रिओ ऑलिम्पिक हातचे गेले, तर पुढले आपल्या पस्तिशीनंतर, या जाणिवेने सुशीलकुमारने शिकस्त चालवली होती. पण आखाडय़ाबाहेरचे डावपेच आखाडय़ात येण्यासाठी उपयोगी नसतात, हेच अखेर दिसू लागले आहे. ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या नरसिंग यादवशी माझी पुन्हा झुंज लावून चाचणी घ्या, ही त्याची विचित्र मागणी भारतीय कुस्ती महासंघाने फेटाळल्यामुळे सुशीलकुमारच्या चाहत्यांना हा अन्याय वाटेल, पण तसे नाही. उलटपक्षी नरसिंगला पाठवले गेले नाही किंवा या दोघांमध्ये चाचणी घेतली, तर तो नरसिंगबरोबर कुस्ती या खेळावरही अन्याय ठरेल. सुशीलने यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये जी दोन पदके पटकावली ती ६६ किलो वजनी गटामध्ये. पण ऑलिम्पिकमधून ६६ किलो वजनी गट वगळण्यात आला. त्यानंतर सुशीलने ७४ किलो वजनी गटात खेळायची तयारी दर्शवली. पण नरसिंग पूर्वीपासून याच गटात खेळत होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नरसिंगने कांस्यपदक जिंकत ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळवला. आतापर्यंत ज्याने कोटा मिळवला तोच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळायला गेला आहे. त्यानुसार नरसिंग ऑलिम्पिकला जायला हवा. पण दुसरीकडे सुशीलला पुरेपूर जाणीव आहे की, ही त्याची अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. आतापर्यंत त्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि रौप्यपदक जिंकले असून आता त्याला सुवर्णपद खुणावत आहे. त्यासाठी त्याचा अट्टहास असल्याचे म्हटले जाते. भारत हा देववेडा देश, त्यामुळे काही जणांनी सुशीलला कुस्तीचे देवत्वच बहाल केलेले आहे. त्यामुळे सुशील ऑलिम्पिकला जायला हवा, असे काही जणांना वाटते. सुशील हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला आहे, त्याच्याकडे खिलाडूवृत्ती आहे, ती दाखवून त्याने नरसिंगचा मार्ग मोकळा करायला हवा. स्वत: जेव्हा कोटा मिळवून सुशील ऑलिम्पिकला गेला तेव्हा त्याला चाचणी घ्यावीशी का वाटली नाही? आता तर तो ऑलिम्पिक प्रवेशासाठी थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. त्याने ऑलिम्पिकला जायला हवे, पण स्वबळावर. गेले बरेच महिने तो दुखापतग्रस्त होता. ७४ किलो वजनी गटामध्ये त्याने जास्त सामनेही खेळलेले नाहीत, अशा परिस्थितीत फॉर्मात असलेल्या नरसिंगवर अन्याय होता कामा नये. तेव्हा झाले ते बरेच झाले. कुस्ती महासंघाने एवढे दिवस हे घोंगडे भिजत घातले होते, त्यामुळे या गोष्टीला अधिक प्रसिद्धी मिळाली. एखादी गोष्ट ताटकळत ठेवायची, त्यावर चर्चा घडवून आणून स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न महासंघ करताना दिसत होते. पण अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महासंघाने आपली भूमिका स्पष्ट करत नरसिंगच्या पारडय़ात ऑलिम्पिकवारीचे दान टाकले. हीच गोष्ट त्यांनी ठामपणे काही दिवसांपूर्वीच करायची गरज होती. आता महासंघाने आपला निर्णय कळवल्यावर सुशीलचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे. न्यायालयात त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी आशा आहे. पण महासंघाने जर यापूर्वीच ठाम भूमिका घेतली असती तर हा चर्चेचा आखाडा रंगलाच नसता.

Story img Loader