परीक्षेच्या निकालात अनपेक्षितपणे अनुत्तीर्ण होण्याची वेळ आली, तर ताबडतोब पुन्हा परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविकहोते. दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता काही लाखांत गेली आहे. या परीक्षेचा निकालही गेल्या काही वर्षांत कमालीचा सुधारला आहे. विद्यार्थ्यांना नववीपर्यंत अनुत्तीर्ण होण्याचा अनुभवच न देण्याच्या शासकीय धोरणाने या परीक्षेत नापास होण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित पुन्हा परीक्षा देता येईल, अशी यंत्रणा महाराष्ट्राने निर्माण केली. यापूर्वी कर्नाटक शासनाने अशा प्रकारची योजना राबवण्यास सुरुवात केली असली, तरीही महाराष्ट्राने ती दर्जेदारपणे राबवली, हे नाकारण्याचे कारण नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्यानेही या कार्यक्षमतेची दखल घेतली असून आता ही पद्धत संपूर्ण देशभर लागू करण्याबाबत विचार सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याऐवजी लगेच पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने नुकताच केलेला अभ्यास विसरून जाण्याची शक्यताही कमी आणि त्यातील जे अभ्यास गांभीर्याने करतात, त्यांना पुन्हा एकदा यशाच्या पायरीपर्यंत जाण्याची सुविधा अधिक उपयोगी ठरणारी आहे. फेरपरीक्षेची ही योजना सीबीएसई आणि आयसीएसई या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. जे. पी. नाईक यांच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञाने देशातील शिक्षणाचे धोरण ठरवण्यात एके काळी अतिशय मोलाचे योगदान दिले होते. त्यातून, दोन वर्षे कनिष्ठ महाविद्यालय आणि नंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अशी नवी पद्धत देशपातळीवर रूढ झाली. त्यामुळे दहावीच्या निकालावर नंतरच्या दोन वर्षांत कोणत्या विद्याशाखेची निवड करायची हे ठरवणे आवश्यक ठरू लागले. काही अपरिहार्य कारणांमुळे परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची वेळ येणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेमुळे वर्ष वाया न जाता हवी ती विद्याशाखा निवडणेही शक्य होऊ शकेल. या फेरपरीक्षेची खरी गरज बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने पुढील वर्षांपासून बारावीसाठीही त्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. मात्र त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांत दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्रात मात्र विद्यार्थ्यांचे फुकट जाणारे वर्ष वाचवण्यासाठी दहावी आणि बारावीचे निकाल ३१ मेपूर्वी लागणे आवश्यक आहे. बारावीनंतरच्या शिक्षणाचे नियोजन करण्यासाठी राज्यातील सगळ्या विद्यापीठांनी एकत्र येऊन त्यांच्या वेळापत्रकांमध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. दहावीच्या अनुत्तीर्णाना मिळालेली फेरपरीक्षेची संधी जर बारावीच्याही विद्यार्थ्यांना मिळाली, तर त्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्वाचे वर्ष वाया जाणार नाही. परंतु विद्यापीठे आणि विविध अभ्यासक्रमांची वेळापत्रके, त्यासाठीच्या केंद्रीय पूर्वचाचण्या या सगळ्यांची वेळापत्रके सुसूत्र करणे फार कठीण आहे. फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळण्यासाठी विद्यापीठांच्या नियमांमध्येही बदल करणे भाग आहे. ही खूप मोठी प्रक्रिया पुढील वर्षीच्या परीक्षेपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे आहे.
फेरपरीक्षेचा फेरा
दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता काही लाखांत गेली आहे.
Written by रत्नाकर पवार
आणखी वाचा
First published on: 30-10-2015 at 01:58 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second option for students