकणे हे करावे लागत आहे. जवळपास २३ युरोपिय देशांना रशियाकडून वायू पुरवला जातो. पण रुबलमध्ये देयके चुकती होत नाहीत म्हणून प्रत्युत्तरादाखल त्यांनी आणखी काही देशांचा पुरवठा बंद केला, तर सद्यःस्थितीत तो रशियासाठीच आत्मघात ठरेल.
अन्वयार्थ : प्रत्युत्तर की आत्मघात?
करोनामुळे तेल व वायूची मागणी घटल्यामुळे याआधीच रशियन अर्थव्यवस्था जर्जर झाली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 29-04-2022 at 03:14 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia s economy in crisis after war zws