सध्या सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील रविवारचा दिवस अनेक अर्थानी संस्मरणीय ठरला. आंतरराष्ट्रीय टेनिसची पंढरी मानल्या जाणाऱ्या विम्बल्डनच्या केंद्रस्थानी असलेल्या सेंटर कोर्टला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली. १९२२मध्ये जेव्हा पहिल्यांदा या कोर्टवर सामने खेळवण्याविषयी ठरले, त्या वेळी त्याची संभावना ‘पांढरा हत्ती’ अशी करण्यात आली होती. पाहायला येणार कोण आणि किती संख्येने, असा प्रश्न त्या वेळी उपस्थित केला जायचा. परवा रविवारी जागतिक क्रीडा अवकाशात सर्वाधिक आदरणीय ठरू शकेल, अशा या कोर्टची शंभरी साजरी झाली तेव्हा जवळपास १५ हजारांच्या आसपास प्रेक्षकवृंद उपस्थित होता. विम्बल्डनचे बहुतेक सर्व माजी विजेते आणि विजेत्यांनी सेंटर कोर्टच्या हिरवळीवर उतरून विम्बल्डनच्या परंपरेला आणि संस्कृतीला मानवंदना दिली. प्रेक्षक आणि खेळाडू प्रतिसादाचा प्रश्नच आता कालबाह्य झाला आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.
विम्बल्डनची लोकप्रियता सतत वृद्धिंगत होण्यामागची कारणे तशी अनेक. पारंपरिक अभिजातता न सोडता आधुनकतेचा वेध घेणारे ऑल इंग्लंड टेनिस क्लबचे हे संकुल जगभरातील टेनिसरसिकांवर आजही गारूड करून आहे. हिरव्या आणि जांभळय़ा रंगसंगतीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे टेनिसपटूंचे पांढरे पोशाख आणि पिवळेधमक टेनिस चेंडू, खास ब्रिटिश शिस्तीमध्ये एखाद्या ऑपेराप्रमाणे चालणारे सामन्यांचे परिचालन हे परंपराप्रेमींना मोहवणारे. तर सामन्यांच्या निमित्ताने फस्त होणारे लक्षावधी टन स्ट्रॉबेरी आणि क्रीम, तिकिटे मिळवण्यासाठी कित्येक दिवस आधी लावलेल्या रांगांचे सहलीकरण वगैरे बाबी तरुणाईला खुणावणाऱ्या. स्पर्धेच्या पहिल्या सोमवारी आदल्या वर्षीच्या पुरुष विजेत्याचा आणि पहिल्या मंगळवारी आदल्या वर्षीच्या महिला विजेतीचा सामना सेंटर कोर्टवरच सुरू होणार.
टेनिसपटूंचा पोशाख नव्वद टक्के श्वेतच राहणार वगैरे परंपरा आजही टिकून आहेत. याउलट मधल्या रविवारचे सामने किंवा पाऊस आल्यासही सामना सुरू राहावा यासाठी कोर्ट आच्छादणारे छप्पर किंवा सेंटर कोर्टवर आता सरावही करण्यासाठी मिळालेली परवानगी वगैरे बदल बदलत्या काळाशी सुसंगत राहतील असे. आणखीही नोंद घ्यावी असा बदल म्हणजे, लॉकररूममधील महिला विजेत्यांचा नामोल्लेख आता पुरुषकेंद्री असत नाही. उदा. मिसेस किंवा मिस वगैरे. सेंटर कोर्टवर रंगलेले अनेक अंतिम सामने हा तर स्वतंत्रपणे आस्वादण्याचा विषय. बोर्ग वि. मॅकेन्रो किंवा मार्टिना वि. ख्रिस एव्हर्ट किंवा फेडरर वि. नडाल हे सामने दंतकथा बनले आहेत. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर माजी विजेत्यांना- आणि त्यातही बहुकालिक विजेत्यांना दैवतासमान मानले जाते. त्यांचे स्वागत टाळय़ांच्या कडकडाटातच केले जाते. बिली जीन किंग, मार्टिना नवरातिलोवा, बियाँ बोर्ग, ख्रिस एव्हर्ट, स्टेफी ग्राफ, बोरिस बेकर, पीट सँप्रास, सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडरर ही काही आधुनिक काळातली दैवते. यांतील शेवटच्या नावाला तर परवा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. १८७७मध्ये सुरू झालेली विम्बल्डन ही सर्वात जुनी टेनिस स्पर्धा. परंतु इतर तीन ग्रँड स्लॅम स्पर्धाप्रमाणे रंगांची वा झगमगाटाची उधळण नसूनही विम्बल्डन या सर्वापेक्षा आजही लोकप्रिय आहे. कारण परंपराप्रिय असूनही आधुनिकतेशी संबद्ध राहू शकतील अशी या स्पर्धेसारखी उदाहरणे भवतालात दुर्मीळ होत चालली आहेत!