राजकीय नेत्यांवर नीतिमत्ताभंगाचे गंभीर आरोप झाले की त्यांच्याकडून प्रतिक्रियेच्या पायऱ्या जणू ठरलेल्या असतात : आरोप सपशेल फेटाळणे, आपण केले तेच नैतिक असे सतत सांगत राहणे, आरोपकर्त्यांबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणे, आपला हेतू किती चांगला होता वा आहे हे ठासून सांगणे आणि न्यायालयात आरोप सिद्ध झाले तर मात्र हे प्रकरण जणू लहानसेच होते असे समजून अन्य विषयांवर भरभरून बोलणे! हे सारे भारतातील राज्यकर्तेच करतात असे नव्हे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हेच केले. प्रतिक्रियांच्या या पायऱ्या ट्रम्प यांनी ज्या आरोपांसंदर्भात पार केल्या, तोही भारतीय राजकारणात आधीच झालेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी जून १९८० ते जानेवारी १९८२ या अल्पशा कारकीर्दीत जे केले, तसेच थोडय़ाफार फरकाने ट्रम्प यांनीही केले. अंतुले म्हटल्यावर जुन्या आणि/किंवा जाणत्यांना ‘प्रतिभा प्रतिष्ठान’ आठवेल. तसे ट्रम्प यांचेही ‘ट्रम्प फाउंडेशन’ होते. अंतुले यांनी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ची थेट सांगड मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकाराशी घालून सिमेंटचा वाढीव कोटा हवा तर द्या देणगी, साखरेचा कोटा वाढवून हवा तर पोत्यामागे दोन रुपये दराने मोजा दान, असा प्रकार केला होता. ही ‘सरकारी कोटय़ा’ची पद्धतच अमेरिकेत नसल्याने ट्रम्प यांनी असे करण्याचा प्रश्न येत नाही हे खरेच. ट्रम्प पदावर आले आणि या फाउंडेशनच्या व्यवहारांवर र्निबध आले, हेही खरे. मात्र, पदावर येण्यासाठी पैसा जमवणे आणि पदाचा मार्ग सुकर होण्यासाठी तो खर्च करणे याकामी ट्रम्प यांनी त्यांच्या या प्रतिष्ठानचा वापर केला. पैसा प्रतिष्ठानचा आणि राजकारण ट्रम्प यांचे, असा हा मामला. त्यावर सजग पत्रकारांनी आक्षेप घेतले, ट्रम्प चाहते ज्याला ‘एकतर्फी’ म्हणू शकतील अशा बातम्या दिल्याच आणि ज्या अमेरिकी राज्यात हे फाउंडेशन नोंदणीकृत आहे, त्या न्यूयॉर्कमध्ये त्यावर खटलाही गुदरला गेला. या खटल्यातील महत्त्वाचा निर्णय १८ डिसेंबर रोजी आला असून त्यामुळे ट्रम्प फाउंडेशन पूर्णत: विसर्जित करावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या या प्रतिष्ठानाकडील पैशांचे काय करायचे, हेही न्यूयॉर्कचे न्यायालयच तेथील तज्ज्ञांच्या साथीने येत्या ३० दिवसांत ठरवणार आहे! हा खटला तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरल एरिक श्नायडरमॅन यांनी लढवला, त्यांची ‘ऐदी डेमोक्रॅट’ अशी संभावना करून ट्रम्प यांनी ‘१८ दशलक्ष डॉलरची पुंजी आणि १९ दशलक्ष डॉलर खर्च असणाऱ्या संस्थेशी तुमची गाठ आहे’ अशी सूचक धमकीही दिली होती. पण ट्रम्प काहीही म्हणोत, त्यांच्या प्रतिष्ठानचा हेतू शुद्ध नाही, हेच अनेक प्रकरणांतून समोर आले होते. ‘या प्रतिष्ठानने सर्वात मोठी देणगी १९८९ साली न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या एका भागाच्या संधारणासाठी दिली; ती का? तर हाच भाग ट्रम्प-मालकीच्या हॉटेलातून दिसणार होता म्हणून!’ इथपासून ते प्रतिष्ठानसाठी मिळालेल्या देणग्या २०१६ मध्ये ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कशा वळवल्या गेल्या, इथवरचा इत्थंभूत तपास- ‘मीडिया ट्रायल’ वगैरे शेरेबाजीला अजिबात धूप न घालता- वॉशिंग्टन पोस्टचे डेव्हिड फॅरेन्थोल्ड आदी पत्रकारांनी केला. फाउंडेशन आता विसर्जित होणार असले तरी, ‘सामाजिक कार्या’च्या नावाखाली गैरप्रकार केल्याबद्दल ट्रम्प आणि त्यांची तीन अपत्ये यांच्यावरील दिवाणी खटला सुरूच राहणार आहे. अंतुलेंच्या ‘प्रतिभा प्रतिष्ठान’चा पैसा सरकारजमा झाला नाही. पण ट्रम्प यांच्या प्रतिष्ठानचा होणार, यातून अमेरिकी व्यवस्थेची प्रतिभा दिसून येते.

Story img Loader