राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनावेळी पोलिसांच्या आधी माध्यमांचे कॅमेरे तिथे पोहोचले ही गोष्ट एके काळी स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा देणारीच नव्हे तर त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. प्रश्न शरद पवार यांच्या घराचा नाही, तर इतका मोठा जमाव एकाच हेतूने नियोजनबद्ध रीतीने विशिष्ट ठिकाणी पोहोचतो आणि ही माहिती माध्यमांना समजते पण पोलिसांना नाही ही गोष्ट गंभीर आहे. शरद पवारांचे घर असलेला भाग हा तसा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा. अशा ठिकाणी जमाव चाल करून जात असताना सुरक्षा यंत्रणा गाफील असेल तर मग मुंबईचा कोणता भाग सुरक्षित आहे, असा प्रश्न सामान्य मुंबईकरापुढे आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन होणे, जमावाचा उद्रेक होणे वेगळे. पण ते ठिकाण आझाद मैदानपासून हाकेच्या अंतरावर आहे व लोक अचानक चार दिशांनी जमले असेही झालेले नाही. इतक्या लांब असलेल्या ठिकाणी शेकडो लोक जात असतील तर त्याची काही तरी तयारी निश्चितच झाली असणार. तरीही पोलीस यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नव्हता. माध्यमांचे कॅमेरे आधी पोहोचले याचाच अर्थ कुठून तरी निरोप गेले होते. कोण होते ते निरोप देणारे? की गोपनीय माहिती मिळवण्याचे माध्यमांचे कौशल्य हे पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांपेक्षा जास्त चांगले आहे?आंदोलनस्थळी प्रथेप्रमाणे गुप्तवार्ता विभागाचे पोलीस असणारच, मग त्यांना याची कुणकुण का लागली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बरे या पद्धतीने घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. टाळेबंदीच्या काळात वांद्रे येथे लोकांनी रेल्वेसाठी केलेली गर्दी व त्यानंतर परीक्षेवरून कोणा समाजकंटकाने समाजमाध्यमांवरून आवाहन केल्यानंतर उसळलेली संतप्त तरुणांची झुंबड या नजीकच्या काळातील ठळक घटनांचा अनुभव राज्यातील पोलिसांना होता. म्हणजेच इजा, बिजा आणि आता तिजा झाला आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, असे म्हणतात; पण पुढचा नाही झाला शहाणा तर काय म्हणावे? समाजमाध्यमांचा वापर करून जमाव गोळा करणे ही एक कार्यपद्धती झालेली असताना पोलिसांचे या माध्यमाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब यातून पुन्हा अधोरेखित होत आहे. केवळ पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या घटनेच्या आदल्या दिवशी न्यायालयात निकाल लागल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुलाल उधळला. याच वेळी पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी शरद पवार यांच्याविरोधात टिपेचा सूर लावत प्रक्षोभक विधाने केली होती हे वृत्तवाहिन्यांवरून सर्वानी पाहिले. त्यातच पुढच्या अघटिताची बीजे होती. पोलीस यंत्रणा आणि गृहविभागाला हे दिसले नाही का? त्यांनी ही पत्रकार परिषद पाहिली नाही असे मानले तरी हजारो कर्मचारी आंदोलन करण्यासाठी एकाच ठिकाणी जमले असताना तिथे काय सुरू आहे, कोण काय बोलत आहे यावर नजर ठेवण्याची यंत्रणा नाही का, त्या यंत्रणेचे अधिकारी व प्रमुख काय करत होते, असेही प्रश्न उपस्थित होतात. इतके महिने एवढा मोठा जमाव आझाद मैदानावर राहतो यावरच आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचे उत्तर मात्र केवळ पोलीस यंत्रणेलाच नाही तर महाविकास आघाडी सरकारलाही द्यावे लागेल. कारण प्रश्न मुंबईच्या सुरक्षेचा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा