राजकीय क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीविरुद्धचा प्रचार वणव्यासारखा पसरतो, भडकतो. हेच ब्रिटनमध्ये रविवारपासून, ऋषी सुनक यांच्याबाबतीत सुरू आहे. ‘इन्फोसिस’च्या नारायणमूर्तीचे जावई, म्हणून ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदी असलेल्या सुनक यांचे भारतात काहीसे कौतुक. पण ते करण्याजोगी परिस्थिती आता राहिलेली नाही. सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी भारतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ब्रिटनमध्ये कर भरला नाही, अक्षता यांचे भारतीय नागरिकत्व कायम आहे तर सुनक हे ब्रिटनमधील महत्त्वाचे मंत्रीपद सांभाळत असतानासुद्धा त्यांनी अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ कायम राखले होते, असे गौप्यस्फोट केले गेल्यानंतर, या दोघांचे सारे खुलासे हास्यास्पद, संशयास्पद, बेदरकार आदी ठरवले जाऊ लागले. इतके की, सुनक यांनी ‘या करांची माहिती आम्ही आधीच दिली होती की नाही, की आमचे काही चुकले याची चौकशी स्वायत्तपणे व्हावी’ अशी विनंती ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करणारे जे पत्र रविवारी पाठवले, त्याचाही अपलाप करून ‘माझ्या पत्नीच्या मालमत्तेची माहिती बाहेर आलीच कशी याची चौकशी करा’ असा हेका सुनक धरत असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली! केवळ समाजमाध्यमेच प्रमाण मानायची, तर सुनक यांची उरलीसुरली लोकप्रियता पार रसातळाला जाईल असे हे कथित करचोरी प्रकरण ठरले आहे. अक्षता मूर्ती यांना १ कोटी १५ लाख पौंड (रुपयांत एक अब्ज १३ कोटी ६९ लाखांहून अधिक) रक्कम दरवर्षी कंपनीच्या लाभांशापायी मिळते, त्यावरील कर ब्रिटनमध्ये ब्रिटिशांसाठी ज्या दराने आकारला जातो त्याच्या सुमारे तिप्पट दर बिगरब्रिटिश नागरिकांसाठी आकारण्याची पद्धत आहे आणि त्यानुसार जरी हल्ली अक्षता यांनी ३० हजार पौंड भरले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी तब्बल दोन कोटी पौंडांचा कर चुकवलेला आहे, असा या आरोपांचा तपशील प्रमुख ब्रिटिश दैनिकांनीही रविवारी दिला. यानंतर चर्चा सुरू झाली ती सुनक राजीनामा देणार हे गृहीत धरूनच. कुणी म्हणते की बोरिस जॉन्सन यांच्या खालोखाल सुनक यांची लोकप्रियता असल्याने आता त्यांच्या पदत्यागानंतर जॉन्सन निर्धास्त होतील, आणखी कुणी म्हणते की बहुधा सुनक व अक्षता मूर्ती हे दाम्पत्य (राजीनाम्यानंतर) ब्रिटनमध्ये न राहाता कॅलिफोíनयात परत जाईल..! हे आरोप करण्यात पुढाकार घेणारे ब्रिटिश खासदार अर्थातच विरोधी मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) आहेत. त्यांपैकी बहुतेकांनी इतका वावदूकपणा केलेला नसला तरी, औचित्य – योग्यायोग्यता- पदास काळिमा फासणारे वर्तन असा रोख त्यांनी सुनक यांच्यावर ठेवला आहे. ब्रिटिश संसदीय पद्धतीतच या साऱ्या ‘पदविशोभितते’चा तसेच ‘अयोग्यते’चा तपास करण्याचे अधिकार असणारी आणि निर्णय देणारी, कारवाई करू शकणारी पदे आहेत. मात्र सुनक यांची मागणी ‘स्वतंत्र’ चौकशीची असल्याने आगीत तेल ओतले गेले. अर्थमंत्री या नात्याने सुनक यांनी काही अप्रिय निर्णय घेतले. महागाई आणि रोजखर्च ब्रिटनमध्येही वाढत असल्याचा रोष अर्थमंत्री म्हणून त्यांना झेलावा लागला. त्याचा जणू परिपाक म्हणून गेल्या आठवडय़ात, ‘यांचे सासरे रशियातही इन्फोसिसच्या शाखा थाटून बसलेत’ वगैरे टीका झाली होती, त्या शाखा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता हे प्रकरण उद्भवले आहे. लोकप्रियतेच्या लाटांवरील राजकारणात ‘योग्यते’ची आठवण कधी टोकदार होते याचा प्रयोग ब्रिटनमध्येही होतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा