चुकांपासून न शिकणे हा भारतीयांचा स्वभाव आहे. अगदी जिवावर बेतणाऱ्या चुकांपासूनही आपण काहीही शिकत नाही. व्यक्तिगत सुरक्षेची आपण थोडीफार काळजी घेत असलो तरी सार्वजनिक सुरक्षेला कधीच अग्रक्रम मिळत नाही. शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोट, मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरू असताना झालेले अपघात, डोंबिवलीत होणारे रसायनांचे जीवघेणे प्रदूषण किंवा रेल्वेचे अपघात असोत, वर्षांनुवर्षे एकाच प्रकारचे अपघात होत राहतात.
माणसांचे जीव जातात, चौकशा होतात, मदतीचे चार पैसे फेकले जातात, क्वचित कुणाला कठोर शिक्षा होते वा जबर दंड ठोठावला जातो; पण व्यवस्था बदलत नाही. तामिळनाडूतील शिवकाशीत गेल्या १२ वर्षांत फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये स्फोट होऊन २३७ कामगार ठार झाले आहेत. प्रत्येक अपघातानंतर नियमावली कडक झाली, पण तरीही बुधवारी अपघात होऊन किमान ३२ जण मृत्युमुखी पडलेच. मग मागील अपघातातून सरकारने बोध काय घेतला? मानवी चूक हे अपघाताचे मुख्य कारण असले, तरी ते एकमेव कारण नाही. शिवकाशीतील अपघातांमागे आर्थिक व सामाजिक कारणेही बरीच आहेत. कोरडे हवामान व अत्यल्प पाऊस यामुळे शिवकाशी हे लहान औद्योगिक शहर फटाके बनविण्यासाठी योग्य मानले गेले. याशिवाय तेथील छपाईचा व्यवसायही फार मोठा आहे. शिवकाशीत फटाक्यांचे लहान-मोठे ७०० कारखाने असून त्यांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींच्या वर जाते. देशातील ९० टक्के फटाके व ८० टक्के काडेपेटय़ा शिवकाशीत बनतात. फटाक्यांची विक्री दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढत असल्याने या उद्योगात तेजी आहे; परंतु व्यावसायिकता व सुरक्षा याकडे लक्ष देणारे फारसे नाहीत. साधारण २०० कारखान्यांमध्ये सुरक्षेला अग्रक्रम दिला जातो. मात्र या कारखान्यांतील फटाके महाग असतात. याउलट दिवाळी जवळ आली की सुरक्षेला फाटा देऊन आणि अनुभव नसलेल्यांना कामावर ठेवून फटाक्यांचे उत्पादन करणारे बरेच लहान कारखाने आहेत. खर्च वाचवून नफा वाढविण्याकडे या कारखानदारांचा कल असतो. त्याचे परिणाम कामगारांना भोगावे लागतात. मानवी चूक हेच एकमेव स्फोटाचे कारण कसे नाही ते यावरून लक्षात येईल. स्वस्त मनुष्यबळ, सुरक्षेबद्दल अनास्था, नफेखोरी वृत्ती आणि सरकारी भ्रष्टाचार या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे शिवकाशीतील अपघात होय. यातील प्रत्येक बाब नियंत्रणात ठेवता येऊ शकते. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी व माणसाबद्दल किंमत हवी. या दोन गोष्टी आपल्याकडे नाहीत. उलट कमी गुंतवणुकीत आत्यंतिक नफा कमविण्याची कार्यसंस्कृती जोरकस आहे. ही कार्यसंस्कृती फटाक्यांतील दारूपेक्षा जास्त स्फोटक असते. मुंबई मेट्रोचा अपघात व डोंबिवलीतील प्रदूषण यांनाही हेच घटक कमी-अधिक प्रमाणात कारणीभूत ठरतात. माणसाच्या सुरक्षेला, मग ती आर्थिक असो, सामाजिक असो वा वैद्यकीय असो, सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची व्यावसायिक कार्यसंस्कृती जोपर्यंत भारतात रुजत नाही तोपर्यंत असे अपघात होत राहणार. चौकशा, अटक, शिक्षा याने ते थांबणार नाहीत. कार्यसंस्कृतीतील बदलच ते थांबवतील.

Story img Loader