माहितीची कोणतीही खातरजमा न करता, जाहीरपणे एखादे विधान करण्याचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात, याचे भान निदान मेधा पाटकर यांच्यासारख्या अनेक दशके सामाजिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला असणे अपेक्षित आहे. नामवंत व्यक्तींनी अतिशय सैलपणे एखादे विधान करण्याची उदाहरणे आपल्याकडे कमी नाहीत. मनात अशा व्यक्तींबद्दल विश्वासार्हता असल्यामुळे त्यांचे विधानच खरे धरून चालण्याचा धोका सर्वसामान्यांच्या बाबतीत अंमळ अधिकच असतो. देशातील काही महत्त्वाच्या वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची मालकी ‘व्हॅटिकन’कडे असल्याचे पूर्णत: चुकीचे आणि विसंगत विधान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काही काळापूर्वी केले होते. अशीच विधाने करणाऱ्या आणखीही अनेक जणांच्या विश्वासार्हतेबाबत सामान्य माणसाला अलीकडे फारशा शंका येत नाहीत. पण मेधा पाटकर यांच्याबाबतीत तसे नाही. कोणतेही विधान जाहीरपणे करण्यापूर्वी त्याची सत्यासत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे असते, विशेषत: असे विधान सार्वजनिक ठिकाणी केले जाते, तेव्हा त्याचे परिणाम अधिक होण्याची शक्यता असते, याचे तारतम्य मेधा पाटकर यांना आहेच, यात कोणतीही शंका नाही. तरीही पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चीनमधील वुहान येथील ज्या प्रयोगशाळेतून करोनाच्या विषाणूचा उगम झाला आणि त्याने साऱ्या जगाला गेली दोन वर्षे वेठीला धरले ती प्रयोगशाळा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या मालकीची आहे, असे विधान केले आहे. तसा या विधानाला दखल घ्यावी इतका अर्थ नसला, तरी मेधा पाटकर यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक नेतृत्वाने ते करणे खरोखरच आश्चर्याचे आहे. ते करण्यापूर्वी मेधा पाटकर यांनी त्याची सत्यासत्यता तपासली होती का, उद्या कुणी त्यांना अगदी कुतुहलापोटी त्याबद्दल विचारणा केली तर तसे पुरावे त्यांच्याकडे आहेत का, असे प्रश्न यासंदर्भात उपस्थित होऊ शकतात. मेधा पाटकर एखादे विधान करतात तेव्हा त्यांनी ते पूर्ण जबाबदारीने आणि फक्त आपल्याच नाही तर जगातील कोणत्याही समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच केलेले असते, ही त्यांची जनमानसातील प्रतिमा आहे. अलीकडच्या काळात समाजात मुद्दामहून गोंधळ उडवून देणाऱ्या जल्पकांच्या टोळ्या काही कमी नाहीत. याच कामासाठी ‘नेमलेले तथाकथित विचारवंत’ही कमी नाहीत. दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीच्या माहितीचा जाणीवपूर्वक प्रसार करणे हेच त्यांचे काम असते. गोबेल्सचे हे तंत्र भारतासारख्या देशातील लाखो अंधभक्तांवर ताबडतोब परिणाम करते. अशा कोणत्याही माहितीची सत्यासत्यता तपासण्याची या अंधभक्तांना गरज वाटत नाही. मेधा पाटकर यांनी उल्लेख केला आहे ती चीनमधली प्रयोगशाळा खरोखरच बिल गेट्स यांच्या मालकीची असेल तर त्यांची व्हायची ती सगळी चिकित्सा अगदी जागतिक पातळीवरूनच होईल. पण ती करताना संबंधिताला त्यासंबंधीचे सगळे पुरावे मांडावे लागतील. एरवीही कुणाच्याच बाबतीत ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असे होता उपयोगी नाही, हे साधे तत्त्व आहे. सार्वजनिक पातळीवर वावरणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत ते सतत पायदळी तुडवले जाते. गांधी-नेहरूंसारख्यांच्या बाबतीतही ते सध्याच्या काळात पदोपदी अनुभवाला येते आहे, तर बाकीच्यांची काय कथा! अशा ‘गणंगां’च्या पंगतीत मेधाताई पाटकरांनी बसू नये एवढीच अपेक्षा!
अन्वयार्थ : तुम्हीसुद्धा?
मेधा पाटकर एखादे विधान करतात तेव्हा त्यांनी ते पूर्ण जबाबदारीने आणि फक्त आपल्याच नाही तर जगातील कोणत्याही समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच केलेले असते
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-02-2022 at 01:03 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social activist medha patkar controversial remark on on bill gates foundation zws