केरळमधील पाच ख्रिस्ती धर्मगुरूंच्या प्रकरणातून त्या धर्माची बदनामी किती होणार आणि पुढे अशा बदनामीतून राजकीय लाभ कोणास मिळणार, हे निराळे आणि सध्या तरी दूरचे प्रश्न झाले. तूर्तास या पाच धर्मगुरूंपैकी दोघांनी मागितलेला अटकपूर्व जामीन त्यांना मिळणार की नाही, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे आणि त्यावरील निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने, ‘या दोघांविरुद्ध आम्ही सज्जड पुरावे जमविले असून त्यांना जामीन अजिबात नको’ अशी ठाम भूमिका न्यायालयात लावून धरली. केरळच्या उच्च न्यायालयाने अटकेचा आदेशही दिला, तेव्हा या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. तीवर व्हायचा तो निर्णय होईल; परंतु सध्या प्रश्न आहे तो जॉन्सन मॅथ्यू, अब्राहम व्हर्गीस आदी पाच ख्रिस्ती धर्मगुरूंवर आरोप झालेच कसे, हा. पंचतारांकित हॉटेलांत एका महिलेला- तिच्याच खर्चाने- भेटून तिचे सलग १६ वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या एका धर्मगुरूचे हे मूळ प्रकरण. याची तक्रार नव्हे, पण ख्रिस्ती प्रथेप्रमाणे याची कबुली (कन्फेशन) त्या महिलेने ज्यांना दिली, त्यांनीही गेली अनेक वर्षे तिचे शोषण सुरू केले. मलंकार ऑथरेडॉक्स सिरियन पंथातील आपल्या सहकारी-धर्मगुरूला वाचविण्यासाठी त्याच पंथाचे हे चौघे धर्मगुरू गप्प तर बसलेच, शिवाय त्या महिलेच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तिला आपल्याही जाळ्यात ओढू लागले. नवऱ्याला हे प्रकरण तिने सांगितले, तेव्हा त्याने तिच्या पाठीशी राहून, या पाच जणांविरुद्ध तक्रार गुदरली. ‘ती तसलीच आहे’ असा प्रचार करून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्नही या साऱ्यांनी केला, पण तो किती फोल आहे हे अन्य एका प्रकरणातून दिसून आले. इथे तक्रार करणारी, मिशनरीज ऑफ जीझस या पंथाची जोगीण होती. तिने जालंधरचे बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर आरोप केला की, २०१४-२०१६ दरम्यान ते केरळमध्ये कार्यरत असताना, त्यांनी १३ वेळा आपणास अनैसर्गिक क्रियेस भाग पाडले होते. यानंतर एका विवाहित महिलेने, मलंकार ऑथरेडॉक्स सिरियन पंथाचेच धर्मगुरू बिनू जॉर्ज यांच्याविरुद्ध २०१४ मधील बलात्काराची तक्रार पोलिसांकडे नोंदविली. ‘हा अतिप्रसंग चर्चमधील खोलीतच झाला’ असे त्या तक्रारीत नमूद आहे. जम्मू-काश्मिरातील एखादा बलात्कार मंदिरात झाल्याने जर हिंदू धर्माची बदनामी होते, तर बिनू जॉर्ज यांच्यावरील आरोपाने ख्रिस्ती धर्माचीच बदनामी व्हायला हवी, असे कुणाला वाटेल आणि ते खरेही ठरेल. ही अशी बदनामी तात्पुरती ठरू शकते, कारण काही काळाने लोक ही प्रकरणे विसरूनही जातात; परंतु धर्माच्या ताबेदारांमध्ये फोफावलेली अप्रामाणिकपणाची कीड मात्र समाजाला सतत कुरतडत राहते. धर्मसुद्धा ‘सरळ’ नाही, हे एकदा लोकांना माहीत झाले की पाप-पुण्याच्या कल्पनाही तकलुपीच वाटू लागतात. जालंधरच्या विद्यमान बिशपांवर दोन वर्षांपूर्वी, ते केरळमध्ये असतानाच आरोप झाले नाहीत, कारण इतका काळ संबंधित जोगीण आरोप मांडण्यास भीत होती. बिनू जॉर्ज यांच्याविरुद्धही उशिराच आरोप झाले. यापूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गुन्हेगारी प्रकरणांचे अपवाद वगळता, ख्रिस्ती धर्मगुरूंवरील आरोप नेहमी उशिराच झाले आहेत. कारण त्यांचा भीतीयुक्त दबदबा. तो कायम ठेवण्याचे काम चर्चची अख्खी यंत्रणा करीत असते, असे पहिल्या- जॉन्सन मॅथ्यू, अब्राहम व्हर्गीस आणि अन्य धर्मगुरूंच्या- प्रकरणातून स्पष्ट दिसते. ख्रिस्ती ‘कॅनन लॉ’चे संरक्षण आम्हाला आहे, म्हणून आमच्यावर जी काही कारवाई करायची ती व्हॅटिकन करील, अशा ताठय़ात काही ख्रिस्ती धर्मगुरू वावरत असतात; परंतु स्वधर्माच्या ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर दाद मागण्याची हिंमत केरळमधील महिला दाखवू लागल्या आहेत. एकमेकांना साथ देऊन अधर्मच करणाऱ्या आरोपी-धर्मगुरूंपेक्षा, या फिर्यादी महिला स्वधर्म-रक्षणाचे काम नेटकेपणाने करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा