गत शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागून भारताच्या युवा क्रिकेटपटूंचे जगज्जेतेपद साजरे करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे लाखोंच्या घरात होती. मुख्य प्रवाहातील क्रिकेटप्रमाणेच युवा क्रिकेटच्या चाहत्यांची संख्याही वाढू लागल्याचे हे स्पष्ट लक्षण. तशात भारतीय संघ १९ वर्षांखालील स्पर्धेत विशेषत: नवीन सहस्रकात सातत्याने जिंकत आला आहे. २०००, २००८, २०१२, २०१८ आणि आता २०२२ असे पाच वेळा आपण जगज्जेते ठरलो. तर २००६, २०१६ आणि २०२०मध्ये उपविजेते होतो. म्हणजे जवळपास प्रत्येक स्पर्धेत आपण किमान अंतिम फेरी गाठली आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे फार काही नाही. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या या देशात क्रिकेटपटू बनण्याची मनीषा बाळगून असलेल्या आणि लहान वयातच हुनर दाखवलेल्या युवकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. प्रशिक्षण, मार्गदर्शन, पोषण, दुखापत उपचार व्यवस्थापन, मानसिक समुपदेशन अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत निधी आणि कुशल मनुष्यबळाची उणीव भासू दिली जात नाही. बीसीसीआयवर इतर अनेक कारणांसाठी टीका होत असली, तरी युवा क्रिकेटपटू घडवण्याच्या मोहिमेत त्यांनी जागतिक क्रिकेटच नव्हे, तर क्रीडा जगतातही आदर्श निर्माण केला हे नि:संदेह मान्य करावे लागेल. मोहम्मद कैफ, युवराज सिंग, विराट कोहली, शिखर धवन, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा असे क्रिकेटपटू युवा विश्वचषक स्पर्धातूनच मिळाले. कदाचित विद्यमान युवा संघाचा कर्णधार यश धूल, उपकर्णधार शेख रशीद, अष्टपैलू राज बावा, कौशल तांबे, राजवर्धन हंगर्गेकर यांतीलही कुणी पुढे वलयांकित सीनियर क्रिकेटपटू बनेलही. या संघातील काही क्रिकेटपटू अतिशय गरिबीतून वर आलेले आहेत. शिवाय गेली दोन वर्षे करोनामुळे त्यांना बंदिस्त सरावापलीकडे प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव घेता आला नव्हता, म्हणूनही त्यांचे यश लक्षणीय. पण युवा क्रिकेटपटूंची ही गाथा सीनियर पातळीवर सुफळ संपूर्ण होतेच असे नाही. किंबहुना एकीकडे ढीगभर युवा जगज्जेतेपदे हाती लागत असताना, २०११मधील आयसीसी जगज्जेतेपद वगळता गेले दशकभर भारताच्या नावावर एकही विजेतेपद नोंदले गेलेले नाही. गेल्या दोन युवा जगज्जेत्या संघांचे कर्णधार उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांना अजूनही सीनियर स्तरावर भरीव काही करून दाखवता आलेले नाही. भारतात क्रिकेटमध्ये सर्वाधिक पैसा आणि वलय मिळते हे सर्वज्ञात आहे. परंतु प्रसिद्धी आणि पैशाचा धबधबा थोपवून मार्गक्रमण करत राहणे सर्वानाच साधते असे नाही. १३ वर्षांपूर्वी आयपीएलचा उगम झाल्यानंतर अनेक युवा क्रिकेटपटूंबाबत, अल्प काळात फुटकळ स्वरूपाच्या करामती करूनही झटपट श्रीमंत होता येते हा साक्षात्कार भारतीय क्रिकेटच्या दीर्घकालीन भवितव्यासाठी धोकादायक ठरू लागल्याची स्पष्ट लक्षणे आहेत. आकडय़ांचाच विचार करायचा झाल्यास, भारतासाठी युवा विश्वचषक खेळलेल्या १७८ क्रिकेटपटूंपैकी केवळ ५१ क्रिकेटपटूच वरिष्ठ स्तरावर आंतरराष्ट्रीय खेळले. ही मंडळी कारकीर्दीच्या इतर वाटा सोडून क्रिकेटकडे वळतात. क्रिकेटकडून त्यांना क्षणक आनंदापलीकडे फार काही मिळत नसेल, तर तो दोष व्यवस्थेचाही मानावा लागेल. उत्तम युवा क्रिकेटपटू ते सातत्यपूर्ण विजेते हाच खरा सुफळ संपूर्ण प्रवास ठरतो आणि यात आपल्याला सुधारणेस अजूनही वाव आहे.

Story img Loader