राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यापाठोपाठ देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाचा उल्लेख जेव्हा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही केला, तेव्हा देशातील कला आणि साहित्य प्रांतांतील अनेकांनी त्याविरुद्ध आपापली परस्परविरोधी मते मांडायला सुरुवात केली. दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली आणि रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची निवेदने वेगवेगळ्या बाजू मांडणारी असली, तरीही त्यात नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल पातळी सोडून केलेले वक्तव्य आता अंगलट येण्याचीच शक्यता दिसते. संपूर्ण बहुमत मिळवून केंद्रात सत्ता मिळवलेल्या भाजपबद्दल विरोधकांच्या मनात निर्माण झालेला गंड गेल्या काही काळात वेगवेगळ्या मार्गानी व्यक्त होत आहे. भाजपमधील अनेक उटपटांग नेत्यांना अशा वेळी काय बोलायचे असते, याचा अनुभव नाही आणि त्याबद्दलचे शहाणपणही नाही. त्यामुळे सारवासारव करण्यात पक्षाच्या नेत्यांची दमछाक होते. दादरीची घटना असो की पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येची घटना असो, जो विरोध होत आहे, त्याला समंजसपणे उत्तर देण्याची व्यवस्था भाजपकडे नसल्याने असे घडते आहे. भाजप आणि रा. स्व. संघ या दोन्ही संघटनांचे खच्चीकरण करण्यासाठी बदनामीचे षड्यंत्र रचले जात आहे, हाच जेटली आणि जोशी या दोघांच्याही बोलण्याचा अर्थ. राजकीय पातळीवर संघर्ष करणे शक्य नसल्याने डावे आणि काँग्रेस हे वैचारिक असहिष्णुता दाखवत असल्याचे जेटली यांचे म्हणणे मान्य केले, तरीही निवडणुकीपूर्वी सामाजिक माध्यमांमध्ये लोकप्रिय असलेल्या या पक्षावर पुन:पुन्हा असे वार झेलण्याची वेळ का येते आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची आता गरज आहे. संघाने गेल्या नऊ दशकांत माध्यमांमधून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न कधी केला नाही, आता सार्वजनिकरीत्या होत असलेल्या आरोपांची शिकार झाल्याने संघालाही आपली भूमिका पुन:पुन्हा स्पष्ट करणे आवश्यक ठरते आहे. नक्वी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जे वक्तव्य केले आहे, ते पाहता, भाजपमध्ये वैचारिक समन्वय नसल्याचेच दिसून येते. धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसनेच दहशतवादाला धर्माची किनार दिली असा आरोप करताना, त्यांनी ओसामा बिन लादेनच्या मृत्यूमुळे श्रीमती गांधी रात्रभर झोपू शकत नाहीत, असे वक्तव्य केले. नक्वी यांच्या या वक्तव्याने आगीत तेल ओतले गेले. भाजप आणि संघ यांच्यावर शरसंधान करणाऱ्या देशातील विरोधकांनी एकत्र येऊन आपली असहिष्णुता दाखवली, या म्हणण्यात फारसा अर्थ नाही. याचे कारण भाजपनेही आतापर्यंत अनेक विषयांमध्ये फारशा गांभीर्याने कृती केली नाही. पंतप्रधानांनी त्याकडे मुद्दाम कानाडोळा केला, या कुजबुजीवर विश्वास बसण्याइतके त्यांचे वर्तन अलिप्त होते. अशा स्थितीत देशातील वातावरण खरोखरच बिघडले आहे काय, याचा विचार भाजपनेच करणे आवश्यक आहे. तसे ते बिघडले असेल, तर त्याबाबत त्वरेने मलमपट्टी करण्याचे सौजन्यही दाखवायला हवे.

Story img Loader