काँग्रेस कमकुवत झाल्याने प्रादेशिक नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) वा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन या साऱ्यांचा राष्ट्रीय पातळीवर आपले महत्त्व वाढावे यासाठी खटाटोप सुरू झाला. यापैकी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत बिगरभाजप व बिगरकाँग्रेस अशा तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचाच भाग म्हणून राव हे आठवडाभर दौऱ्यावर आहेत. बिगरभाजप किंवा प्रादेशिक पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भेटी देण्याला त्यांनी प्राधान्य दिले. तिरुवअनंतपुरम, चेन्नई, चंडीगढ या राजधान्यांचा दौरा झाल्यावर कोलकाता, पाटणा, बंगळूरु या राजधान्यांसह महाराष्ट्रातील राळेगणसिद्धीचा ते या आठवडय़ात दौरा करणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने व ‘शेतकऱ्यांचा नेता’ अशी प्रतिमा उभारण्याकरिताच राव यांनी शेतकरी कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या देशभरातील सुमारे ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तेलंगणा सरकारच्या वतीने प्रत्येकी तीन लाखांची मदत जाहीर केली. यासाठी तेलंगणा सरकारच्या तिजोरीवर सुमारे २१ कोटींचा बोजा टाकला. या मदतीचे वाटप करण्याकरिता चंद्रशेखर राव हे दौरे करीत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचा भात खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून ओरड करायची तर दुसरीकडे स्वत:च्या प्रतिमावर्धनाचा बोजा राज्यावर टाकायचा असे त्यांचे धोरण. दिल्ली, पंजाब, बिहारमधील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तेलंगणा सरकारने का मदत द्यावी, हा भाजप व काँग्रेसचा सवाल आहे. पण चंडीगढमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही राव यांच्यासह व्यासपीठावर होते. हमीभावाला घटनात्मक हमीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे आवाहन त्यांनी केले. यातून, आम आदमी पार्टीने आपले नेतृत्व मान्य करावे हाच राव यांचा प्रयत्न होता. या आठवडय़ात ते ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. बॅनर्जी वा केजरीवाल हे राव यांना कितपत प्रतिसाद देतील याबाबत साशंकताच. कारण त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर आपले नेतृत्व प्रस्थापित करायचे आहे. पंजाबच्या विजयानंतर केजरीवाल यांचेही देशभर दौरे सुरू झाले आहेत. भाजपला आम आदमी पार्टीचा पर्याय उभा करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा वेळी केजरीवाल हे चंद्रशेखर राव यांना पािठबा किंवा त्यांना सहकार्य करण्याची सुतराम शक्यता नाही. मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रिक केल्यावर ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. राव यांनी मुंबई भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असता पवार यांनी ‘राजकीय चर्चा झालीच नाही,’ असे सांगून राव यांची एक प्रकारे बोळवणच केली. २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजपशी जुळवून घेतलेल्या राव यांना पुढे भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली. संयुक्त आंध्रचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू असेच राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला गेले आणि त्यांच्या राज्यातील मतदारांनी त्यांना दहा वर्षे घरी बसविले. चंद्रशेखर राव यांनी याचा धडा घेऊन आधी स्वत:चे राज्य शाबूत ठेवणे अधिक योग्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा