दुष्काळाच्या झळा तीव्रतम होऊ लागल्या असतानाच, राज्यातील साखरेच्या उत्पादनात यंदा वाढ होण्याच्या शक्यतेने पाण्याची चिंता अधिकच वाटू लागणे अगदीच स्वाभाविक आहे. महाराष्ट्र हे राज्य पाऊसपाण्याच्या बाबतीत फार समृद्ध नाही. अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आणि जिथे पाणी उपलब्ध आहे, तिथे त्या पाण्यावर उसाचे पीक घेण्याची परंपरा. गेल्या काही दशकांत जिथे पाणी नाही, तिथेही ऊस घेण्याची चढाओढ सुरू झाली. परिणामी मराठवाडय़ासारख्या राज्यातील दुष्काळी भागालाही अतिसाखरेने मधुमेह होण्याची वेळ आली. सोलापूरसारख्या पाण्याची सतत टंचाई असलेल्या जिल्ह्य़ात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असावेत, हे सरकारी नियोजनाचेच फलित आहे. परंतु उपलब्ध पाण्याची योग्य साठवणूक करणे आणि त्याचा संपूर्ण उपयोग करणे याबाबत सरकारी नियोजनाचा कसा बोजवारा उडतो, हे दरवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यांत लक्षात येते. मग टँकरमाफियांचे राज्य सुरू होते आणि परिसरात चार चार धरणे असूनही पुण्यासारख्या शहरात टँकरच्या फेऱ्या वाढू लागतात. साठवलेल्या पाण्याचा विनियोग करताना प्राधान्य पिण्याच्या पाण्यालाच असायला हवे. त्याखालोखाल शेती आणि उद्योग यांचा क्रमांक असायला हवा. कागदोपत्री तरी हा असाच प्राधान्यक्रम आहे. प्रत्यक्षात मराठवाडय़ात मात्र एका बाजूला २३०० टँकर आणि दुसऱ्या बाजूला पावणेदोन कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप अशी परिस्थिती आहे. ही मराठवाडय़ातील एकूण ४७ कारखान्यांतील गाळप आणि एकटय़ा सोलापूर जिल्ह्य़ातील ३१ साखर कारखान्यांत दीड कोटी मेट्रिक टन उसाची साखर होते. आता स्थिती अशी आहे, की सोलापूरला घरोघरी येणारे पाणी महिन्यातून पाच वेळा मिळते आणि ते साठवून ठेवल्याने डेंग्यूसारख्या रोगाची लागण वाढते. अधिक पाणी लागणारा ऊस हे शेतकऱ्यांचे आवडते पीक, कारण त्याची बाजारपेठ भक्कम आहे.  आज ना उद्या पैसे हाती पडण्याची खात्री आहे. त्यामुळे पाणी नसले, तरी साखर कारखाना मागणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला सरकार खूश ठेवते. राज्यातील शेतीचे नियोजन करायचे, तर त्यासाठी उसाला पर्याय ठरणाऱ्या पिकांच्या बाजारपेठेची हमी हवी. दोन वर्षांपूर्वी राज्यात तूरडाळीचे उत्पादन कमी झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना डाळीचे उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि सर्व उत्पादन खरेदी करण्याची हमीही दिली. तूरडाळीचे अधिक उत्पादन झाल्यानंतर मात्र सरकारने हात झटकले. मग शेतकरी पुन्हा दुसऱ्या पिकाकडे वळू लागले. राज्याच्या धोरणलकव्याचा हा थेट परिणाम. अधिक साखर या राज्याला परवडणारी नसली तरी शेतकऱ्यांना तेच परवडणारे असेल, तर पाण्याच्या नियोजनाचा फज्जा उडेल नाही तर काय? जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जपून वापरण्यासाठी जी व्यवस्था निर्माण करायला हवी, ती महाराष्ट्राने आजवर केली नाही. त्यामुळे धरणातील पाणी बंद नळाऐवजी कालव्यानेच देण्याची पद्धतही तशीच सुरू राहिली.  परिणामी साठवलेल्या पाण्याचा वापरही धोकादायक रीतीने होऊ लागला. अगदी जलसंपन्न असलेल्या कोल्हापूरलाही यंदा दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. ऊस लावू नका असे म्हणताना पर्याय देण्यात आजवरच्या सर्व राज्यकर्त्यांना आलेले घोर अपयश हे साखरेच्या प्रचंड उत्पादनाचे इंगित आहे. पाणी आणि शेती या दोन्हीच्या नियोजनाबाबत महाराष्ट्राने जे अक्षम्य दुर्लक्ष केले, त्यामुळे सतत दुष्काळाच्या छायेत राहून अतिशय भीषण जीवन जगण्याची वेळ येथील फार मोठय़ा लोकसंख्येवर आली आहे.

Story img Loader