आपल्या देशातील विरोधाभास असे की, एका बाजूला महिला पत्रकारांच्या कामाच्या ठिकाणी केलेल्या लैंगिक छळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो, तर दुसरीकडे शबरीमला देवस्थानाच्या ठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी महिलांना कोण यातायात करावी लागते. हा विरोधाभास केवळ सामाजिक क्षेत्रात नाही तर शिक्षण क्षेत्रातही दिसून येतो. हा विरोधाभास इतका टोकाचा की विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आदी या क्षेत्राशी संबंधितांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही चक्रावून जावे. आता तर आंतरराष्ट्रीय संस्थांनाही त्याची बाधा लागली आहे. निमित्त आहे, काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘क्यूएस’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमधील उच्चशिक्षण संस्थांचे त्यांच्या शैक्षणिक व भौतिक दर्जानुसार मूल्यांकन करणाऱ्या क्रमवारीचे. क्यूएसने या वेळच्या आपल्या क्रमवारीत मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला (आयआयटी) भारतातील पहिली सर्वोत्तम संस्था म्हणून जाहीर केले आहे. तर याच क्रमवारीत बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ (आयआयएससी) आहे दुसऱ्या स्थानावर. क्यूएसनेच आधी जाहीर केलेल्या जागतिक संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या आयआयएससीबाबत या वेळी कुठे माशी शिंकली असा प्रश्न आहे. असाच प्रश्न मुंबई विद्यापीठाला पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर स्थान मिळते तेव्हा पडतो. त्याच दिवशी विद्यापीठातील ३५ हजार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सदोष मूल्यांकनामुळे अनुत्तीर्ण कसे ठरविले गेले होते आणि पुनर्मूल्यांकनात हे विद्यार्थी उत्तीर्ण कसे ठरले, याचे वृत्त प्रसिद्ध झाले. हा गोंधळ याच वर्षी नव्हे तर गेली अनेक वर्षे सुरू आहे. दरवर्षी अभासक्रम नेमून देण्यापासून ते परीक्षेचे वेळापत्रक, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल, त्यातले घोळ, पेपरफुटी यांमुळे मुंबई विद्यापीठ देशात तर सोडाच आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गाजत’ असते. असे हे विद्यापीठ क्यूएसच्या भारतीय संस्थांच्या यादीत थेट पाचव्या आणि महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर असावे? म्हणजे हैदराबाद, दिल्ली,  अण्णा विद्यापीठांत प्रवेश नाही मिळाला तर थेट मुंबई विद्यापीठच विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमावर असायला हवे, असा या क्रमवारीचा अर्थ! भारतातील १६० वर्षांचे सर्वात जुने, मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत वसलेले आणि टाटा, अंबानींसारखे उद्योजक माजी विद्यार्थी म्हणून अभिमानाने सांगणारे हे विद्यापीठ खरे तर भारतात पहिल्या स्थानावर असायला हवे! परंतु, गेल्या काही वर्षांत विद्यापीठाची क्यूएसमधील कामगिरी सातत्याने घसरतेच आहे. विद्यापीठात ‘उत्तरपत्रिकेत फेरफार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश’ करणाऱ्या बातम्यांचा तर एव्हाना निकालाच्या हंगामात दरवर्षीच रतीब पडू लागला आहे, इतके विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेभोवतालच्या तटबंदीत शैथिल्य. त्यामुळे हे विद्यापीठ राज्यात तरी पहिल्या स्थानावर कसे, असा प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न त्याहून गंभीर. दोन सत्रांत मिळून तब्बल ३५ हजार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सदोष मूल्यांकनामुळे ‘नापास’ ठरविणारे मुंबई विद्यापीठ राज्यात पहिल्या स्थानावर असेल; तर राज्याच्या क्रमवारीत मुंबईच्या खाली असलेल्या इतर विद्यापीठांमध्ये काय परिस्थिती असेल? म्हणूनच अशा क्रमवारींवर विश्वास कितपत ठेवावा असा प्रश्न पडतो. बाकी, रीतसर पैसे मोजून देशातल्या १० उत्कृष्ट संस्थांत वर्णी लावून देणारे अहवाल भारतात कमी नाहीत. ‘क्यूएस’ची क्रमवारी त्यातल्या त्यात विश्वासार्ह मानली जाते. या क्रमवारीत मुंबईसारखे बेभरवशी विद्यापीठ जर तुलनेने वर असेल, तर देशातील अन्य विद्यापीठांबद्दलही प्रश्नच पडला पाहिजे.